महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी

demand for imposing President's rule in Maharashtra व्हॉट्सअॅप फॉरवर्डवरुन माजी नौदल अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीनंतर संबंधित निवृत्त अधिकाऱ्याच्या मुलीने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.

demand for imposing President's rule in Maharashtra
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी 

थोडं पण कामाचं

  • महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी
  • 'टाइम्स नाऊ'ने मारहाण प्रकरणाला फोडली वाचा
  • शिवसेनेच्या कमलेश कदमला अटक

मुंबईः व्हॉट्सअॅपवर (Whatsapp) आलेले कार्टून (Cartoon) फॉरवर्ड (Forward) केले म्हणून नौदलातून निवृत्त झालेल्या माजी अधिकाऱ्याला बेदम मारहाण झाली. या मारहाणीत माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्या डोळ्याला गंभीर झाली. वडिलांना झालेली मारहाण पाहून संतापलेल्या मुलीने महाराष्ट्र शासनावर आगपाखड केली. राज्यात मानवता उरलेली दिसत नाही. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी तिने केली. 

'टाइम्स नाऊ'ने मारहाण प्रकरणाला फोडली वाचा

याआधी माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना बेदम मारहाण झाल्याचे वृत्त 'टाइम्स नाऊ'ने दाखवले. मुंबईत (Mumbai) कांदिवलीच्या (Kandivali) लोखंडवाला परिसरात ही धक्कादायक घटना घडली. 'टाइम्स नाऊ'च्या वृत्ताची दखल राज्यातील विरोधकांनी घेतली. पण सरकारकडून कारवाई झाली नव्हती. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी थेट मुख्यमंत्र्यांना टॅग करुन ट्वीट केले आणि मारहाण करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी केली. यानंतर चक्र वेगाने फिरली.

शिवसेनेच्या कमलेश कदमला अटक

शिवसेनेच्या कमलेश कदमसह (Kamlesh Kadam) मारहाण प्रकरणी सहा जणांना अटक केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दिली. मारहाण प्रकरणात समता नगर पोलीस ठाणे (Samta Nagar Police Station) येथे एफआयआर (First Information Report - FIR) दाखल करुन घेण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले. कमलेश मारहाण करणाऱ्यांचे नेतृत्व करत होता. ज्या परिसरात मारहाणीची घटना घडली तिथे असलेल्या सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण घटना रेकॉर्ड झाली.

व्हॉट्सअॅपवर फॉरवर्डवरुन माजी नौदल अधिकाऱ्याला झालेली मारहाण

मारहाणीची घटना घडण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी संबंधित एक कार्टून व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केले म्हणून मदन शर्मा यांना अचानक वारंवार फोन येऊ लागले. फोन करुन त्यांना घराबाहेर बोलावण्यात आले. बाहेर येताच त्यांना कमलेश कदमने सोबत आणलेल्या ८-१० जणांकरवी बेदम मारहाण केली. मारहाण करणाऱ्यांनी मदन शर्मा यांना भाजपशी संबंधित आहात का?, असा प्रश्न विचारला होता. याच कारणामुळे मारहाण करणारे सर्वजण शिवसेनेचे असल्याचा संशय व्यक्त होत होता. 

मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली होती. हे सीसीटीव्ही फूटेज दाखवून 'टाइम्स नाऊ'ने मारहाण प्रकरणाला वाचा फोडली होती. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्या बाबतीत घडलेल्या धक्कादायक घटनेविषयी दुःख व्यक्त केले. तसेच मारहाण करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी केली. 'टाइम्स नाऊ'ने या प्रकरणाचा पाठपुरावा केला. 

शर्मा कुटुंब महाराष्ट्र शासनावर नाराज

मुंबई पोलिसांनी कारवाई केली तरी शर्मा कुटुंब महाराष्ट्र शासनावर नाराज झाले आहे. मदन शर्मा यांनी आयुष्यभर नौदलात देशासाठी सेवा केली. कार्यकाळात त्यांना एक नौदल अधिकारी म्हणून चांगली वागणूक मिळाली. मात्र निवृत्त झाल्यानंतर काही वर्षांनी भर रस्त्यात मदन शर्मा यांना मारहाण झाली. मारहाणीचे नेतृत्व शिवसेनेच्या कमलेश कदम याने केले. या प्रकरणात ठोस कारवाई व्हावी यासाठी विरोधी पक्षनेत्यांना पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांना टॅग करुन ट्वीट करावे लागले. 

कायद्याचा धाक उरला आहे की नाही, सामान्यांच्या मनातला प्रश्न

देशाची दीर्घकाळ सेवा करुनही स्वतःलाच न्यायासाठी एवढे धडपडावे लागेल, असे मदन शर्मा यांना कधीही वाटले नव्हते. मुंबई शर्मा यांच्या राहत्या घराजवळ जी धक्कादायक घटना घडली त्यामुळे कायद्याचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गुंडगिरीचा जाहीर निषेध 

परिसरातील नागरिकांनी गुंडगिरीच्या या प्रकाराचा जाहीर निषेध केला. तसेच गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.

शीला शर्मा यांनी दिली घटनेची माहिती

मदन शर्मा यांची मुलगी शीला हिने संपूर्ण घटनेची माहिती दिली. व्हॉट्सअॅपवर आलेले कार्टून फॉरवर्ड केल्याचे निमित्त झाले आणि वडिलांना रात्री १० वाजल्यापासून वारंवार घराबाहेर येण्यासाठी फोन येऊ लागले. घराबाहेर पडताच वडिलांना ८-१० जणांनी घेराव घातला आणि बेदम मारहाण केली. ही घटना सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाली असून पोलीस फूटेज आधारे पुढील तपास करू शकतील, असे शीला शर्मा म्हणाल्या. ज्येष्ठ नागरिकांशी कसे वागावे एवढी मानवताही महाराष्ट्रात उरली नाही का, असा सवाल शीला शर्मा यांनी केला. त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.

अतुल भातखळकरांची शिवसेनेवर टीका

भाजप (BJP) नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी 'टाइम्स नाऊ'शी बोलताना मारहाण प्रकरणी शिवसेनेला जबाबदार ठरवले. भातखळकर यांनी तिखट शब्दात शिवसेनेवर टीका केली. अभिनेत्री कंगना राणौत हिचे ऑफिस तोडून पौरुषत्व (मर्दानगी) दाखवणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेने सत्तेच्या माजात एक माजी नौदल अधिकाऱ्याला बेदम मारहाण केली, असा गंभीर आरोप भातखळकर यांनी केला. शिवसैनिकांनी केलेल्या बेदम मारहाणीमुळे माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्या डोळ्याला गंभीर इजा झाली. मुख्यमंत्री घरात बसून हुकुमशाही चालवत आहेत, असेही भातखळकर म्हणाले. मारहाण प्रकरणाची गंभीर दखल विधान परिषेदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी घेतली आहे. ते आज (शनिवार) मदन शर्मा आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेणार आहेत. तसेच स्थानिक पोलिसांकडून आतापर्यंत मारहाण प्रकरणात झालेल्या कारवाईची माहिती घेणार आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी