सत्तास्थापनेविषयी अतिशय मोठी बातमी, पाहा मुनगंटीवार काय म्हणाले!

मुंबई
रोहित गोळे
Updated Nov 07, 2019 | 13:39 IST

Sudhir Mungantiwar: भाजप अल्पमतातील सरकार स्थापन करणार नाही. शिवसेनेच्या पाठिंब्यावरच राज्यात स्थिर सरकार स्थापन करु. असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. 

without the support of shiv sena bjp will not form a government says sudhir mungantiwar
सत्तास्थापनेविषयी अतिशय मोठी बातमी, पाहा मुनगंटीवार काय म्हणाले!  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार हे आज (गुरुवार) दुपारी अडीच वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेणार आहेत. मात्र त्याआधी सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन एक मोठी बातमी दिली आहे. 'आम्ही अल्पमतातील सरकार बनविणार नाही. शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय भाजप सत्ता स्थापन करणार नाही.'  असं स्वत: सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं आहे. याशिवाय सुधीर मुनगंटीवार यांनी असंही स्पष्ट केलं आहे. भाजप आज सत्तास्थापनेचा दावा करणार नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेचा तिढा अद्यापही कायम सुरु आहे. दुसरीकडे शिवसेनेच्या आमदारांची आज मातोश्रीवर बैठकही बोलावण्यात आली आहे. या बैठकीत शिवसेना काय निर्णय घेणार याकडे देखील भाजपचं लक्ष असणार आहे. 

सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आज अनेक गोष्टींचा खुलासा केला. भाजप फक्त शिवसेनेच्याच पाठिंब्यावर सत्ता स्थापन करेल. त्यामुळे अद्यापही शिवसेनेशी चर्चा सुरु आहेत. असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. याचवेळी मुनगंटीवार असंही म्हणाले की, 'देवेंद्र फडणवीस हे देखील शिवसैनिकच आहेत. त्यामुळे त्यांच्या रुपाने शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार आहे.' असं म्हणत भाजप आपलं मुख्यमंत्रीपद न सोडण्यावर अद्यापही ठाम असल्याचं समजतं आहे. 

पाहा सुधीर मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले:

'आम्ही आज राज्यपालांची भेट घेणार आहोत. पण यावेळी आम्ही फक्त राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत राज्यपालांशी चर्चा करणार आहोत. भाजप आणि शिवसेनेत चर्चा सुरु नाही असं मीडियाच्या माध्यमातून दिसत असलं तरी,   तसं अजिबात नाही. आमची चर्चा सुरु आहे. शिवसेनेसोबत सरकार बनवावं अशीच भाजपची इच्छा आहे. त्यामुळे त्यांच्या पाठिंब्याशिवाय आम्ही सरकार स्थापन करणार नाही. राज्यात स्थिर सरकार यावं यासाठीच भाजपने आजपर्यंत वाट पाहिली आहे. आम्ही अल्पमतातील सरकार बनविणार नाही.' 

'शिवसेना म्हणते की, त्यांच्या मुख्यमंत्री हवा. पण देवेंद्र फडणवीस हे शिवसैनिकच आहेत. तसं स्वत: उद्धव ठाकरे देखील अनेकदा म्हणाले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार आहे. फडणवीस हे शिवसैनिकच आहेत असं समजावं.' असं म्हणत मुनगंटीवार यांनी शिवसेनेला चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. 

'उद्धवजी हे युतीचे मार्गदर्शक आहेत. असं स्वत: मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं होतं. त्यामुळे आमची युती ही फक्त शिवसेनेशीच असणार आहे. त्यामुळे आमचा दुसरा विचार नाही.' असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी सत्तास्थापनेविषयी अद्यापही शिवसेनेशी चर्चा सुरु असल्याचा दावा केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी