१८ ते ४४ वयोगटाचे मोफत लसीकरण १ मे पासून, पण...

मुंबई
Updated Apr 30, 2021 | 23:00 IST

महाराष्ट्रात घोषणा केल्याप्रमाणे महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे २०२१ पासून १८ ते ४४ वयोगटाचे मोफत लसीकरण सुरू होणार आहे. पण....

थोडं पण कामाचं

  • १८ ते ४४ वयोगटाचे मोफत लसीकरण १ मे पासून, पण...
  • महाराष्ट्रात लॉकडाऊन सदृश कडक निर्बंध
  • कोरोना संकट हाताळण्यासाठी राज्याच्या आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्याचे काम सुरू

मुंबईः महाराष्ट्रात घोषणा केल्याप्रमाणे महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे २०२१ पासून १८ ते ४४ वयोगटाचे मोफत लसीकरण सुरू होणार आहे. पण लसींचा मर्यादीत साठा उपलब्ध आहे. यामुळे राज्यात निवडक ठिकाणी मर्यादीत पात्र व्यक्तींचेच मोफत लसीकरण होईल. राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील इतर पात्र व्यक्तींचे लसीकरण आणखी साठा उपलब्ध झाल्यानंतर होऊ शकेल, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. राज्यात १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण लसींच्या उपलब्धतेनुसार नियोजन करुन करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. Maharashtra CM Uddhav Thackeray LIVE

महाराष्ट्रात लॉकडाऊन सदृश कडक निर्बंध सुरू आहेत. या निर्बंधांमुळे राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढीचे प्रमाण स्थिरावण्यास मदत झाली आहे. याआधी राज्यात झपाट्याने रुग्ण वाढ होत होती, असे मुख्यमंत्री म्हणाले. कडक निर्बंध लागू केले नसते तर रुग्णवाढ आणखी मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे भयावह स्थिती निर्माण झाली असती, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कोरोना संकट हाताळण्यासाठी राज्याच्या आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्याचे काम सुरू आहे आणि यापुढेही सुरू राहील. केंद्र सरकारच्या सहकार्याने कोरोना संकट हाताळण्याचे काम महाराष्ट्र शासन करत आहे. केंद्राने राज्याच्या मागण्या लवकर पूर्ण केल्या तर कोरोना संकट हाताळण्यास मोठी मदत मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. 

महाराष्ट्रात दररोज सुमारे १२०० मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होते. पण राज्यात दररोज १७०० मेट्रिक टन ऑक्सिजन वापरला जात आहे. अतिरिक्त ऑक्सिजनसाठी मोठा खर्च करावा लागत आहे. महाराष्ट्र शासनाने ऑक्सिजनच्या निर्मितीसाठी नवे प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच हे प्रकल्प सुरू होतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्राला दररोज ३५ हजार रेमडेसिविर इंजेक्शन मिळत आहे. पण या इंजेक्शनचा सरसकट सर्व कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापर करणे घातक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. राज्यातील सर्व डॉक्टरांनी तज्ज्ञांच्या मतांचा आदर करुन रुग्णाच्या तब्येतीचा आढावा घेऊन योग्य प्रकारे उपचार करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. 

महाराष्ट्राची ऑक्सिजनची टंचाई दूर करण्यासाठी नियोजन सुरू आहे. महिन्याभरात टंचाई दूर केली जाईल. पण याआधी कोरोना नियंत्रणात येणे सर्वांच्या हिताचे आहे. राज्यात तिसरी लाट येऊ नये, अशी इच्छा आहे. पण कोरोनाची तिसरी लाट आलीच तर त्यासाठी तयारी करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यासाठी नियोजन करणे, कोरोना चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळांची संख्या वाढवणे, राज्यात मोठ्या संख्येने कोविड सेंटरची निर्मिती करणे ही कामं वेगाने सुरू असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्रातील आरोग्य सुविधा

डॉ. प्रदीप व्यास यांना अपर मुख्य सचिवपदी पदोन्नती

राज्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांना अपर मुख्य सचिव या पदावर पदोन्नती देण्यात आली असून त्यांची आहे त्या विभागात पदस्थापना करण्यात आली. वैद्यकीय क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले डॉ. व्यास हे भारतीय प्रशासन सेवेच्या १९८९ तुकडीचे अधिकारी आहेत. जयपूर येथे एमबीबीएस आणि त्यानंतर एमडी पेडीयाट्रीक हे शिक्षण पूर्ण केले. राज्यात कोरोना विरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात ते महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. आठ वर्ष त्यांनी तामीळनाडूच्या उद्योग आणि वित्त विभागात सेवा बजावली आहे. त्यानंतर महाराष्ट्रात त्यांनी कृषी क्षेत्राशी निगडीत राज्य बियाणे महामंडळ आणि कृषी औद्योगिक विकास महामंडळात आठ वर्ष सेवा केली आहे. मुंबई जिल्हाधिकारी, राज्याचे वित्त सचिव, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. जुलै २०१७ पासून डॉ. व्यास आरोग्य विभागाचे प्रधान सचिव म्हणून कार्यरत आहेत.

महाराष्ट्र - लसीकरण कार्यक्रम

  1. १ कोटी ५८ लाखपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण
  2. २६ एप्रिल रोजी राज्यात पाच लाखांपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण
  3. राज्यात सर्वाधिक ६,१५५ लसीकरण केंद्र (५३४७ शासकीय / ८०८ खासगी)
  4. राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील ५ कोटी ७१ लाख नागरिकांच्या लसीकरणासाठी सुमारे १२ कोटी डोसेसची आवश्यकता 
  5. प्रत्येक राज्यासाठी लसीकरण नोंदणीचे स्वतंत्र अॅप असावे, महाराष्ट्राची मागणी
  6. राज्यात दररोज २ लाख ७५ हजार चाचण्या; आरटीपीसीआर ६० टक्के आणि अँटीजेन ४० टक्के
  7. राज्यात अडीच कोटी चाचण्या पूर्ण

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी