सरकारमधील वाचाळवीरांना अजितदादांनी खडसावले

मुंबई
Updated Nov 15, 2022 | 19:24 IST

तुमच्यामध्ये वाचाळवीरांचे मोठं प्रस्थ वाढले आहे. काही मंत्री बोलत आहेत त्यातून मंत्रीमंडळाची प्रतिमा खराब होत आहे. लोक ऐकून घेत असतात...पहात असतात ...लक्षात ठेवत असतात ...काहीजण सहज बोललो म्हणत आहेत...

थोडं पण कामाचं
  • यशवंतराव चव्हाण साहेबांनी घालून दिलेली महाराष्ट्राची परंपरा... घडी विस्कटवू नका... - मा. अजितदादा पवार
  • मध्यंतरी अब्दुल सत्तार हे माझी बहीण सुप्रिया हिला काही बोलले... विनाशकाले विपरीत बुद्धी.
  • अंबरनाथमध्ये दोन गटात गोळीबार करण्याची घटना बैलगाडी शर्यतीत घडली.

मुंबई : तुमच्यामध्ये वाचाळवीरांचे मोठं प्रस्थ वाढले आहे. काही मंत्री बोलत आहेत त्यातून मंत्रीमंडळाची प्रतिमा खराब होत आहे. लोक ऐकून घेत असतात...पहात असतात ...लक्षात ठेवत असतात ...काहीजण सहज बोललो म्हणत आहेत... तुम्ही सहज बोलायला नागरिक नाही... तुम्ही राज्याचे प्रतिनिधी आहात, मंत्री आहात. तुम्ही शपथ घेतलेली आहे... तुमच्यावर एक जबाबदारी दिलेली आहे, अशा शब्दात राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी सरकारमधील वाचाळवीरांना खडसावले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालय येथे आज जनता दरबार उपक्रमा दरम्यान विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मध्यंतरी अब्दुल सत्तार हे माझी बहीण सुप्रिया हिला काही बोलले... विनाशकाले विपरीत बुद्धी... हेच त्यांना बोलले पाहिजे... काय आपण बोलतोय... मंत्री केलं म्हणजे वेगळे झाले का... मंत्री पदे येतात... जातात... कोण आजी... कोण माजी असतात. परंतु शेवटी आपण नागरिक आहोत संविधान... कायदा... नियम याचा सर्वांनी आदर करायचा असतो पण यामध्ये हे चुकत आहेत असे स्पष्ट मत अजितदादा पवार यांनी यावेळी व्यक्त केले.

अधिक वाचा : कोणत्या राशीची व्यक्ती फोनवर कशा प्रकारे बोलते?

अंबरनाथमध्ये दोन गटात गोळीबार करण्याची घटना बैलगाडी शर्यतीत घडली... बैलगाडी शर्यतीमध्ये दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना घडतेय... सरकार काय करतंय?... ठाण्यात किसननगर भागात शिंदे - ठाकरे गटात राडा झाला अशी राडेबाजी करुन चालणार नाही...पोलिसांना बाकीच्यापेक्षा याच गोष्टीकडे लक्ष द्यावे लागेल. हे काय चालेल आहे असा सवालही अजितदादा पवार यांनी सरकारला केला.
किती लोकांना 'वाय प्लस' दर्जाची सुरक्षा पुरवली आहे याची माहिती माहितीच्या अधिकारात मागवली आहे असे सांगतानाच त्यांना खरंच 'वाय प्लस' दर्जाची सुरक्षा आवश्यक आहे का? ... काहींचा तर ३० - ३० सरकारी गाड्यांचा ताफा फिरत आहे. मी उपमुख्यमंत्री होतो जास्त गाड्या असल्या की नको सांगत होतो. हा पैसा तुमचा नाही... सरकारकडे टॅक्स रुपाने आलेला आहे. 

ज्या आमदाराला कुठल्याही पक्षाच्या बंदोबस्त द्यायचा असेल तर जरुर द्या आणि तो दिलाही पाहिजे त्यांचे व नागरिकांचे संरक्षण करणे, महाराष्ट्रातील शेवटच्या जनतेचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. परंतु सरसकट सगळ्यांना? ... काही माजी नगरसेवकांना सरकारी संरक्षण... कोण त्याला काय करतंय... तो माजी झाला ना... त्याने गंभीर चुका केल्या असतील तर तो निस्तारेल... त्यासाठी सरकारी यंत्रणांचे संरक्षण देण्याची काय आवश्यकता असा संतप्त सवालही अजितदादा पवार यांनी केला.

अधिक वाचा : लग्नसराईसाठी या साड्यांचे कलेक्शन तुमच्याकडे असायलाच हवं....

विरोधी पक्षनेता म्हणून नागरिक म्हणून सरकार आल्यापासून कसं काम सुरू आहे सरकार कसं आलं या खोलात जात नाही. ४० आमदार कसे फुटले आणि पुढच्या घडामोडी आता ते प्रकरण कोर्टात सुरु आहे. त्यावेळेपासून प्रशासन पाहिजे असे काम करताना दिसत नाही. सुरुवातीला बराच काळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या दोघांवर राज्याचा लोढ होता. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार केला. १८ लोकांचा समावेश केला. २० लोकांचे मंत्रिमंडळ आहे. त्यावेळी किती लोकांनी चार्ज घेतला. काहीजण आपल्या मिळालेल्या खात्यावर नाराज आहेत. मी अनेक वर्षाच्या म्हणजे ३२ वर्षाच्या कारकीर्दीत वेगवेगळ्या महत्त्वाच्या खात्यावर, उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आहे . 

बैठका कशा घेत होतो. वेळेवर बैठका होत होत्या. बैठका रद्द होत नव्हत्या. अधिकार्‍यांना ताटकळत बसावे लागत नव्हते. परंतु आता तसं अजिबात होत नाही. पोलिसांचे चांगले प्रशासन म्हणून जगभर ओळख आहे. परंतु या सरकारच्या काळात राज्यात पोलिस तणावाखाली काम करत आहे असेही अजितदादा पवार यांनी सांगितले.

काल ठाण्यात गेलो होतो तिथे अनेक लोकांनी भेटून सांगितले इथे पोलिस ऐकून घेत नाही. पोलिसांना वरीष्ठ पातळीवरून फोन येतात आणि तसे पोलिस बोलून दाखवत आहेत आमच्यावर दबाव आहे. हे महाराष्ट्राला भूषणावह अजिबात नाही असे सांगतानाच अशा तणावाखाली पोलिस यंत्रणा काम करत राहिली किंवा मंत्रालयातील सचिव दर्जाचे अधिकारी तणावाखाली काम करतात. त्यांना डायरेक्ट आदेश सीएम कार्यालयातून येतात असेही अजितादादा पवार म्हणाले.

अधिक वाचा : रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे आहेत सोपे उपाय

आता चार महिन्यात तुमच्या - माझ्या राज्यात चाललेली जी परिस्थिती आहे ती अशीच जर राहिली तर राज्याचे चित्र गंभीर व्हायला वेळ लागणार नाही अशी भीतीही अजितदादा पवार यांनी व्यक्त केली.
पोलिस आणि सचिवांनी आपली भूमिका कणखर मांडली पाहिजे. भारतात आपल्या राज्याचा नावलौकिक आहे तो ढासळू देता कामा नये. जी महाराष्ट्राची यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेली परंपरा, घडी आहे ती घडी विस्कटू न देता सत्ताधारी पक्षाचे लोक, मंत्रिमंडळातील लोक चुकत असतील तर त्यांना स्पष्ट सांगितले पाहिजे असा सल्लाही अजितदादा पवार यांनी दिला.

अधिक वाचा : जोडपे घटस्फोट का घेतात

या वाचाळवीरांना आवरा... त्यांना ताबडतोब सूचना द्या... महाराष्ट्राची जी परंपरा त्याला गालबोट लावू देऊ नका. महाराष्ट्राच्या परंपरेला जपलं पाहिजे ती महाराष्ट्राची संस्कृती आहे. परंतु आज विधारक चित्र पाहायला मिळत आहे हे कुठेतरी थांबले पाहिजे असे स्पष्ट मत अजितदादा पवार यांनी व्यक्त केले.
'हर हर महादेव' हा चित्रपट तज्ज्ञ लोकांना घेऊन बघेन आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन माहिती देईन. छत्रपती शिवाजी महाराजांची इतिहासाची मोडतोड केलेली महाराष्ट्राला परवडणारा नाही असेही अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी