Bhagatsingh Koshyari : कोश्यारींवर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे टीकास्त्र

मुंबई
Updated Nov 20, 2022 | 18:37 IST

Bhagatsingh Koshyari : शिवाजी महाराज हे जुने आदर्श आहेत असे वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. वादग्रस्त विधान करण्याची त्यांची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी सावित्रीबाई फुले, शिवाजी महाराज आणि मराठी माणसांबद्दल कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केले होते.

थोडं पण कामाचं
  • शिवाजी महाराज हे जुने आदर्श आहेत असे वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे.
  • वादग्रस्त विधान करण्याची त्यांची ही पहिलीच वेळ नाही.
  • यापूर्वी सावित्रीबाई फुले, शिवाजी महाराज आणि मराठी माणसांबद्दल कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केले होते.

Bhagatsingh Koshyari : शिवाजी महाराज हे जुने आदर्श आहेत असे वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. वादग्रस्त विधान करण्याची त्यांची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी सावित्रीबाई फुले, शिवाजी महाराज आणि मराठी माणसांबद्दल कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केले होते. सावित्रीबाईंचे लग्न लहानपणी झाले तेव्हा त्यांना काय वाटलं असेल असे कोश्यारी म्हणाले होते. रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरू होते आणि त्यांच्याशिवाय महाराजांना कोण विचारणार असे कोश्यारी म्हणाले होते. इतकेच नाही तर मुंबईतून राजस्थानी आणि मारवाडी समाज निघून गेल्यास मुंबईत पैसे उरणार नाही असेही कोश्यारी म्हणाले होते. आता शिवाजी महाराजांबद्दल कोश्यारी यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे.  शिवाजी महाराज हे जुने आदर्श आहेत, नितीन गडकरी हे नवे आदर्श आहेत असे कोश्यारी म्हणाले आहेत. कोश्यारी यांच्या विधानाचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे.  महाराष्ट्राचा स्वाभिमान वैगरे शब्दच्छल करीत शिवसेना फोडली..एक स्वाभिमानी मिंधे सरकार सत्तेवर आणले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपचे राज्यपाल आणि राष्ट्रीय प्रवक्ते खुलेआम करीत असताना स्वाभिमानी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गप्प का? इथे बदला घ्या बदला !!! जय महाराष्ट्र! असे राऊत म्हणाले आहेत. 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे.  पवार म्हणाले की, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालिन, सर्वश्रेष्ठ आदर्श राजे आहेत. राजसत्तेचा उपयोग विलासासाठी नव्हे तर लोककल्याणासाठी कसा करता येतो, याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. छत्रपती शिवरायांना आदर्श मानून महाराष्ट्र आजवर घडला, यापुढेही घडत राहील असे अजित पवार म्हणाले. तसेच महाराष्ट्राच्या राज्यपालपदी तीन वर्षांहून अधिक काळ राहूनही मा. राज्यपाल महोदयांना छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील, महाराष्ट्र व महाराष्ट्राची लोकभावना कळत नसेल, तर मा. राज्यपाल महोदयांनी पदावर राहण्याबाबत गांभीर्यानं पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे.मा. राज्यपाल महोदयांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांची मा. पंतप्रधान महोदयांनी गांभीर्यानं दखल घेण्याची वेळ आली आहे. मा. राज्यपाल महोदयांना सद्‌बुद्धी लाभो, ही प्रार्थना! असेही पवार म्हणाले.

काँग्रेसनेही राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यपाल कोश्यारी महाशयांनी स्वतःच्या नेत्याचा जयजयकार करताना छत्रपती शिवरायांचा अपमान केला आणि दुसरीकडे भाजपचा प्रवक्ता शिवछत्रपतींनी औरंगजेबाची माफी मागितली असे थेट वक्तव्य करतो.गलिच्छ राजकारणासाठी भाजपचे बगलबच्चे अजून किती खालच्या पातळीला जाणार? असा सवाल करत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी कोश्यारी यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. 

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून म्हटले आहे की, थोड्या दिवसांपूर्वी स्वतः रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होत की हे भाज्यपाल मराठी माणसाच्या राशीला नकोत. महात्मा फुले,छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल वाईट बोलले गेले. पुन्हा एकदा संपूर्ण देशाचे आदर्श आहेत अशा महाराजांबद्दल त्यांना जुने आदर्श म्हणून हिणवले,बस झाले आता बोचंक गुंडाळ असे आव्हाड यांनी नमूद केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. राज्यपाल महोदय, छत्रपतींची महती कळावी एवढी बौद्धिक उंची आपल्याकडे नसावी म्हणूनच वारंवार आपण  छत्रपतींचा अवमान करत आहात. पात्रता नसलेल्या अशा माणसाकडून आता दिलगिरीचीही अपेक्षा नाही. विशेष म्हणजे मागील दोन दिवस पेटून उठलेले आज मात्र नक्कीच पेटणार नाहीत, याची खंत वाटते असे रोहित पवार म्हणाले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी