कोणालाही द्यायला आमचे ऑफर लेटर मैदानात पडलेले नाही;फडणवीसांचा मुश्रीफांवर पलटवार

मुंबई
भरत जाधव
Updated Sep 20, 2021 | 16:18 IST

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) सातत्यानं महाविकासआघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून सोमय्यांनी हसन मुश्रीफांकडे (Hassan Mushrif) आपला मोर्चा वळवला.

Fadnavis replied on  Mushrif's allegaion
फडणवीसांचा मुश्रीफांना पलटवार  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • सोमय्या यांच्यावरील कारवाई मुख्यमंत्री कार्यालयाची नाही तर गृह मंत्रालयाची आहे.- शिवसेना
  • भाजप मला दाबण्याचा प्रयत्न करत आहे, हसन मुश्रीफ यांचा आरोप
  • चंद्रकांत पाटील यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती - मुश्रीफ

मुंबई : किरीट सोमय्या (Kirit Somaiya) सातत्यानं महाविकासआघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून सोमय्यांनी हसन मुश्रीफांकडे (Hassan Mushrif) आपला मोर्चा वळवला आहे. हसन मुश्रीफ यांनी 150 कोटींचा घोटाळा (150 crore scam) केल्या आरोप सोमय्या यांनी केला आहे. दरम्यान हसन मुश्रीफ यांनी सोमय्यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्यावर आरोप केले जातात कारण आपण भाजपमध्ये गेलो नाही म्हणून आरोप केले जात असल्याचा दावा मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. हसन मुश्रीफ यांनी असा दावा केल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

हसन मुश्रीफ यांनी केलेल्या घोटाळ्याची अधिकची माहिती घेण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोल्हापूर दौरा केला. परंतु सोमय्या यांना मुंबई रेल्वे स्टेशनमध्ये अडवण्यात आलं त्यानंतर कराड मध्ये पोलिसांनी त्यांना रेल्वेमधून उतरवलं. पोलिसांच्या या कारवाईवरुन देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.  गृहमंत्र्यांनी केलेली कारवाई मुख्यमंत्र्यांना माहिती नसेल, अशी खोचक प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दरम्यान सोमय्या यांच्यावरील  कारवाई मुख्यमंत्री कार्यालयाची नाही तर गृह मंत्रालयाची आहे, असे स्पष्टीकरण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेने या प्रकरणातून हात झटकण्याचा प्रयत्न केला. 

कराडमध्ये किरीट सोमय्या यांना रेल्वेतून उतरवल्यानंतर सकाळी त्यांनी  पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी हसन मुश्रीफ आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. याला उत्तर देण्यासाठी मुश्रीफ यांनीही पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. 

काय म्हणाले होते हसन मुश्रीफ? 

"गेल्या अनेक दिवसांपासून किरीट सोमय्या जे काही आरोप करतायत, त्यामागे भारतीय जनता पक्षाचं फार मोठं षडयंत्र आहे. विशेषतः चंद्रकांत पाटील हे याचे खरे मास्टरमाईंड आहेत. मी अनेकदा तुमच्यासमोर आणि जनतेसमोर माझे नेते (शरद पवार), महाविकासआघाडी सरकार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत, परमबीर सिंह प्रकरणी, तसेच केंद्रीय तपासयंत्रणांच्या गैरवापराबाबत सातत्यानं पत्रकार परिषदा घेतल्या आहेत. तसेच याबाबत मी सातत्यानं आवाज उठवला आहे. त्यामुळेच भारतीय जनता पार्टीचे नेतेमंडळी सातत्यानं मला कसं थांबवता येईल, दाबता येईल याचा प्रयत्न करत होते. आणि किरीट सोमय्यांचा टूल म्हणून वापर केलाय."

"चंद्रकांत पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्यासाठी चिंतेचा विषय म्हणजे, ते ज्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष आहेत, त्या ठिकाणी भाजप भुईसपाट झालेला आहे. हा कुणी भुईसपाट केलाय, तर हसन मुश्रीफ यासाठी मुख्य कारणीभूत आहेत. म्हणून त्यांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर त्यांनी दिली होती. त्यावेळी मी त्यांना पवार एके, पवार असं ठणकावून सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी आयकर विभागाची धाड टाकली. विधानसभेच्या निवडणूकीपूर्वी हे कारस्थान त्यांनी केलं.", असा आरोप मुश्रीफांनी केला आहे. 

यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हसन मुश्रीफांनी दावा केला आहे की, मला चंद्रकांत पाटलांनी भाजपमध्ये येण्याची ऑफ दिली होती. मी गेलो नाही म्हणून मला टार्गेट केले जात आहे. "कोणी ऑफर दिली मुश्रीफांना? आम्ही असे ऑफर घेऊन फिरत थोडं असतो. असे आमचे ऑफर लेटर मैदानात पडलेले नाहीत, कोणालाही द्यायला.", असा पलटवार फडणवीसांनी मुश्रीफ यांना लगावला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी