भाजपचे आमदार फुटणार? 'सामना'तून मोठा गौप्यस्फोट

मुंबई
रोहित गोळे
Updated Dec 20, 2019 | 09:24 IST

Saamana Editorial: भाजपमधील काही आमदार हे फुटू शकतात अशा प्रकारचा एक इशाराच सामनाच्या अग्रलेखातून भाजपला देण्यात आला आहे. आजच्या अग्रलेखात शिवसेनेने भाजपवर बरीच टीका केली आहे.

will bjp mla splits big hint in saamana editorial 
भाजपचे आमदार फुटणार? 'सामना'तून मोठा गौप्यस्फोट  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • सामनातून भाजप आणि देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका
  • भाजपचे काही आमदार फुटण्याची शक्यता, सामनातून संकेत
  • सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेचा भाजपवर निशाणा

मुंबई: 'उद्धव ठाकरे यांचे चित्त शुद्ध आहे. त्यामुळे नवे मित्र मिळत राहतील. विरोधी पक्षाने सावधान राहावे हेच बरे! त्यांच्यातलेही बरेच जण सरकारचे मित्र बनू शकतात. कारण सरकारची नियत शुद्ध आहे!' असा गौप्यस्फोट शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तून करण्यात आला आहे. त्यामुळे आता भाजपचे आमदार फुटणार का? अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे शिवसेनेवर सतत टीका करत आहेत. त्यांच्या या टीकेला आता सामनामधून देखील उत्तर देण्यात आलं. सामनातील आजच्या (शुक्रवार) अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर बरंच तोंडसुख घेतलं आहे. 

'राज्यातले सरकार बहुमताचे आहे व विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे पुढील वर्षभर तरी ‘ठाकरे सरकार’वर अविश्वास दाखविण्याच्या भानगडीत फडणवीस यांनी पडू नये.' असा सल्लाच शिवसेनेने देवेंद्र फडणवीस आणि भाजपला दिला आहे. मात्र याचवेळी अग्रलेखातून फडणवीस यांना अशीही आठवण करुन देण्यात आली की, ‘सत्यमेव जयते’ व ‘प्राण जाय पर वचन न जाय’ हे सगळ्यात मोठे संतवचन. हे संतवचन भाजपने पाळले असते तर विरोधी पक्षात बसून ‘मळमळ’ ओकण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती.' त्यामुळे आता एकीकडे सभागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फडणवीसांवर हल्ला चढवित असताना दुसरीकडे संजय राऊत देखील सामनातून त्यांच्यावर टीकेची झोड उठवत आहेत.

 

'सामना'च्या अग्रलेखातील काही महत्त्वाचे मुद्दे:

  • कालचे सत्ताधारी विरोधी बाकावर गेले व दुसरे कोणी ध्यानीमनी नसताना सत्ताधारी बाकांवर आले म्हणून त्यांच्यात दुश्मनांचे नाते असता कामा नये, पण हे असे कसे घडले? या चिडीतून काम करणे बरे नाही. विरोधी पक्षनेते सध्या संत साहित्याचा अभ्यास करीत आहेत. त्यांना संतांच्याच भाषेत सांगायचे तर-
  • ‘‘चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्प तया’’।।
  • उद्धव ठाकरे यांचे चित्त शुद्ध आहे. त्यामुळे नवे मित्र मिळत राहतील. विरोधी पक्षाने सावधान राहावे हेच बरे! त्यांच्यातलेही बरेच जण सरकारचे मित्र बनू शकतात. कारण सरकारची नियत शुद्ध आहे!
  • एकीकडे संत तुकारामांचा गजर करायचा व त्याच वेळी वर्तणूक ‘मंबाजी’सारखी करायची. विरोधी पक्षाने एकदा काय ते ठरवायला हवे. संतवचने तुकाराम महाराजांची व कृती मंबाजीसारखी.
  • 105 आमदार निवडून येऊनही भारतीय जनता पक्ष सत्तेवर येऊ शकला नाही. ही एक पोटातली मळमळ विरोधी पक्षनेते व त्यांचे सहकारी विधानसभेत व्यक्त करीत आहेत. मळमळच ती, त्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे. लोकशाही परंपरेत विरोधी पक्षाला झुकते माप मिळायला हवे, पण झुकते माप म्हणजे फक्त मळमळ ओकणे व तंगड्या झाडणे नव्हे.
     

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी