मंत्री झाले तेव्हा भुमरेंनी सामना कार्यालयात माझ्यासमोर लोटांगण घातलेलं: राऊत

मुंबई
रोहित गोळे
Updated Jul 07, 2022 | 12:27 IST

संदीपान भुमरे हे मविआमध्ये मंत्री झाले तेव्हा त्यांनी सामना कार्यालयात येऊन माझ्यासमोर लोटांगण घातलं होतं. असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

when sandipan bhumre became a minister he knelt in front of me in saamana office said sanjay raut
भुमरेंनी सामना कार्यालयात माझ्यासमोर लोटांगण घातलेलं: राऊत  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • संदीपान भुमरेंनी माझ्यासमोर लोटांगण घातलेलं, संजय राऊतांचा दावा
  • संजय राऊतांचा पुन्हा एका बंडखोर आमदारांवर निशाणा
  • मतदार शिवसेनेच्या पाठिशी ठामपणे उभे राहतील, राऊतांना विश्वास

मुंबई: राज्यातील शिंदे सरकार अस्तित्वात आल्यानंतर शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी शिवसेना नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करणं सुरु केलं आहे. त्यापैकीच एक आमदार आणि माजी मंत्री संदीपान भुमरे यांनी देखील संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. आता राऊतांनी देखील त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. 

'महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद मिळालं तेव्हा स्वत: संदीपान भुमरे हे सामना कार्यालयात आले होते आणि माझ्यासमोर त्यांनी लोटांगण घातलं होतं. हवं असेल तर सामना कार्यालयातील व्हिडिओ फुटेज मी दाखवू शकतो.' असा दावा करत संजय राऊत यांनी भुमरेंवर निशाणा साधला. 

पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले.   

'माझं जुन्या सहकाऱ्यांना आवाहन आहे की, गोंधळू नका.. तुम्ही का गोंधळला आहात ते आम्हाला माहिती आहे. तुमची मानसिक अवस्था आम्हाला माहिती आहे. आता काल संजय राठोड बोलत होते असं ऐकलंय मी. माझ्यामुळे पक्ष सोडला म्हणे. आदल्या दिवसापर्यंत माझ्यासोबत बसले होते.' असं संजय राऊत यावेळी म्हणाले. 

'ते दुसरे... संदीपान भुमरे हे जेव्हा मंत्री झाले होते तेव्हा त्यांनी सामना कार्यालयात येऊन माझ्यासमोर लोटांगण घातलं होतं माझ्यासमोर. 'साहेब तुम्ही होतात म्हणून हे सरकार आलं आणि आम्ही मंत्री झालो.' हे सांगणारे संदीपान भुमरे.' असा खुलासा संजय राऊत यांनी यावेळी केला आहे.

अधिक वाचा: आता काँग्रेस-NCPला बंडाची कीड लागणार; मोठं खिंडार पडणार

'सामना कार्यालयात व्हिडिओ फुटेज असेल तर काढायला लावतो मी. सगळं आहे. संजय राठोड यांच्यावरील संकटात उद्धव ठाकरे कसे ठामपणे उभे राहिले. हे सगळ्यांना माहिती आहे. पण ठिक आहे त्यांना जे बोलायचं आहे ते बोलू दे.' असा दावाच संजय राऊत यांनी यावेळी केला आहे.

'आमचं मन साफ आहे. उद्धवजींचं मन साफ आहे. आम्ही चांगल्या मनाने काम करतो. कोणावर काही भन्नाट आरोप करायचे. शरद पवार शिवसेनेला संपवत आहेत म्हणे. अरे पण अर्धे लोकं पवारांच्या पक्षातूनच आमच्याकडे आले आहेत ना.' असं म्हणत टीका करणाऱ्यांना संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. 

'हे ४० लोकं गेल्यामुळे शिवसेनेचा एक कपचा सुद्धा उडालेला नाही. जमिनीवर आहे शिवसेना. जेव्हा निवडणुका होतील तेव्हा मतदार शिवसेनेच्या मागे ठामपणे उभे राहील.' असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी