लॉकडाऊनवरुन महाविकास आघाडीत मतभेद? 

मुंबई
सुनिल देसले
Updated Jul 02, 2020 | 17:48 IST

Mahavikas Aaghadi: महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांत लॉकडाऊनवरुन मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकरण...

CM Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

 • राज्यातील महाविकास आघाडीमध्ये मतभेद?
 • राज्यातील लॉकडाऊनवरुन मतभेद झाल्याची चर्चा 
 • लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय विश्वासात न घेता घेतल्याची काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची भावना

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मिशन बिगीन अगेन (Mission Begin Again) अंतर्गत देण्यात येणाऱ्या सवलतींसह ३१ जुलै २०२० पर्यंत लॉकडाऊन (Lockdown) वाढवण्याचा निर्णय जाहीर केला. राज्यातील कोरोना (Corona) बाधितांची वाढती संख्या लक्षात घेत सरकारने हा निर्णय घेतला आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर आता आघाडी सरकारमधील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे (Congress - NCP) नेते नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेताना आपल्याला विश्वासाात घेतले नसल्याची भावना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आहे. यामुळे आता राज्यातील लॉकडाऊनवरुन महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकारमध्ये मतभेत असल्याचं वृत्त समोर येत आहे.

लॉकडाऊन वाढण्याचा निर्णय घेताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना विश्वासात घ्यायला हवे होते अशी भावना दोन्ही पक्षांच्या नेत्यांची आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात फोनवरुन चर्चा झाली असून लवकरच दोन्ही नेते एकमेकांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

राज्यात 'मिशन बिगीन अगेन' की 'लॉकडाऊन'

महाराष्ट्रातील एमएमआर क्षेत्रात असलेल्या महानगरपालिकांपैकी बहुतांश मनपांमध्ये स्थानिक प्रशासनाने पुन्हा लॉकडाऊन जाहीर केला आहे. ठाण्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता २ जुलै पासून ते १२ जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यासोबतच नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, मीरा-भाईंदर या महानगरपालिकांनी सुद्धा आपल्या क्षेत्रात लॉकडाऊन जाहीर केला आहे.

मुंबईत रात्री संचारबंदी 

मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत मुंबई पोलिसांनी रात्री संचारबंदी लाग केली आहे. ही संचारबंदी १ जुलैपासून १५ जुलैच्या रात्रीपर्यंत लागू असणार आहे. रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू अणार आहे. या संचारबंदीतून केवळ अत्यावश्यक सेवा, सुविधा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सूट देण्यात आली आहे. यासोबतच नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलिसांनी केलं आहे. विनाकारण घराच्या परिसरापासून दोन किलोमीटरच्या बाहेर फिरल्यास कारवाई करण्यात येईल असंही मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे.

या सर्व परिस्थितीमुळे राज्यात मिशन बिगीन अगेन सुरू आहे की, लॉकडाऊन सुरू आहे अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर आता सत्तेतील काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते सुद्धा नाराज असल्याची चर्चा सुरू झाल्याने लॉकडाऊनवरुन महाविकास आघाडीत मतभेद असल्याचंही बोललं जात आहे.

मुंबई एमएमआर क्षेत्रासोबतच पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर क्षेत्रात निर्बंधांच्या अधीन राहून संमती देण्यात येत आहे. पाहूयात काय राहणार सुरू...

 1. या आदेशापूर्वी संमती देण्यात आलेली सर्व अत्यावश्यक दुकाने खुली राहतील.
 2. अत्यावश्यक तसेच अत्यावश्यक नसलेल्या वस्तुंच्या ऑनलाईन खरेदीसाठी ई-कॉमर्स कृती सुरु राहतील.
 3. सध्या सुरु असलेले उद्योग सुरु राहतील.
 4. संमती देण्यात आलेली सर्व सार्वजनिक तसेच खाजगी बांधकामे सुरु राहतील.
 5. होम डिलिव्हरी (घरपोच सेवा) रेस्टॉरन्ट्स आणि किचन (स्वयंपाकगृहे) सुरु राहतील.
 6. ऑनलाईन शिक्षण आणि त्याच्याशी संबंधीत कामे सुरु राहतील. 
 7. सर्व सरकारी कार्यालये (अत्यावश्यक, आरोग्य आणि वैद्यकीय, कोषागारे, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, एनआयसी, अन्न आणि नागरी पुरवठा, एफसीआय, एनवायके, महापालिका सेवा यांच्याशिवाय) १५ टक्के कर्मचारी किंवा १५ कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितक्या क्षमतेसह सुरु राहतील.
 8. सर्व खाजगी कार्यालये ही १० टक्के कर्मचारी किंवा १० कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितक्या क्षमतेसह सुरु राहतील.
 9. टॅक्सी, कॅब, ॲग्रीगेटर यांना फक्त अत्यावश्यक सेवेसाठी १ अधिक २या प्रवासी क्षमतेनुसार, रिक्षा फक्त अत्यावश्यक सेवेसाठी १ अधिक २ या प्रवासी क्षमतेनुसार, चारचाकी फक्त अत्यावश्यक सेवेसाठी १ अधिक २ या प्रवासी क्षमतेनुसार तर दुचाकी फक्त अत्यावश्यक सेवेसाठी १ प्रवासी क्षमतेनुसार चालवण्याची परवानगी राहील.
 10. पूर्वपरवानगी घेऊन वाहनांची दुरुस्ती करणारी गॅरेज
 11. २३ जून २०२० च्या आदेशानुसार मोकळ्या जागा, लॉन, वातानुकूलित नसलेल्या हॉलमध्ये लग्नाशी संबंधित कार्यक्रमांना परवानगी राहील.
 12. वर्तमानपत्रांचे मुद्रण व वितरण व त्यांचे घरपोच सेवा
 13. शासकीय आणि खाजगी वाहनांमध्ये प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी -
 14. दुचाकी- फक्त चालक
 15. तीन चाकी वाहन- चालक आणि २ प्रवासी
 16. चार चाकी वाहन- चालक आणि २ प्रवासी.
 17. आंतरजिल्हा बस वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. बसमध्ये एकूण प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी सामाजिक अंतर आणि सुरक्षेची काळजी घेऊन प्रवास करू शकतील.
 18. जिल्ह्या अंतर्गत प्रवास नियंत्रित स्वरुपाचा राहील.
 19. अत्यावश्यक नसलेली दुकाने, सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत सुरू राहतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी