Ramdas Kadam: रामदास कदम का रडले एवढे ढसाढसा?

मुंबई
रोहित गोळे
Updated Jul 19, 2022 | 20:22 IST

Ramdas Kadam: शिवसेनेचे माजी नेते रामदास कदम यांनी आपल्या राजीनाम्यानंतर सर्वच मराठी वृत्तवाहिन्यांना मुलाखत दिली. ज्यामध्ये त्यांना खूपच रडू आलं. पाहा रामदास कदम का झाले एवढे हळवे.

Ramdas Kadam: रामदास कदम का रडले एवढे ढसाढसा?
why did shiv sena ex minister ramdas kadam cry so much 
थोडं पण कामाचं
  • रामदास कदम यांनी नेते पदाचा राजीनामा दिल्यावर उद्धव ठाकरेंवर केली टीका
  • रामदास आठवलेंना झाले अश्रू अनावर
  • रामदास आठवलेंचा शिंदे गटाला जाहीर पाठिंबा

मुंबई: शिवसेना (Shiv Sena) नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी जवळजवळ सर्वच मराठी वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्या आणि या सर्वच मुलाखतींमध्ये त्यांना आपलं रडू आवरता आलं नाही. प्रत्येक मुलाखतीत त्यांनी शिवसेना नेतृत्वावर काही आरोप केले. तसेच आपल्यावर कसा अन्याय झाला याचा पाढाही त्यांनी यावेळी वाचला. अन् त्याचवेळी त्यांना आपलं रडू आवरणं कठीण जात असल्याचं पाहायला मिळालं. जाणून घेऊयात रामदास कदम नेमकं काय म्हणाले.

रामदास कदम म्हणतात, माझ्यावर अन्याय झाला...

'मातोश्रीवर बसून हकालपट्टी करणं एवढाच कार्यक्रम शिल्लक राहिलाय का? त्यापेक्षा हकालपट्टी करण्याची वेळ का आली आहे उद्धवसाहेब याचं आत्मपरिक्षण केलं पाहिजे अशी माझी तुम्हाला विनंती आहे. मागील ५२ वर्ष रामदास कदम शिवसेनेसाठी संघर्ष करतोय. छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे फुटले तेव्हा रामदास कदमने संघर्ष केला आहे. उद्धव साहेब जेव्हा नारायण राणे गेले ना तेव्हा तुम्ही मातोश्रीवरुन बाहेर पडल्यानंतर तुमच्या गाडीच्या पुढच्या सीटवर हा रामदास कदम बसलेला असायचा. थोडीशी आटवण ठेवा ओ.. आपण कोणाची हकालपट्टी करतोय ते. हकालपट्टी तुम्ही केली नाहीत. माझ्या मनातून मी तुम्हाला काढलं आणि राजीनामा फेकला.' असं रामदास कदम म्हणाले.

अधिक वाचा: 'शिंदे-फडणवीसांची राज्य चालवण्याची कुवत राऊतांना माहितीए'

'एकनाथ शिंदेंचे मी आभार मानतो...'

'एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबर जे ५१ आमदार गेले त्यांचे मी मनापासून आभार मानतो कारण की, त्यांनी शिवसेना वाचवली आहे. आम्ही टाहो फोडून सांगत होतो. १०० आमदार राष्ट्रवादीचे कसे निवडून आणायचे याचं टार्गेट त्यांनी ठेवलं आहे. शिवसेनेचा आमदार कसा पाडायचं याचं प्लॅनिंग केलं आहे. मी सर्व्हे केला आहे, माहिती घेतली आहे. आज एकनाथ शिंदे आणि या आमदारांनी निर्णय घेतला नसता तर पुढच्या निवडणुकीला महाराष्ट्रात शिवसेनेचे १० आमदार निवडून आले नसते. मी दाव्याने सांगतोय, जबाबदारीने बोलतोय.' असंही रामदास कदम यावेळी म्हणाले.   

'उद्धव साहेब तुमची तब्येत ठीक नव्हती मान्य, कोरोना होता मान्य.. पण शरद पवार कोकणात कसा पक्ष फोडतायेत हे मी तुम्हाला फोटोसकट पाठवलं होतं. मुख्यमंत्री तुम्ही.. शासनाचे फंड आणि शिवसेना फोडतायेत शरद पवार. हे तुम्हाला मी कागदपत्रासह दाखवलं होतं. पण तरीही तुम्ही शरद पवारांना सोडायला तयार नाही. पक्ष संपला चालेल. आमदार, खासदार गेले चालतील. पण शरद पवारांना सोडायचं नाही.' असं म्हणत रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.  

अधिक वाचा: 'वर्षभरापूर्वीच युतीबाबत ठाकरेंची मोदींसोबत झालेली चर्चा'

'मी उद्धवजींना सांगितलं होतं की, हे पाप आहे...'

'माझा तुम्हाला सवाल आहे की, बाळासाहेबांनी तुम्हाला राष्ट्रवादी, काँग्रेससोबत जाऊन मुख्यमंत्री होऊ दिलं असतं का? मी उद्धवजींना सांगितलं होतं की, हे पाप आहे. साहेबांच्या आत्म्याला शांती लागणार नाही. शरद पवार शेवटी शिवसेना फोडण्यात यशस्वी झाले. त्यांचा डाव यशस्वी झाला. बाळासाहेब असताना जे शरद पवार जमलं नाही ते आता साधलं.'  

'नशीब हे अडीच वर्षात घडलं नाहीतर अशीच पाच वर्ष गेली असती तर शिवसेना संपली असती. एक आमदार निवडून आला नसता. हकालपट्टी करण्यापेक्षा भविष्यात एकनाथ शिंदेंना कसं एकत्र आणता येईल हे पाहिले आहे.' असं म्हणत रामदास कदम यांनी शिवसेना एकत्र आणणार असल्याचंही वक्तव्य केलं.  

'मी प्रयत्न केले होते ना.. गुवाहटीला गेलेल्या शिंदेंसोबत मी चर्चा केली होती. मी त्यांचं मनही वळवलं. पण लगेच तुमचे इथले नेते आमदारांना बैल, कुत्रे, रेडे बोलायला लागले. तो आमचा आदित्य.. तुझं वय काय आणि तू काय आमदारांना बोलतोय. याचं थोडं भान ठेवा.' असं कदम म्हणाले. 

अधिक वाचा: शिवसेना NDAतून कधी बाहेर पडलीच नाही, खासदाराचा गौप्यस्फोट

'..त्या दिवसापासून मी मातोश्रीची पायरी चढलो नाही'

'एकनाथ शिंदेंनी मला सांगितलं होतं की, उद्धव ठाकरेंना म्हणा राष्ट्रवादी सोडा आम्ही येतो मातोश्रीवर. ज्या वेळेला सरकार बनत होतं तेव्हा मी उद्धव ठाकरेंना सांगत होतो की, उद्धवजी राष्ट्रवादी-काँग्रेससोबत घरोबा करु नका. हे पाप होईल. हे सांगितलं होतं. हे सांगून जे मी बाहेर पडलोय त्या दिवसापासून आजपर्यंत मी मातोश्रीची पायरी नाही चढलो. कारण उद्धवजी कोणाचं ऐकतच नाही.' असा दावा रामदास कदम यांनी केला. 

'मला त्यांनी बोलावून सांगितलं होतं की, यापुढे तुम्ही मीडियामध्ये एक शब्द बोलायचा नाही. मला कारण विचारायचा नाही. पण यापुढे तुम्ही मीडियात काही बोलायचं नाही. म्हटलं ठीक आहे. आदेश मला मान्य. मी मागची तीन वर्ष तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन केला. अनेक मीडियाची मंडळी माझ्याकडे यायची. पण मी आदेश मानला.' 

'मी उद्यापासून एकनाथ शिंदेंसोबत जाणार, सभा घेणार.. मीटिंग घेणार सगळं करणार मी. पण मातोश्रीवर कोणाला बोलू देणार नाही. उद्धवजींवर कोणाला टीका करु देणार नाही. जे शरद पवार आणि अजित पवार यांना हवं आहे ते मुळीच होऊ देणार नाही.' असं म्हणत रामदास कदम यांनी शरद पवार हेच सगळ्याला जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.

अधिक वाचा: शिंदे गटाला भाजपचा धक्का, CMच्या जवळील तिघांचा भाजप प्रवेश

रामदास कदम ढसाढसा रडले

'पण माझी पुन्हा विनंती आहे. उद्धवजींच्या आजूबाजूला जी लोकं आहेत ना अनिल परबसारखी जी लोकं बसली आहेत ना त्यांच्या पार्श्वभागावर लाथ घालून त्यांना हाकलून द्यावं उद्धवजींनी.' 

'मागचे १५-२० मी रात्रभर झोपलेलो नाही. मी फार अस्वस्थ आहे. मला झोप येत नाही (ढसाढसा रडले)... हा दिवस कधी येईल असं वाटलं नव्हतं. फार त्रास होतोय. मी ५२ वर्ष घालवली शिवसेनेत आणि माझ्यावर ही वेळ यावी. माझ्या मुलाला त्रास दिला, त्याला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न झाला. आम्ही काय वाईट केलं?' असं म्हणता म्हणता.. रामदास कदम यांना आपले अश्रू अनावर झाले अन् ते कॅमेऱ्यासमोरच ढसाढसा रडू लागले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी