BMC Election 2022 :मुंबईकरांना नववर्षाची भेट, ५०० चौ.फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द, महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

मुंबई
Updated Jan 02, 2022 | 18:13 IST

ahead of bmc election mumbai property tax waive by cm uddhav thackeray मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मुंबईकरांचा मालमत्ता कर माफ केला आहे. यामुळे १६ लाख कुटुंबाना लाभ होणार आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन महिन्यांच्या कालावधीनंतर व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.

थोडं पण कामाचं
  • शिवसेना मुंबईकरांच्या आशीर्वादाने मुंबई सांभाळत आहे 
  • मुंबईकरांना दिलासाही द्यायचा आहे
  • मुंबईकर म्हणजे नुसते कर भरणारे नाही

BMC Election 2022 : मुंबई : या वर्षी मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूरसहन अनेक पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. यावेळी शिवसेनेने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मुंबईकरांचा मालमत्ता कर माफ केला आहे. यामुळे १६ लाख कुटुंबाना लाभ होणार आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन महिन्यांच्या कालावधीनंतर व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते विधीमंडळाच्या अधिवेशनातही गैरहजर होते. आज नववर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी मुंबईकरांना भेट दिली. मुंबईकरांचा मालमत्ता कर माफ करण्याची त्यांनी घोषणा केली. (ahead of bmc election mumbai property tax waive by cm uddhav thackeray)

शिवसेना मुंबईकरांच्या आशीर्वादाने मुंबई सांभाळत आहे 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की,  १९६६ पासून जन्माला आलेली शिवसेना मुंबईकरांच्या आशीर्वादाने मुंबई सांभाळत आहे. समाजकारणातील ही  आमची ही चौथी पिढी असून  माझे आजोबा,वडील, मी आणि आता आदित्य काम पाहतोय. फक्त काम म्हणून नाही, कर्तव्य म्हणून नाही तर मुंबईवरचं प्रेम आम्ही पुढे नेत आहोत असे उद्धव ठाकरे म्हणाले.  

मुंबईकरांना दिलासाही द्यायचा आहे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वत: जाऊन कामाची पहाणी करत. मी सुद्धा नालेसफाई, दहिसर नदीचे काम असेल  किंवा सौंदर्यीकरणाचे काम असेल ते जाऊन पहात होतो आता हे काम आदित्य करत आहे. नागरिकांना सुविधा द्यायच्याच आहेत, नालेसफाई, सौंदर्यीकरण असेल, नदीसफाई असेल, पण हे करतांना मुंबईकरांना दिलासाही द्यायचा आहे असेही ठाकरे म्हणाले. 

मुंबईकर म्हणजे नुसते कर भरणारे नाही

मुंबईकर म्हणजे नुसते कर भरणारे नाही. दोन्ही हाताने सगळ्यांना पैसा देणारा हा मुंबईकर राज्याच्या विकास कामांमध्ये मोलाचे योगदान देतो. पण त्याला परत काय मिळतं हा खरा प्रश्न आहे. असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. तसेच मतदानापूर्वी तारे तोडून आणण्याची भाषा करणारे नंतर पाच वर्षे काहीच बोलत नाहीत. शिवसेना हे असे अजिबात करत नाहीत असा दावाही त्यांनी यावेळी केला. आता शिवसेनेसोबत आणखी काही मित्र आले. मग राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल.  शिवसेनाप्रमुखांनी आखून दिलेली परंपरा शिवसेना जपते.  जे काम जमणार असेल तेच वचन द्यायचे, जे जमणार नाही अशी खोटे वचने द्यायची नाहीत, त्यांची हीच परंपरा आपण पुढे नेत आहोत असेही उद्धव ठाकरे म्हणाले. 

नागरिकांना दिलेल्या वचनासाठी आम्ही वचनबद्ध

२०१७ ला जे निवडणूकीत शिवसेनेने जे वचन दिले ते पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, यातील बहूतांश वचने पूर्ण केली. आज एक महत्वाचे वचन या निर्णयाने पूर्ण होत आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. ५०० चौ. फुटापर्यंतच्या घराच्या मालमत्ताकर माफ करणे हे महत्वाचे वचन आपण आज पूर्ण करत आहोत. हा निर्णय घेण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांना सर्वांना मुंबईकरांच्यावतीने धन्यवाद देतो तसेच देशाचा आर्थिक केंद्र असणाऱ्या मुंबईकरांना हा दिलासा देण्याचा प्रयत्न. ज्यांनी कष्ट करून घाम गाळून मुंबईला उभी केली त्यांच्यासाठी हा निर्णय, त्यांच्यासाठीच्या वचनाला आपण आज जागलो आहोत असे सांगताना या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करा असे आदेशही मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. तसेच  सामान्य माणसांचे जीवन सुसह्य करण्‍याचा हा प्रयत्न असून मला जाणीव आहे की केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेला देणे हे आपले कर्तव्य आहे.  मुंबईकरांना वचन देतो,  तुमच्या सगळ्या  गोष्टीची पुर्तता करण्यास, दिलेली वचन पूर्ण करण्यास मी वचनबद्ध आहे फक्त तुमचे आशीर्वाद आमच्यावर असू द्या असे आवाहनी त्यांनी यावेळी केली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी