"सरकारला का दोष देता? आम्हाला विचारुन तर हल्ला केला नाही ना": संजय राऊत 

Sanjay Raut reaction on attack on ex navy officer: मुंबईत निवृत्त नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी मारहाण केल्याप्रकरणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Shiv Sena MP Sanjay Raut
शिवसेना खासदार संजय राऊत   |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • निवत्त नौदल अधिकारी मारहाण प्रकरणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया
  • तुम्ही सरकारला का दोष देता? कुणी जर हल्ला केला आहे तर आम्हाला विचारुन तर केला नाही ना?: संजय राऊत

मुंबई : निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मुंबईत शिवसैनिकांनी मारहाण (Shiv Sena activist beaten Ex-Navy Official) केल्याने नवा वाद उभा राहिला आहे. या प्रकरणी आरोपी शिवसैनिकांना पोलिसांनी अटक सुद्धा केली होती. मात्र नंतर त्यांना जामीन देण्यात आला. या संपूर्ण प्रकरणावर शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तुम्ही सरकारला का दोष देता?

एएनआय या न्यूज एजन्सीला प्रतिक्रिया देताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, "जर कुठल्या शहरात किंवा राज्यात कुणी नागरिक राहतं तर त्या नागरिकाचं कर्तव्य असतं की जो राज्याचा प्रमुख आहे. जो संविधानिक पदावर आहे त्याच्या बद्दल आदर ठेवावा आणि भाष्य करावं. जर तुम्ही ज्या पद्धतीने बदनामी करतात आणि चिखल उडवतात त्यानंतर नागरिकांच्या मानात जर राग निर्माण होतो तर तुम्ही सरकारला का दोष देता? कुणी जर हल्ला केला आहे तर आम्हाला विचारुन तर केला नाही ना"

उत्तरप्रदेशात किती धिकाऱ्यांवर हल्ला केला आहे माहिती आहे का?

संजय राऊत पुढे म्हणाले, "इतका मोठा महाराष्ट्र आहे, हे कुणासोबतही होऊ शकतं. आमच्यासोबतही होऊ शकतं. तुम्ही त्याचा थेट संबंध सरकारसोबत जोडत आहेत. उत्तरप्रदेशात किती निवृत्त अधिकाऱ्यांवर हल्ला केला आहे माहिती आहे का? एका कॅप्टनची तर घरात घुसुन हत्या केली होती. त्यावेळी संरक्षण मंत्र्यांनी तर फोन नव्हता केला त्याच्या कुटुंबीयांना."

तुम्ही वातावरण बिघडवत आहात

आदर हा दोन्ही बाजुंनी झाला पाहिजे. मी मानतो की, राज्यात किंवा देशात कुठल्याही व्यक्तीवर हल्ला होऊ नये. आमची सरकार आणि उद्धव ठाकरे सुद्धा हेच मानतात. सर्वांना जगण्याचा अधिकार आहे. पण तुम्ही वातावरण बिघडवत आहात. तुमच्या मागे कोण आहे हे सर्वांना माहिती आहे. राज्यात कायद्याचं राज्य आहे. तात्काळ त्यांना अटक करण्यात आलं आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

व्हॉट्सअॅपवर आलेले कार्टून फॉरवर्ड केले म्हणून नौदलातून निवृत्त झालेल्या माजी अधिकाऱ्याला मुंबईत शिवसैनिकांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्या डोळ्याला गंभीर जखम झाली आहे. मारहाणीची ही घटना इमारतीमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या मारहाण प्रकरणात पोलिसांनी चौघांना अटक केली. त्यानंतर त्यांची जामीनावर सुटका सुद्धा झाली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी