मोठी बातमी : अनिल देशमुख यांनी दिला गृहमंत्रीपदाचा राजीनामा

मुंबई
Updated Apr 05, 2021 | 19:08 IST

हायकोर्टाच्या निर्णयानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी झालेल्या आरोपावर निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी न्यायालयाचा आदर म्हणून मी राजीनामा देतो

थोडं पण कामाचं

  • गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील अ‌ॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर अत्यंत महत्वाचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे.
  • अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशी 15 दिवसात सीबीआयनं पूर्ण करावी,
  • हायकोर्टाच्या निर्णयानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी झालेल्या आरोपावर निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी न्यायालयाचा आदर म्हणून मी राजीनामा देतो

मुंबई: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील अ‌ॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर अत्यंत महत्वाचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे. अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशी 15 दिवसात सीबीआयनं पूर्ण करावी, असा निर्णय कोर्टाने दिला आहे. त्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. ट्वीट करत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. अनिल देशामुखांवरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या घडामोडीनंतर अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला.
 

हायकोर्टाच्या निर्णयानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी झालेल्या आरोपावर निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी न्यायालयाचा आदर म्हणून ते राजीनामा देत आहेत. या संदर्भात  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटून त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली. त्याला शरद पवारांनी होकार दिला आहे. ते आता मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपला राजीनामा देतील, तो राजीनामा मुख्यमंत्री स्वीकारतील असे राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले आहे. 

काय म्हटले राजीनाम्यात... 

कोर्टाचा आदर म्हणून अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर पदावर राहता कामा नये यासाठी ्अनिल देशमुख यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. पण माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपात काही तथ्य नाही, असेही नवाब मलिक यांनी सांगितले आहे. 

यापूर्वी, हायकोर्टाच्या निर्णयानंतर  राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात सिल्वर ओक वर बैठक झाली . सीबीआय चौकशीच्या कोर्टाच्या निर्णयामुळं अनिल देशमुख राजीनामा देऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात होती. 

मुंबई हायकोर्टानं  अ‌ॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सीबीआयला तपास करण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडी  वाढल्या आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. शरद पवार, अजित पवार आणि अनिल देशमुख यांच्यामध्ये तातडीची बैठक झाली.  बैठकीनंतर अजित पवार सिल्वर ओकवरुन बाहेर पडले आहेत. तर भाजपनं अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढवला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या बाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

15 दिवसांमध्ये चौकशी करण्याचे आदेश

मुंबई हायकोर्टानं अ‌ॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देताना सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे. सीबीआला 15 दिवसांमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करावी लागणार आहे. मुंबई हायकोर्टानं जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निरीक्षण नोंदवलं की, अनिल देशमुख हे गृहमंत्री आहेत त्यामुळे पोलिसांकडून याचा निष्पक्ष तपास होऊ शकत नाही.

 देवेंद्र फडणवीसांची मागणी

अ‌ॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर अत्यंत महत्वाचा निर्णय कोर्टाने आज दिला आहे. 15 दिवसात प्राथमिक चौकशी करावी आणि पुढंची चौकशी करावी. जी वसुली या सरकारमध्ये होत होते त्याचं सत्य समोर येईल. राज्याच्या प्रतिमेला काळिमा फासणारा हा प्रकार आहे. हा जो मधल्या काळात कारभार झाला आहे,  त्यातील सत्य समोर येईल. काही लोकांनी प्रयत्न केला की सीबीआय चौकशी होऊ नये. त्याला जोरदार उत्तर मुंबई हायकोर्टने दिलं आहे. आम्ही त्याच स्वागत करतो, अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यायला हवा नाही तर मुख्यमंत्रीनी घ्यायला हवा. अनिल देशमुख यांनी चौकशीला सामोरं जावं त्यातून जर सत्य समोर येत आणि त्यातून ते निर्दोष सुट्त असतील तर त्यांना पुन्हा मंत्री मंडळात घेता येते. पण तूर्तास त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मागणी केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी