[VIDEO]: गडचिरोली भूसुरंग स्फोटप्रकरणी राष्ट्रवादीचा पदाधिकारी अटकेत, गुन्ह्याची कबुली

मुंबई
Updated Jul 07, 2019 | 17:07 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

NCP Leader arrest: गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या भूसुरंग स्फोट प्रकरणी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याला अटक केली असून आता या प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे.

Gadchiroli naxal attack ncp leader arrest
गडचिरोली भूसुरंग स्फोटप्रकरणी राष्ट्रवादीचा नेता अटकेत, गुन्ह्याची कबुली   |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: १ मे रोजी गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या भूसुरंग स्फोट प्रकरणात पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्याला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्याचं नाव कैलास रामचंदानी असं आहे. त्याला पोलिसांनी ३० जून रोजी अटक केली होती. हल्ल्याचा कट रचण्यात कैलास रामचंदानी याचा सहभाग असल्याची माहिती आता समोर येत आहे. तसेच त्याने नक्षलवाद्यांना मदत केल्याचंही पोलिसांच्या तपासात कबुल केलं असल्याचं वृत्त आहे. कैलास रामचंदानी याला न्यायालयाने १२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलीस सूत्रांनी टाइम्स नाऊला दिलेल्या माहितीनुसार, दोन लक्षलवाद्यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी कैलास रामचंदानी याला गडचिरोली येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्याप्रकरणात अटक केली आहे. कैलास रामचंदानी हा नक्षलवाद्यांना कच्च्या मालाचा पुरवठा करत असे आणि याच मालाच्या सहाय्याने नक्षलवादी जिल्ह्यातील विविध भागांत आपल्या कारवाई करत होते. अटक केल्यानंतर चौकशीत रामचंदानी याने कबुली दिली आहे की, पोलिसांच्या वाहनाचा ताफा जाणार असल्याची माहिती त्यानेच नक्षलवाद्यांना दिली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस म्हणतं...

दरम्यान, कैलास रामचंदानी याला अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत आला आहे. या प्रकरणी गडचिरोली जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी म्हटलं की, कैलास रामचंदानी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष होता मात्र सध्या तो पक्षाच्या कुठल्याही पदावर कार्यरत नाहीये. आता या प्रकरणी पक्षाकडून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल.

कुठे आणि कसा झाला होता हल्ला?

१ मे रोजी गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी भूसुरंग स्फोट घडवून आणला होता. या हल्ल्यात शीघ्र प्रतिसाद दल (क्यूआरटी)चे १५ जवान शहीद झाले होते. क्यूआरटी जवानांचं पथक गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेजा परिसरातून जात असताना नक्षलवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला होता. शहीद झालेल्या या जवानांमध्ये महाराष्ट्रातील तीन जवांनांचा समावेश होता. या प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे एनआयएची टीम सुद्धा तपासासाठी गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
[VIDEO]: गडचिरोली भूसुरंग स्फोटप्रकरणी राष्ट्रवादीचा पदाधिकारी अटकेत, गुन्ह्याची कबुली Description: NCP Leader arrest: गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या भूसुरंग स्फोट प्रकरणी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याला अटक केली असून आता या प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे.
Loading...
Loading...
Loading...