नितीन गडकरींच्या 'या' वक्तव्याने शिवसेना चवताळेल का?

मुंबई
Updated Nov 08, 2019 | 15:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

Nitin Gadkari Huge Statement: शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याबाबत काहीही ठरलं नव्हतं. याबाबत अमित शहा यांनीच मला अशी माहिती दिली. असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे.

नितीन गडकरींच्या 'या' वक्तव्याने शिवसेना चवताळेल का?
we not assured about cm post to the shiv sena amit shah himself said to me nitin gadkari's huge statement  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याबाबत शिवसेनेसोबत काहीही ठरलं नव्हतं: गडकरी
  • नितीन गडकरींच्या वक्तव्यामुळे शिवसेना पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता
  • अडीच वर्ष मुख्यमंत्री देण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नव्हती, अमित शहांनीच मला माहिती दिली: गडकरी

मुंबई: भाजप आणि शिवसेना यांच्यातील सत्ता संघर्ष वाढलेला असताना आता केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी एक अतिशय मोठं वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांमधील संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता नाही. दोन्ही पक्षांमध्ये मध्यस्थी व्हावी यासाठी नितीन गडकरी आज मुंबईत दाखल झाले. मात्र, शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा करण्याआधीच गडकरी असं वक्तव्य केलं आहे की, 'अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद असा कोणताही फॉर्म्युला शिवसेनेसोबत ठरलेला नव्हता.' असं वक्तव्य गडकरींनी केलं आहे. त्यामुळे आता भाजपकडून पुन्हा एकदा शिवसेनेला तोंडघशी पाडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. 

'माझी पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा झाली तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद असं काहीही ठरलेलं नव्हतं. त्यामुळे राज्यातील सरकार हे देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली स्थापन होईल.' असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी मुंबईत पोहचताच केलं आहे. दरम्यान, अशाच प्रकारचं वक्तव्य काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. याच वक्तव्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दुखावले गेले असल्याचं वृत्त समोर आलं होतं. तेव्हापासूनच शिवसेना आणि भाजपमधील चर्चा देखील झाली नव्हती. पण आता तशाच प्रकारचं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं असल्याने शिवसेना नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी? 

'माझी पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा झाली तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद असं काहीही ठरलेलं नव्हतं. त्यामुळे राज्यातील सरकार हे देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली स्थापन होईल. तसंही ज्या पक्षाचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला बाळासाहेब असल्यापासून आहे. त्यामुळे आता देखील भाजपाचाच आमदार होईल. जर गरज पडली तर मी शिवसेना आणि भाजप यांच्यात नक्कीच मध्यस्थी करेन.' असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी वक्तव्य केलं आहे. 

'कुणीही मध्यस्थी करु नये, उद्धव ठाकरे भूमिकेवर ठाम आहेत'

दरम्यान, शिवसेना आपल्या भूमिकेवर अद्यापही ठाम असल्याचं समजतं आहे. आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी शिवसेनेची हिच भूमिका मांडली होती.  

'माझ्या माहितीप्रमाणे नितीन गडकरी यांचं मुंबईतील वरळीमध्ये घर आहे. त्यामुळे ते मुंबईत येत आहेत ही काही बातमी नाही. तसंच तुम्हाला आधीच स्पष्ट करतो की, कुणाही मध्यस्थीची आम्हाला गरज नाही. कारण उद्धव ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे कुणीही तिसऱ्याने यामध्ये पडण्याची गरज नाही. ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांनी सरकार बनवावं. पण जर कुणी राष्ट्रपती राजवटीच्या आडून महाराष्ट्रावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असेल तर तो महाराष्ट्राचा अपमान आहे.' अशा स्पष्ट शब्दात संजय राऊत यांनी भाजपला इशारा दिला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी