Balasaheb Thackeray Memorial: बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक भूमिपूजन सोहळा संपन्न, पाहा कसे असेल हे स्मारक

मुंबई
Updated Mar 31, 2021 | 18:19 IST

Balasaheb Thackeray National Memorial bhoomi pujan: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होत आहे. 

थोडं पण कामाचं

  • शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन
  • हे स्मारक शिवतीर्थ, दादर येथील जुन्या महापौर निवासस्थानी येथे उभारले जाणार 

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते होत आहे. हे स्मारक मुंबईतील महापौर निवास, दादर येथे उभारले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी संबंधातील बंधने लक्षात घेऊन मोजक्या उपस्थितांसह भूमिपूजन समारंभ पार पडला असून त्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण सुद्धा करण्यात आले. 

या भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीचे अध्यक्ष आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर हे उपस्थित होते.

स्मारकासाठी ४०० कोटी रुपयांचा खर्च

महापौर निवासस्थान परिसरातील जागेवर उभारण्यात येणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक प्रकल्पासाठी ४०० कोटी रुपयांच्या खर्चास राज्य मंत्रिमंडळाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. त्यानुसार, प्रकल्पाच्या कामाच्या प्राधान्यानुसार टप्पा १ आणि २ स्वरूपात काम हाती घेण्याबाबत निश्चिती करण्यात आळी आहे. सदर प्रकल्पाच्या टप्पा १ मध्ये सर्व इमारतीचे बांधकाम प्रस्तावित असून यामध्ये स्थापत्य, विद्युत, वातानुकुलित यंत्रणा उभारणी, इमारतीच्या अंतर्गत व बाह्य सजावट, वाहनतळ उभारणी, बागबगिचा तयार करणे. रेनवॉटर हार्वेस्टिंग इत्यादी कामांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यासाठी अंदाजित २५० कोटी रुपये (करांसहित) अंदाजित खर्च आहे.

दुसऱ्या टप्प्यात तंत्रज्ञान, लेझर शो, डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, कथा/गोष्टी सांगणे. चित्रपट, व्हर्च्युअल रिअॅलिटी, ऑडिओ व्हिज्युअल आणि तांत्रिक घटक इत्यादी कामे इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास येत असताना हाती घ्यावयाचे प्रस्तावित आहे. या दुसऱ्या टप्प्यासाठी १५० कोटी रुपये (करांसहित) खर्च अपेक्षित आहे. अशा रितीने टप्पा १ आणि २ साठी कामाची एकूण ४०० कोटी रुपये अंदाजित खर्च निश्चित करण्यात आला आहे. 

ऐतिहासिक ठिकाणी राष्ट्रीय स्मारक

बाळासाहेब ठाकरे यांच्या विराट सभांनी गाजलेले शिवाजी पार्क मैदान एका बाजूला तर दुसऱ्या बाजुला अथांग अरबी समुद्र या दोघांच्या मध्यभागी असलेल्या जुन्या महापौर निवास या ऐतिहासिक ठिकाणी हे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक होत आहे. या स्मारकामुळे जगभरातील बाळासाहेबांच्या चाहत्यांची प्रतिक्षा पूर्ण होईल अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

स्मारक प्रकल्पाच्या वास्तुशिल्पाचा आराखडा बनवण्यासाठी एक स्पर्धा आयोजित केली होती. विविध वास्तुविशारदांनी सादर केलेल्या आराखड्यांमधून मुंबईतील सुप्रसिद्ध वास्तुविशारद श्रीमती आभा लांबा यांनी तयार केलेला आराखडा सर्वोत्कृ्ष्ट ठरला. राज्य शासनाने या स्मारक योजनेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी प्रकल्प समन्वयीन यंत्रणा म्हणून नियुक्ती केली. स्मारकासाठी भू वापर व पर्यावरणासंबंधीच्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या असून वास्तू उभारणीचा पहिला टप्पा १४ महिन्यांमध्ये पूर्ण केला जाणार असल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी