कोण असेल मुंबई नवीन पोलीस आयुक्त; पांडेंची जनकल्याण कार्यपद्धतीवर सरकार नाराज, हवी ठाकरे सरकारला खूश करणारी कार्यपद्धती

मुंबई
भरत जाधव
Updated Jun 13, 2022 | 14:42 IST

मुंबईचे पोलीस आयुक्त (Mumbai Police Commissioner ) संजय पांडे (Sanjay Pandey)जूनअखेरीस सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी वर्णी लावण्यासाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. पोलीस आयुक्त पांडेंची जनकल्याण कार्यपद्धती ही सरकारच्या नाराजीचे कारण मानले जात आहे.

Who will be the new Commissioner of Police?
नवीन पोलीस आयुक्त कोण होणार?, ही नावे आहेत चर्चेत  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • तीन महिन्यांच्या मुदतवाढीसाठी संजय पांडेंचा प्रयत्न
  • पांडे आयुक्तपदावर विराजमान होताच काही दिवसांत ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
  • जनकल्याण कार्यपद्धती सरकारला नको, राज्य सरकारला हवी त्यांना खूश करणारा पोलीस आयुक्त

मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त (Mumbai Police Commissioner ) संजय पांडे (Sanjay Pandey)जूनअखेरीस सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी वर्णी लावण्यासाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. पोलीस आयुक्त पांडेंची जनकल्याण कार्यपद्धती ही सरकारच्या नाराजीचे कारण मानले जात आहे. दरम्यान तीन महिन्यांच्या मुदतवाढीसाठी संजय पांडे प्रयत्नशील आहेत, परंतु दुसरीकडे या पदासाठी अनेकांची नावे चर्चेत आहेत. यामुळे पांडे मुदत वाढ मिळणं कठिण दिसत आहे, कारण मुंबईतील आगामी पालिका निवडणुका दृष्टिक्षेपात ठेवूनच सरकार आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याची नियुक्ती आयुक्तपदी करेल, असा अंदाज आहे. 

केंद्रीय यंत्रणा आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्षात आयुक्तपद भूषविल्यानंतर पांडे यांनी काही धडक कारवाया केल्या, मात्र तरीही त्यांच्या 'जनकल्याण' कार्यपद्धतीवर सरकारची नाराजी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ते मुदतवाढ मिळविण्यात यशस्वी ठरतात की, अन्य कुणी बाजी मारते, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. 

राज्य सरकारला खूश करता येईना 

माजी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राज्य सरकारने त्यांची बदली केली आणि महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या संजय पांडे यांची या पदी नियुक्ती करण्यात आली. पांडे आयुक्तपदावर विराजमान होताच काही दिवसांत ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. केंद्रीय यंत्रणा आणि राज्य सरकार यांचा संघर्ष सुरू असतानाच भाजपचे नेते प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या यांची पोलिसांकडून चौकशी, नवनीत राणा प्रकरण, मोहित कंबोज यांच्यावरील गुन्हा, मशिदींवरील भोंगा ही प्रकरणे पांडे यांनी चांगल्या प्रकारे हाताळली. 

परंतु शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी काढलेल्या हल्लाबोल मोर्चानंतर मात्र मुंबई पोलिसांवर टीका झाली. संजय पांडे पोलिसांमध्ये कमी, तर सर्वसामान्य नागरिकांमध्ये अधिक प्रसिद्ध होऊ लागले. सिटिझन फोरमची स्थापना, मुंबईभरातून विद्यार्थ्यांच्या स्पर्धा, संडे स्ट्रीट या सर्वांचा भार पोलीस दलावर पडत असून त्यांची हीच जनकल्याण कार्यपद्धती नाराजीचे कारण मानले जात आहे.

ही नावे चर्चेत

संजय पांडे यांना मुदतवाढ न मिळाल्यास सध्या महासंचालकपदाची जबाबदारी सांभाळणारे रजनीश शेठ, होमगार्डचे प्रमुख डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलिस गृहनिर्माण विभागाचे विवेक फणसाळकर आणि संदीप बिष्णोई या अधिकऱ्यांपैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. ठाण्याचे पोलिस आयुक्त जयजीत सिंह, पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, वसई-विरार, मिरा-भाईंदरचे पोलिस आयुक्त सदानंद दाते, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे प्रभात कुमार यांचीही नावे चर्चेत आहेत. राज्य सरकार पांडे यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव पाठवेल आणि केंद्र सरकार त्याला मंजुरी देईल ही शक्यता कमी आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी