Gajanan Kirtikar: मुंबई: ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' करुन खासदार गजानन किर्तीकर हे शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यातच अगदी दुसऱ्याच दिवशी किर्तीकरांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर अत्यंत गंभीर असे आरोप केले आहेत. पाहा नेमकं काय म्हणाले खा. किर्तीकर.
पाहा गजानन किर्तीकर नेमकं काय-काय म्हणाले:
'आम्ही उद्धव ठाकरेंना प्रस्ताव दिला होता की, आपला जो काही राष्ट्रवादी काँग्रेससोबत राजकीय प्रवास सुरु होणार आहे शिवसेनेचा.. हा शिवसेनेला घातक आहे. शिवसेनेचं भवितव्य धोक्यात येणार आहे. हे आम्ही सांगून पाहिलं होतं. त्यामुळे आम्हाला वाटलेलं की, काही बदल होईल म्हणून... पण तसा काही बदल झालेला नाही.'
अधिक वाचा: खासदार गजानन किर्तीकर बाळासाहेबांच्या शिवसेनेत, CM शिंदेंना दिला पाठिंबा
'दुसरं म्हणजे शिवसेना एवढी प्रचंड ताकदवान आहे. दोन-दोन लाखांचे दसरा मेळावे होतात. दोन्हीकडे.. म्हणजे इकडे आणि तिकडे. जर हीच ताकद एकत्र झाली तर फार मोठा फायदा होईल. म्हणून समेट घडवावा. 40 गेले 15 बाकी आहेत. तर 12 खासदार गेले आहेत. मी काल तेरावा गेलो खासदार. आता 5 खासदार बाकी आहेत. त्यामुळेच समेट घडवावा.'
'भाजपसोबत जी आपली नैसर्गिक युती आहे ती अबाधित ठेवावी. तसंच मुख्यमंत्री पद त्यांनी आपल्याला दिलंच आहे. त्याचा लाभ घेऊन संघटना बांधावी. शिवसैनिकांची कामं करावी.'
'मात्र, मला असं काही होईल हे दिसत नाही. त्यामुळे असं ठरवलं की, फार चुकीच्या मार्गाने उद्धवजी जात आहेत. राष्ट्रवादी किंवा काँग्रेस यांच्या साथीने वाटचाल करणार असाल तर ते शिवसैनिकाला धोकादायक आहे. मी जवळजवळ 56 वर्ष बाळासाहेबांसोबत आणि शिवसेनेसोबत आहे. एक निष्ठावंत आणि ज्येष्ठ म्हणून बिरुदावली मिळालेली आहे.'
'2004 ला माझं तिकीट कापण्याचा प्रयत्न केला उद्धवजींनी. एक उत्तर भारतीय व्ही के सिंग नावाचा बिल्डर आहे त्याचा भाऊ रमेश सिंग आहे. त्याला तिकीट देण्यासाठी त्यांची काही गुफ्तगू चालू होती. अशी मला माहिती मिळत होती.'
'त्यावेळी बाळासाहेबांनी ते काही होऊ दिलं नाही आणि मलाच तिकीट दिलं. चार वेळेला.. तिकीट दिलं. 2009 ला माझी उमेदवारी कापूनच टाकली. माझा पीए म्हणून सुनिल प्रभू आहे त्याला सारखं बंगल्यावर बोलवून मी तुला तिकीट देणार आहे. किर्तीकरांना देणार नाही वैगरे...'
'एवढा मोठा पक्षप्रमुख आणि अशा प्रकारे विचार करतो.. ते तोंड मारुन बुक्क्याचा मार असं म्हणतात. असा अपमान आम्ही सहन करत होतो. पण शिवसेना सोडून गेलो नाही. आमचा अपमान होत होता. बरं 2014, 2019 आम्ही NDA मध्ये होतो तेव्हा एक-एक मंत्रिपद मिळालं होतं. ते मंत्रिपद अरविंद सावंतला.'
'म्हणजे तिथं तुमची स्वत:च्या मर्जीतील माणसं. मग तेव्हा का नाही आला ज्येष्ठ शिवसैनिक गजानन किर्तीकर लक्षात?' असं म्हणत गजानन किर्तीकर यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.