वाझे प्रकरणात एका महिलेला अटक

मुंबई
Updated Apr 02, 2021 | 17:18 IST

'Mystery woman' seen with Sachin Waze in hotel held सचिन वाझे प्रकरणात एनआयएने एका महिलेला अटक केली.

थोडं पण कामाचं

 • वाझे प्रकरणात एका महिलेला अटक
 • अटक केलेली महिला वाझे सोबत फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये वावरत असल्याचे सीसीटीव्ही फूटेज
 • विमानतळावरुन वाझे प्रकरणाशी संबंधित असलेल्या महिलेला अटक

मुंबईः सचिन वाझे प्रकरणात एनआयएने एका महिलेला अटक केली. ही महिला वाझे सोबत फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये वावरत असल्याचे सीसीटीव्ही फूटेज हाती आले आहे. हे फूटेज मिळाल्यापासून एनआयए संबंधित महिलेला शोधत होती. अखेर विमानतळावरुन वाझे प्रकरणाशी संबंधित असलेल्या महिलेला अटक करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी रात्री उशिरा झाली. महिलेला अटक केल्यानंतर तिच्या मिरा रोड येथील फ्लॅटची झडती घेण्यात आली. ('Mystery woman' seen with Sachin Waze in hotel held; report says she used to convert black money into white)

वाझे प्रकरणात अटक केलेली महिला वसुली करुन गोळा केलेला बेहिशेबी पैसा (काळा पैसा) वेगवेगळ्या मार्गाने फिरवण्याचे काम करत होती. काळा पैसा पांढरा करणे हे अटक केलेल्या महिलेचे मुख्य काम होते. सध्या एनआयए अटक केलेल्या महिलेची चौकशी करत आहे. या चौकशीतून आणखी धक्कादायक माहिती हाती येण्याची शक्यता आहे. 

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवल्याप्रकरणी सचिन वाझे याला अटक झाली आहे. सध्या वाझे एनआयएच्या कोठडीत आहे. मुंबई पोलीस दलातून ख्वाजा युनुस बनावट चकमक प्रकरणात वाझेचे काही वर्षांपूर्वी निलंबन झाले होते. कोरोना संकटाचे निमित्त करुन वाझेला २०२० मध्ये पुन्हा सेवेत घेण्यात आले. एपीआय असूनही वाझेकडे मुंबई पोलिसांच्या क्राइम इंटेलिजन्स युनिटची जबाबदारी सोपवण्यात आली. तसेच अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास देण्यात आला. अंबानींच्या घराजवळ स्फोटकांची गाडी आपणच बघितल्याचे जाहीर करणाऱ्या वाझेकडेच या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला होता. मात्र एक एक गौप्यस्फोट होऊ लागल्यानंतर वाझेकडून या प्रकरणाचा तपास काढून घेण्यात आला. पुढे स्फोटकांशी संबंधित असलेल्या या प्रकरणाचा तपास एनआयएने हाती घेतला. यानंतर सचिन वाझे यालाच अटक झाली आणि संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले. पोलीस दलातून वाझेचे दुसऱ्यांदा निलंबन झाले.

एनआयएने वाझे प्रकरणात अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतले आहे. वाझेच्या पोलीस दलातील सहकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. तसेच सचिन वाझे याने पुरावे नष्ट करण्यासाठी मिठी नदीत टाकलेल्या अथवा ठिकठिकाणी लपवून ठेवलेल्या वस्तू आणि गाड्या यांची जप्ती सुरू झाली. सचिन वाझे याने मागील काही दिवसांत कागदोपत्री केलेल्या नोंदींचा तपास करण्यासाठी अनेक कागदपत्रे तसेच मोबाइल, आयपॅड, कॉम्प्युटर अशा अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंची जप्ती करण्यात आली आहे.

मनसुख हिरेन याच्या हत्येमध्ये हात असल्याच्या संशयावरुनही वाझे आणि त्याच्या सहकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. तपास सुरू असतानाच वाझे मुंबईत ज्या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये काही काळ वास्तव्यास होता तिथल्या फूटेजमध्ये एक महिला आढळली. ही महिला वाझेसोबतच फिरत असल्याचे दिसले. यानंतर एनआयएने महिलेला शोधून विमानतळावरुन अटक केली.

अटक केलेली महिला नोटा मोजण्याचे यंत्र वापरुन हॉटेलच्या खोलीत बसून नोटा मोजत होती. नंतर वसुली करुन गोळा केलेला बेहिशेबी पैसा (काळा पैसा) वेगवेगळ्या मार्गाने फिरवण्याचे काम करत होती. महिलेच्या मिरा रोड येथील फ्लॅटची झडती घेण्यात आली.

वाझे प्रकरणात जप्त केलेल्या कार

 1. स्कॉर्पिओ - २५ फेब्रुवारी २०२१, गाडीत स्फोटके (जिलेटीनच्या कांड्या) सापडली
 2. इनोव्हा - १५ मार्च २०२१, वाझे इनोव्हातून स्कॉर्पिओच्या मागे मागे फिरत असल्याचे फूटेज एनआयएच्या हाती
 3. काळी मर्सिडिझ बेंझ - १६ मार्च २०२१, मुंबईतील पोलीस गॅरेजमध्ये आढळली, वाझेने या गाडीचा वापर केल्याची दिली माहिती
 4. निळी मर्सिडिझ बेंझ - १८ मार्च २०२१, क्रॉफर्ड मार्केट परिसरातून जप्त, वाझेने या गाडीचा वापर केल्याची दिली माहिती
 5. लँड क्रूझर प्राडो - १८ मार्च २०२१, ठाण्यातून केली जप्त, वाझेने या गाडीचा वापर केल्याची दिली माहिती
 6. वॉल्वो - २२ मार्च २०२१, दमणमधून महाराष्ट्र एटीएसने केली जप्त
 7. आऊटलँडर - ३० मार्च २०२१, नवी मुंबईतील कामोठेमधून केली जप्त
 8. ऑडी - ३१ मार्च २०२१, वसई-विरारमधून केली जप्त

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी