Mumbai : कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होणार

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Dec 29, 2021 | 20:14 IST

Violation of Covid protocol in Mumbai will result in severe action : अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांमध्ये वाढ होऊ लागल्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाने कठोर पवित्रा घेतला आहे. कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होणार असे प्रशासनाने जाहीर केले आहे.

Violation of Covid protocol in Mumbai will result in severe action
कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होणार 
थोडं पण कामाचं
 • कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होणार
 • नववर्ष स्वागताचे कार्यक्रम / समारंभ / पार्टी यावर बंदी
 • कोविड प्रोटोकॉलचे गंभीर उल्लंघन झाल्यास हॉटेल बंद करणार

Violation of Covid protocol in Mumbai will result in severe action : मुंबई : अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांमध्ये वाढ होऊ लागल्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाने कठोर पवित्रा घेतला आहे. कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होणार असे प्रशासनाने जाहीर केले आहे. हॉटेल, उपहारगृह या ठिकाणी कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्यास संबंधित हॉटेल, उपहारगृहावर दंडात्मक कारवाई केली जाईल. गंभीर उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधित हॉटेल, उपहारगृह बंद केले जाईल.

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी महापालिका प्रशासनासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. या बैठकीत मुंबईतील कोरोना संकटाचा आढावा घेण्यात आला. महापालिकेला कोविड प्रोटोकॉलचे पालन व्हावे यासाठी स्पष्ट सूचना देण्यात आल्या. नववर्ष स्वागताच्या निमित्ताने कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका प्रशासनाला दिल्या.

मुंबई महापालिका प्रशासन आणि मुंबई पोलीस यांना परस्पर समन्वय राखून संपूर्ण मुंबईत कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन होऊ नये यासाठी दक्ष राहण्यास पालकमंत्र्यांनी सांगितले. पालकमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर मुंबई महापालिका आयुक्त चहल यांनी कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन होऊ नये यासाठी स्पष्ट निर्देश दिले.

 1. नववर्ष स्वागताचे कार्यक्रम / समारंभ / पार्टी आयोजित न करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. हॉटेल्स्, उपहारगृहं यांच्यासह विविध आस्थापनांना उपस्थितीच्या मर्यादा ठरवून देण्यात आल्या आहेत. त्याचे योग्यरीतीने पालन होते आहे, यावर देखरेख ठेवण्यासाठी सर्व प्रशासकीय विभाग कार्यालयांनी तातडीने भरारी पथकांची नेमणूक करावी. स्थानिक पोलीस उपायुक्तांशी समन्वय साधून या पथकांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश करावा.
 2. नववर्ष स्वागत प्रतिबंधात्मक आदेश तसेच कोविड प्रतिबंधात्मक सूचनांचे उल्लंघन करताना आढळणाऱ्या हॉटेल्स, उपहारगृहांवर सक्त कारवाई करावी. 
 3. सर्व सहायक आयुक्तांनी आपापल्या अखत्यारितील हॉटेल्स्, उपहारगृहं यांचे दैनंदिन फुटेज तपासून उपस्थितीचे नियम पाळले जात असल्याची खातरजमा करावी.
 4. मालाड येथील कोविड उपचार केंद्र हे लहान मुलांवर उपचारांसाठी महत्त्वाचे आहे. या केंद्रासह कांजूरमार्ग येथे उभारलेले कोविड उपचार केंद्र देखील लवकरात लवकर कार्यान्वित करावे.
 5. दुबईमधून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय हवाई प्रवाशांना सक्तीने सात दिवस गृह विलगीकरण करण्याचे निर्देश व त्याअनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत महानगरपालिका प्रशासनाने दिनांक २४ डिसेंबर २०२१ रोजी आदेश दिले आहेत. या आदेशांमध्ये आता फक्त दुबईऐवजी संपूर्ण संयुक्त अरब अमिराती देशांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच  संयुक्त अरब अमिराती (यूएई) देशांमधून मुंबईत येणाऱया प्रत्येक प्रवाशाला विमानतळावर आगमनप्रसंगी आरटीपीसीआर (ऑन अरायव्हल टेस्टींग) चाचणी करावी लागेल. या चाचणीच्या अहवालासापेक्ष व प्रचलित नियमानुसार संबंधित प्रवाशांचे विलगीकरण ठरविण्यात येईल. 
 6. हवाईमार्गे मुंबईत येणाऱया आंतरराष्ट्रीय प्रवाशांमधून, ज्या बाधितांना लक्षणे नाहीत (एसिम्प्टोमॅटिक) आणि औषधोपचाराची देखील गरज भासत नाही, अशा रुग्णांसाठी वांद्रे-कुर्ला संकुल व गोरेगावातील नेस्को या दोन्ही कोविड उपचार केंद्रामध्ये प्रत्येकी ५०० रूग्णशय्यांची स्वतंत्र विलगीकरण व्यवस्था कार्यान्वित करावी. अशा एसिम्प्टोमॅटिक रुग्णांना तेथे निशुल्क विलगीकरणात राहता येईल. जे रुग्ण सशुल्क विलगीकरण व्यवस्थेसाठी तयार असतील, त्यांना निर्देशित हॉटेल्स् मध्ये राहण्याची परवानगी देण्यात येईल. या उपाययोजनेमुळे रुग्णालयांमधील रुग्णशय्या विनाकारण अडकून राहणार नाहीत व वैद्यकीय सेवेवरचा ताणदेखील कमी होईल.
 7. विमानतळावर, रॅपिड टेस्टमध्ये बाधित आढळलेल्या रुग्णांची नियमित आरटीपीसीआर चाचणी करावी. ती चाचणी निगेटिव्ह असेल तर प्रचलित नियमानुसार विलगीकरणाची कार्यवाही करावी. जर चाचणी पॉजिटिव्ह आली तर त्या रुग्णास प्रचलित नियमानुसार विलगीकरण अथवा रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घ्यावा. तसेच नियमित आरटीपीसीआर चाचणीचेच नमुने जनुकीय सूत्रनिर्धारण तपासणी (जिनोम सिक्वेसिंग) साठी पाठवावे.
 8. प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीमध्ये, कोविड बाधितांच्या विलगीकरणासाठी किमान ५०० व्यक्ती क्षमतेचे कोविड काळजी केंद्र (सीसीसी २) लवकरात लवकर कार्यान्वित करावेत.
 9. सर्व विभाग कार्यालयांमधील विभाग नियंत्रण कक्ष (वॉर्ड वॉर रुम) मध्ये येत्या दोन महिन्यांसाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टर अतिरिक्त संख्येने नेमण्यात येणार आहेत. गृह विलगीकरणात राहत असलेल्या रुग्ण व व्यक्तींचा पाठपुरावा करण्यासह इतर वैद्यकीय सेवांसाठी या प्रशिक्षणार्थींच्या सेवा उपयोगात येतील.
 10. सर्व रुग्णालये आणि कोविड उपचार केंद्रामधील मनुष्यबळ, संयंत्रे व इतर यंत्रणा, औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत किंवा कसे, याचा आढावा घेवून त्यामध्ये कमतरता राहणार नाही, याची खात्री करावी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी