CM Eknath Shinde : राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी कटिबद्ध, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

राज्यातील जनतेला न्याय देण्यासाठी, लोकांच्या मनातील सरकार साकार करण्यासाठी तसेच राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

eknath shinde and fadanvis
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  
थोडं पण कामाचं
  • राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी कटिबद्ध
  • सर्वांना विश्वासात घेऊन राज्याची पुढची वाटचाल करणार
  • लोकांनी विश्वास दाखवला आहे, कामातून गतिमान प्रशासनाचा संदेश पोहचवूया

Eknath Shinde : मुंबई : राज्यातील जनतेला न्याय देण्यासाठी, लोकांच्या मनातील सरकार साकार करण्यासाठी तसेच राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाच्या कक्षाला दिलेल्या भेटीच्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री पदावरुन जनतेची सेवा करण्याची संधी मला मिळाली असून त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता सर्वांना विश्वासात घेऊन राज्याची पुढची वाटचाल करणार असल्याचे सांगून शिंदे म्हणाले की, राज्यातील प्रगतीपथावर असलेल्या प्रकल्पांना अधिक गती देण्यात येईल. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खान्देश अशा राज्याच्या सर्वच भागांचा विकास करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची भूमिका व राज्याचा विकास या अजेंड्यावर राज्याची पुढील वाटचाल असेल, असेही शिंदे पुढे म्हणाले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत पीक-पाणी, जलयुक्त शिवार, मेट्रो प्रकल्प आदी विषयांवर चर्चा झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. समृद्धी महामार्ग राज्याचा गेमचेंजर प्रकल्प ठरणार असल्याचे सांगून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी सुरु केलेली जनहिताची कामे पुढे नेण्यात येतील, असेही ते म्हणाले. पत्रकारांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही शेवटी मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दुप्पट वेगाने कामे मार्गी लावू, असा विश्वास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

लोकांनी विश्वास दाखवला आहे, कामातून गतिमान प्रशासनाचा संदेश पोहचवूया

लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. आपल्या कामातून शासन प्रशासन गतिमान आहे, हा संदेश देऊया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीनंतर सचिव तसेच वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीस उपस्थित होते.

मंत्रिमंडळ बैठकीत दि. 2 व 3 जुलै रोजी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिवेशनात पहिल्याच दिवशी  विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

मंत्रालयातील समिती सभागृहात झालेल्या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, ‘आपण नवीन सुरुवात करत आहोत. आपल्यासोबत अनुभवी असे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे कारभार करण्यास अडचण येणार नाही. राज्यातील विकास कामे, विविध प्रकल्प यांना गती द्यावी लागेल. विविध समाज घटकांना न्याय देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी हातात हात घालून काम करावे लागते. शासन आणि प्रशासन ही एका रथाची दोन चाके आहेत.  लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. तो आपल्याला सार्थ ठरवायचा आहे. आपल्या कामातून गतिमान शासन प्रशासन आहे, असा संदेश आपण कामांच्या माध्यमातून देऊया. मेट्रोचे प्रकल्प, हिंदूहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग तसेच जलसंपदा विभागाचे महत्त्वाचे प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावयाचे आहेत. त्यासाठी प्रशासनाचे सहकार्य मिळेलच, हा विश्वास आहे.’

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी