"आम्ही आपलं दु:खं सांगायला जायचो, पण चहा पेक्षा किटली गरम" फायरब्रँड गुलाबराव पाटलांचं सडेतोड भाषण, आदित्य ठाकरेंना डिवचलं 

मुंबई
Updated Jul 04, 2022 | 17:23 IST

Gulabrao Patil in Maharashtra Assembly Session : गुलाबराव पाटील यांनी सभागृहात भाषण करताना उद्धव ठाकरेंविरोधात नाराजी व्यक्त केली आणि त्यासोबतच आदित्य ठाकरेंनाही डिवचलं. 

थोडं पण कामाचं
  • गुलाबराव पाटील यांचं सभागृहात तुफान भाषण
  • बंडखोर आमदारांची बाजू मांडत उद्धव ठाकरेंविरोधात नाराजी व्यक्त

मुंबई : विधानसभेच्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी भाषण करताना बंडखोर म्हणून एकनाथ शिंदे गटावर झालेल्या आरोपांना एक प्रकारे प्रत्युत्तरच दिलं आहे. महाविकास आघाडीतून (Maha Vikas Aghadi) बाहेर पडण्याचा निर्णय आपण का घेतला याबाबतही गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणात सविस्तर सांगितलं आहे. गुलाबराव पाटील म्हणाले, आम्हाला जे मिळालं आहे ते शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने मिळालं आहे. आम्ही बंड बिलकूल केलेलं नाहीये. माझ्यासारख्या टपरीवाल्यावर टीका केली. गुलाबराव तुला टपरीवर पाठवेन. अहो.. धिरुभाई अंबानीसुद्धा पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायचे हा त्यांचा इतिहास आहे. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Maharashtra CM Eknath Shinde) रिक्षा चालवायचे हा इतिहास आहे. टपरीवाला, चहावाला, रिक्षा चालवणारा... ज्याला राजकारणातलं काही माहिती नव्हतं अशा लोकांना बाळासाहेबांनी पुढे आणलं.

अजितदादांना प्रत्युत्तर

गुलाबराव पाटील म्हणाले, अजितदादा बोलले, शिवसेना सोडून जातात ते पुन्हा निवडून येत नाही. मी सांगतो, दादा आम्ही शिवसेना सोडलेली नाहीये. त्यामुळे आमच्या निवडून येण्याची चिंता करु नका. आम्ही शिवसैनिकांच्या भरोवषावर इथं आलो आहोत. 55 आमदारांमधून 40 आमदार कसे फुटतात ? एक जिल्हा प्रमुख भाजपत प्रवेश करणार असं मला कळालं होतं तेव्हा मी रात्रभर घेऊन त्याला बसलो आणि त्याला समजावलं. आपला साधा सदस्य फुटतो त्याची विचारपूस आम्ही करतो. 40 आमदार फुटतात... ही आजची आग नाहीये. आम्हाला आमचं घर सोडून येण्याची अजिबात इच्छा नाहीये. बाळासाहेबांना त्यांच्या मुलाला दु:ख देण्याची अजिबात इच्छा नाहीये.

आदित्य ठाकरेंवर निशाणा

एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. सर्व आमदार दु:ख सांगायला जायचे. की साहेब... आमची कामं होत नाहीयेत. आम्हाला भेट मिळत नाहीये. पण चहा पेक्षा किटली गरम. काही लोक बोलले की, आम्हाला नजर मिळवण्याची तुमची हिंमत होणार नाही. साहेब... वर्ष-वर्ष जेलमध्ये राहिलेलो लोक आहोत आम्ही. आम्ही सहज आमदार झालो नाहीत. भगवा झेंडा हातात घेऊन जय भवानी-जय शिवाजी म्हणत इथपर्यंत पोहोचलेले कार्यकर्ते आहोत आम्ही असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा : 40 वर्षांपासून कट्टर शिवसैनिक असल्यासारखे अजितदादा बोलत होते

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?

विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शिंदे गटाचे आमदार सभागृहात दाखल झाले. त्यानंतर जे काही घडलं त्यावर आदित्य ठाकरे यांनी म्हटलं, पळालेल्या एकही आमदाराने माझ्या डोळ्यात - डोळे घालून पाहिलं नाही. सर्वजण खाली पाहून जात होते नाहीतर डोळे चोरून पाहत होते. माझा प्रश्न हाच आहे की, सर्वजण माझ्यापासून डोळे चोरले पण मतदारसंघात गेल्यावर मतदारांना काय सांगणार?.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी