[VIDEO]: छगन भुजबळ यांची शिवसेनेत पुन्हा एन्ट्री?

मुंबई
Updated Jul 25, 2019 | 11:12 IST | Times Now

Chhagan Bhujbal: राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते छगन भुजबळ हे पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. पाहूयात याच संदर्भात सविस्तर वृत्त...

Chhagan Bhujbal
छगन भुजबळ 

थोडं पण कामाचं

  • छगन भुजबळ यांची पुन्हा घरवापसी?
  • छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा
  • २७ जुलै रोजी भुजबळांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: विधानसभा निवडणुकींपूर्वी राज्यात मोठा राजकीय हालचाली होत असल्याचं दिसत आहे. कारण, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छनग भुजबळ हे पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं वृत्त समोर येत आहे. छगन भुजबळ हे शरद पवारांच्या खूपच जवळचे सहकारी आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आहेत. छगन भुजबळ यांच्यामागे कार्यकर्त्यांची मोठी ताकद आहे तसेच त्यांचा एक दांडगा जनसंपर्क सुद्धा आहे. छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या माध्यमातून राज्यभरात ओबीसी समाजाचं संघटन केलं असून ओबीसी समाजही त्यांच्या पाठिशी आहे. या सर्वांमुळे छगन भुजबळ यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक जबरदस्त मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. 

उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला शिवसेनेत प्रवेश

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा २७ जुलै रोजी वाढदिवस आहे. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच २७ जुलै रोजी छगन भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करतील असं बोललं जात आहे. छगन भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र, या संदर्भात शिवसेनेकडून अद्याप कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये.

 

छगन भुजबळ यांच्याकडून वृत्ताचं खंडन

दरम्यान छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या निव्वळ अफवा आहेत आणि शिवसेना प्रवेशाचं छगन भुजबळ यांनी खंडन केलं असल्याचं वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिलं आहे. 

सचिन अहिर यांचा शिवसेनेत प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई शहर अध्यक्ष सचिन अहिर हे आज (२५ जुलै) शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. सचिन अहिर यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पदाधिकारी सुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. सचिन अहिर यांचा मुंबईत चांगला जनसंपर्क आहे तसेच त्यांच्या समर्थकांची फौजही मोठी आहे त्यामुळे याचा मोठा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसणार आहे. तर, आगामी विधानसभा निवडणुकीत सचिन अहिर यांचा शिवसेनेला मोठा फायदा होणार आहे.

सचिन अहिर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आहेत. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सुनिल शिंदे यांनी त्यांचा पराभव केला. आघाडी सरकारच्या काळात सचिन अहिर यांच्याकडे गृहनिर्माण राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती. 

सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने त्याचा मोठा फायदा शिवसेनेला होईल असं बोललं जात आहे. तसेच वरळी मतदारसंघातून युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर आदित्य ठाकरे यांच्या विजयाचा मार्ग अगदी सुकर होणार आहे. तर सचिन अहिर हे भायखळा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत आणि या मतदारसंघातून त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...