मुंबई : विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या १० जागांसाठी सोमवारी (ता.२०) मतदान होत आहे. भाजपचे ५ आणि महाविकास आघाडीचे ६ असे ११ उमेदवार रिंगणात असून सत्ताधारी आघाडीची प्रतिष्ठा पुन्हा एकदा पणाला लागली आहे. राज्यसभेप्रमाणेच या विधान परिषदेतही धक्कादायक निकाल हाती येणार का हे औत्सुक्याचं ठरणार आहे. एकूण १० जागांसाठी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर मतमोजणी संध्याकाळी ५ वाजता सुरू होणार आहे.
दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीत झालेल्या दगाफटक्यानंतर महाविकास आघाडी सावध झाली आहे. तर भाजपनं या निवडणुकीतही चमत्कार करून दाखवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. राज्यसभा निवडणुकीतील पराभवानंतर होणाऱ्या या निवडणुकीत आघाडीला पुन्हा अपयश आल्यास तीन पक्षांच्या बनलेल्या राज्य सरकारच्या स्थैर्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. शिवसेनेकडे अतिरिक्त १० मते आहेत. ती आपल्या दुसऱ्या उमेदवारास मिळावीत, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. आघाडीच्या संयुक्त रणनीतीवर विचार करण्यासाठी रात्री निवडक नेत्यांची ट्रायडंटमध्ये बैठक झाली. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
आघाडीकडे १७० आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे सहा उमेदवारांपैकी प्रत्येकास २८ मतांचा कोटा निश्चित करण्यात आल्याचे समजते. भाजपनेही कोटा ठरवल्याचे समजते. दिवसभर कोटा ठरवण्यावर भर होता. रविवारी मुंबईत हॉटेल डिप्लोमसीला जोर आला होता. क्रॉस व्हाेटिंगची भीती सर्वच पक्षांना आहे. २९ अपक्ष आमदार कुणाला मतदान करतात यावरच सर्व गणित अवलंबून आहे. भाजपने याही निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला धक्का द्यायची रणनीती आखली आहे. दहाव्या जागेसाठी काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळे विधानपरिषदेची खरी लढत ही काँग्रेस आणि भाजपमध्येच असल्याचं दिसून येत आहे.
भाजपच्या आमदारांना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कफ परेड येथील ताज प्रेसिडेन्सीमध्ये कानमंत्र दिला. भाजप या निवडणुकीत कोटा वाढवून न घेता प्रत्येक उमेदवारासाठी असलेले २७ चे लक्ष्य गाठण्याच्या विचारात आहे. शिवसेनेचा रविवारी ५६ वा वर्धापन दिन होता. त्याचा कार्यक्रम सेनेचे आमदार ठेवण्यात आलेल्या पवईच्या हॉटेल वेस्टइनमध्ये पार पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या वेळी सेना आमदारांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला.
भाजपने या निवडणुकीतही यश संपादन केले तर, सरकारचे मनोधैर्य खचेल. सरकारच्या स्थिरतेवर प्रश्नचिन्ह. आघाडीच्या तिन्ही पक्षांत बिघाडी वाढत जाणार. सरकार बॅकफूटवर जाणार. आघाडीला पाठिंबा दिलेले अपक्ष भाजपकडे वळू शकतात. देवेंद्र फडणवीस फडणवीस यांचे महत्त्व वाढणार. सरकारकडे बहुमत सिद्ध करण्याची मागणी. जर महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकले तर राज्यसभेच्या पराभवाचे उट्टे काढल्याचे समाधान सत्तेतील तिन्ही पक्षांना होईल. भाजपविरोधात आणखी आक्रमक रणनीती. आगामी मुंबई महापालिका आणि राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांत फायदा. महाविकास आघाडी एकसंध असल्याचा सर्वत्र संदेश जाईल.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.