'तुमचे आमदार आम्हाला अॅप्रोच होत असतील तर?', भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

मुंबई
रोहित गोळे
Updated Nov 08, 2019 | 13:41 IST

भाजप कोणत्याही आमदाराला फोडण्याचा प्रयत्न करत नाही. पण जर इतर पक्षांची भूमिका ठरत नसेल आणि त्यांचे आमदार जर आम्हाला अॅप्रोच होत असतील तर त्याला आम्ही काय करायचं? असं वक्तव्य भाजप नेते प्रविण दरेकरांनी केलं आहे.

what should we do if your mlas are approaching us, bjp leader's big statement
'तुमचे आमदार आम्हाला अॅप्रोच होत असतील तर?', भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • भाजप आमदार फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा काँग्रेसचा आरोप
  • इतर पक्षाचे आमदार आम्हाला अॅप्रोच होत आहेत, प्रविण दरेकरांचा दावा
  • भाजप आणि शिवसेनेच्या सत्तासंघर्षात काँग्रेसचीही उडी

मुंबई: भाजपकडून आमदार फोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी आमदारांना तब्बल ५०-५० कोटी रुपयांची आमिषं दाखवली जात आहे. असा थेट आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. या आरोपांवरुन आता काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. 'भाजप शिवसेनेच्या आमदारांना फोडण्यासाठी ५० कोटींची ऑफर देत आहे. तसंच आमच्या आमदारांना देखील संपर्क साधण्यात आला होता.' असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केल्यानंतर आता भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी अतिशय मोठं वक्तव्य केलं आहे. 

'जर तुमचे आमदार आम्हाला अॅप्रोच होत असतील तर त्याला आम्ही काय करायचं?' असं वक्तव्य प्रविण दरेकर यांनी केल्याने आता सर्वांच्यांच भुवया उंचावल्या आहेत. पण यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, सत्तास्थापनेसाठी सध्या पडद्यामागे अतिशय मोठ्या हलचाली सुरु झाल्या आहेत. टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना प्रविण दरेकर यांनी अतिशय मोठं वक्तव्य केलं आहे. 

'राज्यातील राजकीय परिस्थितीवर सर्वांचंच लक्ष आहे. तसंच निवडून आलेल्या प्रत्येक आमदाराचं देखील त्याकडे लक्ष असणार आहे. अशावेळी जर तुमची भूमिका ठरत नसेल तर तुमचे आमदार आम्हाला अॅप्रोच होत असतील तर त्याला आम्ही काय करायचं? त्यामुळे आमदारांना ५० कोटींचं आमिष देणं सुरु आहे असं बोलून आमदारांचा अपमान करणं आधी थांबवा. आपला आपल्या आमदारांवर विश्वास हवा. जर विश्वास नसेल तर दुर्दैवाने आमदारांमध्ये अस्वस्थता पसरेल.' असं वक्तव्य प्रविण दरेकर यांनी केलं आहे. 

दरम्यान, प्रविण दरेकर यांचा हा दावा काँग्रेसचे खासदार हुसैन दलवाई यांनी खोडून काढला होत आहे. 'खरं तर जनतेने भाजप आणि शिवसेना यांच्या युतीला बहुमत दिलं आहे. पण भाजप अद्यापही सरकार स्थापन करु शकलेलं नाही. त्यामुळे आता भाजपकडून विरोधी पक्षातील आमदारांना फोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण आता आमच्या आमदारांना कितीही फोडण्याचा प्रयत्न केला तरी ते आता फुटणार नाहीत. कारण जे आमदार फुटायचे होते ते आधीच फुटले.' असं हुसैन दलवाई म्हणाले. 

दरम्यान, यामुळे आता काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. दुसरीकडे शिवसेनेने देखील भाजप घोडेबाजार करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे आता भाजपच्या एकूण हलचालींकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी