ओबीसी ठरावावरून फडणवीसांना मिर्च्या का झोंबल्या, मुख्यमंत्र्यांचा सवाल 

मुंबई
Updated Jul 07, 2021 | 19:27 IST

राज्यातील ओबीसींचे संपुष्टात आलेले आरक्षण परत मिळविण्यासाठी केंद्राकडे असलेला इम्पिरियल डेटा मागण्याचा ठराव आम्ही केला. पण तुम्हाला का मिर्च्या झोंबल्या ?

थोडं पण कामाचं

  • राज्यातील ओबीसींचे संपुष्टात आलेले आरक्षण परत मिळविण्यासाठी केंद्राकडे असलेला इम्पिरियल डेटा मागण्याचा ठराव आम्ही केला.
  • जी माहिती अधिकृतपणे राज्य सरकारकडे नाही ती माहिती तुमच्याकडे कशी आली असा उपरोधिक टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना त्यांचे नाव न घेता लगावला.
  • पावसाळी अधिवेशन पार पडल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुंबई : राज्यातील ओबीसींचे संपुष्टात आलेले आरक्षण परत मिळविण्यासाठी केंद्राकडे असलेला इम्पिरियल डेटा मागण्याचा ठराव आम्ही केला. पण तुम्हाला का मिर्च्या झोंबल्या ? असा सवाल करत जी माहिती अधिकृतपणे राज्य सरकारकडे नाही ती माहिती तुमच्याकडे कशी आली असा उपरोधिक टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना त्यांचे नाव न घेता लगावला. ज्या डेटा मध्ये ८ कोटी चुका असून महाराष्ट्रात ६९ लाखाची चुकीची माहिती असल्याचे सांगता मग या डेटाच्या आधारेच जर तुम्ही उज्वला गॅस योजना राबवित असाल तर हा कोणासाठी आर्थिक घोटाळा सुरु आहे, अशी विचारणाही त्यांनी यावेळी केली.

पावसाळी अधिवेशन पार पडल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, संसदीय कार्यमंत्री अनिल परब, संसदीय राज्यमंत्री संजय बनसोड आदी उपस्थित होते.

झालेला प्रकार हा लाजीवाणं होता जे काही घडलं ते शर्मेने मान खाली घालायला लावणारा प्रकार होता. महाराष्ट्रात घडलेल्या गोष्टींचा पायंडा देशात पडायला नको अशी टीकाही त्यांनी विरोधकांवर केली.

या ठरावाच्या मुद्यावरून इतका आरडाओरडा करण्यापेक्षा, निलंबनापर्यंत जाण्यापेक्षा त्यांनी वेगळ्या पद्धतीने आपला निषेध किंवा म्हणणे मांडायला हवे होते. नाहीतर ही मागणी निरोपयोगी आहे असे सांगायला पाहिजे होते. पण त्यांना देण्याची इच्छा नसल्यानेच त्यांनी हा गोंधळ घातला असून आम्ही केलेल्या गोष्टीने जर काळीमा फासला तर त्यांच्या कृत्याने काय पांढरीमा फासलाय का? असा उपरोधिक सवालही त्यांनी केला.

काल जे काही घडलं ते लाजीरवाणं होतं. जनतेने तुम्हाला अशा ठिकाणी पाठवलंय की ज्या ठिकाणी बदल घडतो. निर्णय होतो अशा लोकशाहीच्या पवित्र मंदिरात पण वेडवाकडं वागणे, आरडाओरडा करणे याला लोकशाही म्हणत नसल्याचा टोला विरोधकांना लगावत या कार्यक्रमानंतर उत्कृष्ट संसदपटू म्हणून पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आहे. आता हा पुरस्कार मिळाल्यानंतर पुरस्काराचा दर्जा वाढ कि दर्जा खालावणं करायचं हे त्यांनी ठरवाव असा उपरोधिक सल्लाही त्यांनी लगावला.

पोस्ट कोविडनंतरची आर्थिक परिस्थिती कशी असेल याचा विचार करतो तेव्हा परिस्थिती भयानक असत्याचे दिसून येते. नुसते सत्ता एके सत्ता करत राहीलो तर एकूण दिवस वाईट आले असेच म्हणावे लागले. रामकाज कसे झाले याबाबत ज्याचा त्याचा दृष्टीकोन आहे. राज्य सरकारचे काम जनतेचे समाधान करणे इतकंच आहे. त्यामुळे विरोधकांचे समाधान करण्याची सरकारची जबाबदारी नाही. त्यामुळे जे घडल त्यानंतर ज्यांना सुधारायचं त्यांनी सुधाराव असा उपरोधिक सल्लाही त्यांनी लगावला.

पंतप्रधानांच्या भेटीनंतर भाजपा शिवसेना यांचे पुन्हा जुळणार अशी चर्चा रंगली असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, ३० वर्षात काही झालं नाही आता काय होणार असा प्रतिप्रश्न करत असे काही होणार नसल्याचे त्यांनी अप्रत्यक्ष सांगितले. तसेच मी जायचे म्हटलं तर माझ्या दोन्ही बाजूला अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्याकडे हाताने इशारा करत हे दोघे असताना जायचं म्हणालो तरी मी बाहेर कसा जाणार असे सांगत महाविकास आघाडी फुटणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी