राज्यात मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे हे जरी विराजमान असले तरी प्रशासकीय पातळीवर देवेंद्र फडणवीस यांचाच वरचष्मा असल्याचं दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री कोण? असा सवाल राज्यातील जनतेला देखील पडला आहे.
महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री कोण... शिंदे की फडणवीस?  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
प्रशासकीय पातळीवर देवेंद्र फडणवीस यांचाच वरचष्मा
अनेक प्रशासकीय निर्णयात देवेंद्र फडणवीस यांचीच छाप
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री मात्र पुरेसं राजकीय पाठबळ नाही
मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) काही दिवसांपूर्वी प्रचंड मोठी राजकीय उलथापालथ होऊन शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आलं. अवघ्या ५० आमदारांसह शिवसेनेत बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना भाजपने सत्तेतील सर्वात महत्त्वाचं असं मुख्यमंत्री (Chief Minister) पद देऊ केलं. मात्र, असं असलं तरीही गेल्या १३ दिवसातील एकूण कारभार पाहता अनेक जण असा सवाल उपस्थित करत आहेत की, खरे मुख्यमंत्री नेमकं कोण?
खरं म्हणजे ठाकरे सरकार कोसळल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्री पदी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच विराजमान होतील अशी अटकळ व्यक्त केली जात होती. मात्र, भाजपच्या (BJP) केंद्रीय नेतृत्वाने सरकार टिकविण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकली आणि उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांना दिले.
देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास अजिबात तयार नव्हते. मात्र, केंद्रीय नेतृत्वासमोर त्यांना फार विरोध करता आला नाही आणि उपमुख्यमंत्री पद त्यांनी स्वीकारलं. मात्र, असं असलं तरीही मागील काही दिवसात त्यांचा वावर हा मुख्यमंत्र्यांप्रमाणेच असल्याचं दिसतं आहे.
अगदी निर्णय घेणं असो किंवा पत्रकार परिषदांमध्ये पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देणं असो. सगळ्यात देवेंद्र फडणवीस यांचीच छाप दिसून येत आहे.
खरे मुख्यमंत्री कोण.. शिंदे की फडणवीस? असा सवाल का विचारला जातोय याच गोष्टीचा आपण मागील काही दिवसांमधील घडामोडी लक्षात घेऊन नेमका उहापोह करणार आहोत.
मुख्यमंत्री शिंदेंसमोरचा माईक काढून घेणं...: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरही ते नेमके मुख्यमंत्री आहेत की, असं चित्र आता निर्माण झालं आहे. कारण अनेक निर्णय प्रक्रियेत देवेंद्र फडणवीस यांचाच ठसा दिसून येत आहे. या सगळ्याची सुरुवात ही एका छोट्या घटनेपासून झाली. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर शिंदे आणि फडणवीस यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. याच पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने आमदार संतोष बांगर यांच्याबाबत एक प्रश्न विचारला. ज्याला मुख्यमंत्री शिंदे उत्तर देत असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी चक्क त्यांच्या समोरील माईक उचलला आणि स्वत: पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर दिलं. फडणवीसांच्या या कृतीवरुन विरोधकांनी त्यांना चांगलंच लक्ष्य केलं. फडणवीस हे अद्यापही मुख्यमंत्र्यांच्याच भूमिकेत वावरत असल्याची टीका देखील त्यांच्यावर यावेळी करण्यात आली.
प्रत्येक दौऱ्यात सोबत कायम: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतल्यापासून दोन दौरे केले. पण या दोन्ही दौऱ्यात देवेंद्र फडणवीस हे कायम मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबतच असल्याचं पाहायला मिळालं. सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांचा दिल्ली दौरा केला. या संपूर्ण दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबतच देवेंद्र फडणवीस हे देखील होते. या दौऱ्यात अनेक राजकीय चर्चा झाल्या त्यामुळे फडणवीस हे शिंदेंसोबत असणं हे अपेक्षित होतं. मात्र, यानंतर महाराष्ट्रात परतल्यावर मुख्यमंत्री शिंदे हे अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी गडचिरोली येथे गेले होते. यावेळी देखील पूर्ण वेळ फडणवीस हे शिंदेंच्या सोबत होते. तसंच पत्रकार परिषदा देखील घेत होते.
फडणवीसांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांची नियुक्ती: दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय पातळीवर देखील त्यांचा खुंटा मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. कारण त्यांच्या मर्जीतील सनदी अधिकारी हे आता महत्त्वांच्या पदावर नियुक्त केले जात आहेत. मुंबई मेट्रो हा देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. पण सत्ता बदल झाल्यानंतर हा या प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालक असलेल्या अश्विनी भिडे यांना हटविण्यात आलं होतं. त्या पदाचा कार्यभार हा शिंदेंच्या मर्जीतील एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्याकडे सोपविण्यात आला होता. मात्र, ठाकरे सरकार जाताच शिंदेच्या मर्जीतील श्रीनिवास यांच्याकडून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी काढून अश्विनी भिडे यांच्याकडे सोपवली आहे. तर दुसरीकडे फडणवीसांच्या अत्यंत मर्जीतील असे दुसरे अधिकारी म्हणजे श्रीकर परदेशी यांना पीएमओमधून पुन्हा राज्यात आणण्यात आलं आहे. त्यांना उपमुख्यमंत्री कार्यालयात सचिवपदी नियुक्त करण्यात आलं आहे.
राजकीय दृष्ट्या पाहिल्यास फडणवीसांचा हा वावर काहीसा योग्यही दिसून येऊ शकतो. कारण त्यांच्याकडे ११६ आमदारांचं असं प्रचंड बळ आहे. जर एकनाथ शिंदे यांना आपलं मुख्यमंत्री पद टिकवायचं असेल तर त्यांना फडणवीसांना अजिबात दुखावता येणार नाही. त्यांना फडणवीसांची मर्जी ही राखावीच लागेल. कारण सध्या ते फक्त बंडखोर आमदारांच्या एका गटाचं नेतृत्व करत आहेत.
त्यामुळे या सगळया राजकीय घडामोडी लक्षात घेतल्या तर सध्या मुख्यमंत्री म्हणून जरी एकनाथ शिंदे हे असले तरीही प्रशासनावर वचक हा देवेंद्र फडणवीस यांचाच आहे. त्यामुळेच राज्यातील जनतेला खरे मुख्यमंत्री कोण हे अवघ्या १३ दिवसातच कळून चुकलं आहे.