Vinayak Mete Death: 'एका जीवाभावाच्या सहकाऱ्याला आम्ही मुकलो', शरद पवार हळहळले

मुंबई
रोहित गोळे
Updated Aug 14, 2022 | 12:29 IST

Vinayak Mete Accidental Death: माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शोक व्यक्त केला आहे. जाणून घ्या पवार नेमकं काय म्हणाले.

we have lost a soul mate ncp chief sharad pawar lamented on vinayak mete accidental death
'एका जीवाभावाच्या सहकाऱ्याला आम्ही मुकलो', शरद पवार हळहळले 
थोडं पण कामाचं
  • माजी आमदार विनायक मेटेंचं अपघाती निधन
  • मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघातात विनायक मेटेंचं दुर्दैवी निधन
  • विनायक मेटेंच्या निधनावर शरद पवारांनी व्यक्त केला शोक

Sharad Pawar: मुंबई: शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं आज (१४ ऑगस्ट) अपघाती निधन झालं. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर (Mumbai-Pune Express Way) झालेल्या भीषण अपघातात विनायक मेटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या निधनाचं वृत्त समजताच अवघ्या महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. यावेळी अनेक नेत्यांनी तात्काळ नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात धाव घेतली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील रुग्णालयात जाऊन विनायक मेटेंच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. यावेळी शरद पवार यांनी 'आम्ही जीवाभावाच्या सहकाऱ्याला मुकलो आहे.' अशी प्रतिक्रिया देत हळहळ व्यक्त केली आहे. (we have lost a soul mate ncp chief sharad pawar lamented on vinayak mete accidental death)

विनायक मेटेंच्या निधनानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

'दिवसाची सुरुवात विनायकराव मेटे यांच्या अतिशय धक्कादायक अशा अपघाती निधनाच्या बातमीने झाली. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये, विशेषतः मराठवाड्यामध्ये एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या व अत्यंत कष्टाने आपले स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि नेतृत्व विकसित केलेला नेता असा विनायकरावांचा परिचय महाराष्ट्राला होता.'

अधिक वाचा: रुग्णालयात आणण्यापूर्वीच मेटेंचा मृत्यू झाला होता

'ते राजकीय कार्यकर्ते कमी पण सामाजिक कार्यकर्ते अधिक होते. मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न असेल किंवा नव्या पिढीच्या शैक्षणिक सवलतींचा प्रश्न असेल अशा सगळ्या कामांमध्ये अत्यंत बारकाईने व अभ्यासूपणाने व्यक्त होणारे ते व्यक्तिमत्व होते. राज्य सरकार वा अन्य संस्था सुसंवाद ठेवण्याची त्यांची भूमिका होती. शिवछत्रपतींचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबईच्या समुद्रामध्ये व्हावे यासाठी त्यांनी कष्ट घेतले व अनेकांना आपली आग्रही भूमिका पटवून देण्याची खबरदारी घेतली.' 

अधिक वाचा: CM Eknath Shinde: विनायक मेटेंच्या अपघाताची चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश

'आजच्या आकस्मिक अपघाती निधनाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातल्या एका मोठ्या सामाजिक नेतृत्वाला आज आपण मुकलो. मी माझ्या सहकाऱ्यांच्या वतीने या दुःखामध्ये सहभागी आहे. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते आमचे सहकारी होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सुद्धा त्यांनी काम केले. नंतर स्वतःचा पक्ष काढण्याची भूमिका त्यांनी घेतली. अशा एका जीवाभावाच्या सहकाऱ्याला आम्ही मुकलो. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि हजारो कार्यकर्त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली!' अशा शब्दात शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश 

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. विनायक मेटे यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेवर माझा विश्वास बसत नाही आहे. मराठा समाजासाठी सातत्यानं लढणारा एक नेता हरपला, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.

अधिक वाचा: अपघात झाल्यानंतर विनायक मेटेंना तासभर नाही मिळाली मदत

विनायक मेटेंच्या सहकाऱ्याने घटनास्थळी वेळेवरर मदत पोहचली नसल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात माहिती तपासली जाईल. संपूर्ण घटनेची चौकशी केली जाईल, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.  पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की,  गेल्याच आठवड्यात विनायक मेटे मला भेटले होते, मराठा समाजाला न्याय मिळावा अशी अपेक्षा त्यांनी माझ्याकडे व्यक्त केली.

विनायक मेटे यांचे अपघाती निधन 

आज पहाटे साडे पाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Highway) ही घटना घडली. अपघातानंतर त्यांना नवी मुंबईतील एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मेटे यांच्या गाडीच्या डाव्या बाजूचा चक्काचूर झाला आहे.  मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी