'त्या' जिल्ह्यांमध्ये उद्योग सुरु करण्यासाठी कार्ययोजना सादर करणार: उद्योगमंत्री

मुंबई
पूजा विचारे
Updated Apr 14, 2020 | 22:38 IST

येत्या दोन दिवसात ही कार्ययोजना सादर करण्यात येऊन लवकरच उद्योग व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

Subhash Desai
'त्या' जिल्ह्यांमध्ये उद्योग सुरु करण्यासाठी कार्ययोजना सादर करणार: उद्योगमंत्री  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबईः  राज्यातील कोरोनाची लागण तसंच संक्रमण नाही किंवा कमी आहे अशा जिल्ह्यात उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्याचा उद्योग विभाग कार्ययोजना तयार करत आहेत. येत्या दोन दिवसात ही कार्ययोजना सादर करण्यात येऊन लवकरच उद्योग व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. सुभाष देसाई आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जयंतीनिमित्त आणि दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) च्या 15 व्या स्थापना दिनानिमित्त बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील डिक्कीच्या सदस्यांना संबोधित केलं.

व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून सुभाष देसाई यांनी आज डिक्कीच्या सर्व जिल्ह्यातील सदस्य आणि पदाधिकारी अशी अनौपचारिक चर्चा केली. यावेळी डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे, डिक्की वेस्ट इंडियाचे अध्यक्ष निश्चय शेळके, डिक्की वेस्ट इंडियाचे बँकिंग प्रमुख विजय सोमकुवर,  डिक्की महाराष्ट्रचे अध्यक्ष संतोष कांबळे, डिक्की मुंबईचे अध्यक्ष अरुण धनेश्वर, डिक्की विदर्भचे अध्यक्ष गोपाल वासनिक, मराठवाडाचे अध्यक्ष मनोज आदमने, मुंबईचे उपाध्यक्ष पंकज साळवे यांच्यासह 100 डिक्की उद्योजक आणि त्यांचे सहकारी असे 500 जण सहभागी झाले होते. 

यावेळी लघु, मध्यम आणि सूक्ष्म उद्योगांना कोरोनाच्या संकटामुळे येणाऱ्या अडचणी डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, निश्चय शेळके, संतोष कांबळे आणि पंकज साळवे आदींनी विषद केल्या. 

यात प्रामुख्याने उद्योगांना या संकटामुळे खेळते भांडवलाची कमतरता, आरबीआयने बँकांना तीन महिने ईएमआय भरण्यास अवधी दिला असला तरी त्यावर चक्रवाढ व्याज आकारण्यात येणार आहे. त्यामुळे व्यावसायिक पुन्हा अडचणीत येणार आहे.  त्याचप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर लघु उद्योजक विशेष प्रोत्साहन योजना, स्टँडअप इंडिया योजनेअंतर्गत 15 टक्के मार्जिन मनी अनुदान इत्यागी संबधित विषय उद्योगमंत्री यांच्याकडे मांडण्यात आले. 

या सर्व विषयांवर सर्व संबंधितांची बैठक बोलविण्यात येऊन तोडगा काढण्यात येईल तसंच या संकटावर मात करण्यासाठी राज्याचा उद्योग विभाग लवकरच कृती आराखडा निर्माण करत असून सर्व उद्योजकांच्या अडचणी तातडीने दूर करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन उद्योगमंत्री यांनी दिले. डिक्की पदाधिकारी आणि सदस्यांनी दिलेल्या विविध नाविन्यपूर्ण कल्पनांचे त्यांनी स्वागत केले आणि त्या अंमलात आणणार असल्याचंही त्यांनी सांगितले.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी