BJP on Eknath Shinde : सत्तेचा प्रस्ताव आल्यास नाकारायला आम्ही मूर्ख नाही, चंद्रकांतदादांचा सूचक इशारा; संजय राऊतांना जोरदार टोला

शिवसेनेत फूट पडली असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानाने सूचक संकेत दिले आहेत. सत्तेचा प्रस्ताव आला तर कोण सोडेल, असा सवाल त्यांनी केला आहे.

BJP on Eknath Shinde
सत्तेचा प्रस्ताव कोण सोडेल, चंद्रकांतदादांचा सवाल  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • सत्तेचा प्रस्ताव आला तर कोण नाकारेल.- चंद्रकांत पाटील
  • भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे सूचक संकेत
  • एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर हालचालींना वेग

BJP on Eknath Shinde | सत्तेचा प्रस्ताव आला तर तो नाकारण्याएवढे आम्ही मूर्ख नाही, असं विधान भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. महाराष्ट्रात सध्या घडणाऱ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे. भाजपनं सत्तेची तयारी सुरू केल्याचे हे संकेत असून गुजरातच्या सूरतमध्ये घडणाऱ्या घडामोडींनंतर भाजपला सत्तेची आशा निर्माण झाली आहे. 

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि काही आमदार नॉट रिचेबल असल्याच्या मुद्द्यावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी हे विधान केलं आहे. राजकारणात कधी काय घडेल, सांगता येत नाही. आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी राजकारणात आहोत आणि सत्ता असेल तर अधिक चांगल्या पद्धतीनं सेवा करता येते. त्यामुळे जर कुठल्याही प्रकारे सत्तेचा प्रस्ताव आमच्याकडे आला, तर आम्ही तो नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. 

अधिक वाचा - एकनाथ शिंदेंचा आनंद दिघे झाला असता - राणे

भाजपला सत्तास्थापनेची आशा

शिवसेनेत झालेलं बंड आणि एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांनी सूरतमध्ये घेतलेला आसरा याचा संबंध भाजपशी जोडला जात आहे. सूरत हा भाजपचा बालेकिल्ला आहे. गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे. सूरतमधील सर्व खासदार हे भाजपचे आहेत. त्यामुळे बंडखोरी करणाऱ्या आमदारांना कुठलाही दगाफटका होऊ नये आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना परत घेऊन जाऊ नये, याची सर्व व्यवस्था सूरतमध्ये कऱण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंसोबत नाराज आमदारांच्या गटाला घेऊन भाजपकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाण्याची शक्यता आहे. 

संजय राऊतांना टोला

शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्या महानेतेगिरीमुळेच शिवसेेनेची अशी अवस्था झाल्याचा टोलाही भाजप प्रवक्ते चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. आपल्या पक्षात काय सुरू आहे, याची कुणकुण पक्षप्रमुखांना किंवा पक्षातील नेत्यांना न लागणं हे कशाचं लक्षण आहे, असा सवाल त्यांनी केला आहे. 

अधिक वाचा - आनंद सेना स्थापन करणार एकनाथ शिंदे? वाचा सविस्तर

दिल्लीत हालचालींना वेग

दरम्यान, महाराष्ट्राच्या विधान परिषदे निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहोचले आहेत. पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांसोबत ते चर्चा करणार असून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या दृष्टीनं या भेटींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्रात सत्तापालट होणार असेल, तर देवेंद्र फढणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असून राज्यसभा निवडणूक आणि विधान परिषद निवडणुकीत भाजपने केलेल्या कामगिरीमुळे फडणवीस यांचं राजकीय वजन अधिकच वाढलं आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी दिलेले सत्ता स्थापनेच्या प्रस्तावाबाबतचे संकेत जास्तच बोलके आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी