हॉस्पिटलनं कोरोना रुग्णाचा मृतदेह रोखला, शिवसेनेच्या ‘या’ नेत्यानं घातला गोंधळ

मुंबईतील प्रसिद्ध अशा खाजगी हॉस्पिटलमध्ये एका ज्येष्ठ डॉक्टरसोबत शिवसेनेच्या नेत्यानं वाद घातला. सोशल मीडियावर या वादाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण...

Nitin Nandgaonkar
शिवसेना नेते नितीन नांदगावकरचा हॉस्पिटलमध्ये गोंधळ  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • कोरोना संक्रमित मृत्यूमुखी पडलेल्या रिक्षा चालकाचा मृतदेह देण्यास रुग्णालयाचा नकार
  • शिवसेना नेते नितीन नांदगावकरचा हॉस्पिटलमध्ये गोंधळ
  • गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई: सोशल मीडियावर मुंबईतील प्रसिद्ध अशा हिरानंदानी हॉस्पिटलमधील गोंधळाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. याद्वारे हॉस्पिटलमधील एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय. या रुग्णालयामध्ये कोरोना संक्रमित एका रुग्णाचा मृत्यू झाला. मात्र त्याच्या बिलाच्या रकमेवरून वाद झाला आणि त्या रुग्णाचा मृतदेह हॉस्पिटलनं अडवून ठेवला. याची माहिती मिळताच शिवसेनेचे नेते नितीन नांदगावकर यांनी रुग्णालयात गोंधळ घातला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

कोरोनाच्या या संकटाच्या काळात आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, पोलीस आणि सफाई कामगार अहोरात्र सेवा करत आहेत. ते कशापद्धतीनं आपलं काम करतात हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र काही खाजगी हॉस्पिटल्स बिलाची अमाप रक्कम रुग्णांकडून उकळत असल्याच्या घटनाही समोर येत आहेत. त्यामुळेच कोरोना रुग्ण अधिक संभ्रमात आणि भितीच्या वातावरणात राहत आहेत. कारण सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार घ्यायला जागा नाही आणि खाजगी हॉस्पिटल्सचे बिल भरण्याची सामान्य आणि गरीबांची शक्ती नाही.

नेमकी काय घडलीय घटना?

विक्रोळी इथल्या एका रिक्षा चालक कोरोना बाधित रुग्णाला उपचारांसाठी पवईच्या हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केलं होतं. २३ दिवस हा रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. मात्र दुर्देवानं गुरुवारी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर हॉस्पिटलनं रुग्णावरील उपचारांचं ८ लाख रुपयांचं बिल रुग्णाच्या नातेवाईकांना सोपवलं. ते बिल पाहून रिक्षा चालकाचे नातेवाईक हादरून गेले. त्यांना हे बिल भरणं शक्य नव्हतं. त्यांनी याबाबत शिवसेनेचे नेते नितीन नांदगावकर यांना संपर्क केला आणि नांदगावकर हे या मृत रिक्षाचालकाच्या मदतीसाठी रुग्णालयात आले.

मात्र इथे आल्यावर सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखलं आणि गोंधळ सुरू झाला. रुग्णालयाचे सीईओ असलेल्या ज्येष्ठ डॉक्टरांसोबत नांदगावकर यांचा वाद झाला. थोडी धक्काबुक्कीही झाली. यावेळी आपल्या शैलीत बोलतांना नांदगावकर यांनी डॉक्टरांना सुनावलं आणि अपशब्द उच्चारले. नांदगावकर म्हणाले, 'रुग्णांसाठी डॉक्टर हा देव असतो. तुम्ही डॉक्टर नसता तर मी तुमच्या कनाशीलात लगावली असती'.

यानंतर मात्र डॉक्टर आणि नांदगावकर यांनी शांततेत केबिनमध्ये जावून चर्चा केली आणि हॉस्पिटल प्रशासनानं रिक्षा चालकाचा मृतदेह सोडला. हा संपूर्ण वाद झाल्यानंतर अखेर डॉक्टर आणि नांदगावकर शेकहँड करत केबिन बाहेर पडले आणि वातावरण शांत झालं. मात्र तोपर्यंत झालेला गोंधळ कॅमेऱ्यात कैद झाला होता आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

दरम्यान, मुंबईत कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या ९७,७५१ झालीय. तर आतापर्यंत मुंबईत मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या आतापर्यंत ५५२० झालीय.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी