भाजपचं टार्गेट जितेंद्र आव्हाड, चक्रव्यूहात अडकणार?

मुंबई
Updated Nov 16, 2022 | 11:55 IST

Jitendra Awhad vs BJP: विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसंच आव्हाडांवरील कारवाई योग्य असल्याचा निर्वाळा देखील भाजप नेत्यांनी दिला आहे.

थोडं पण कामाचं
  • विनयभंगाच्या गुन्ह्यानंतर जितेंद्र आव्हाडांना भाजपनं घेरलं
  • चित्रा वाघ, गिरीश महाजन यांची जितेंद्र आव्हाडांवर टीका
  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आव्हाडांच्या पाठिशी

Jitendra Awhad: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे सध्या बरेच अडचणीत सापडले आहेत. एका मागोमाग दोन गुन्हे त्यांच्याविरोधात दाखल झाल्यानंतर सत्ताधारी भाजप नेते त्यांच्याविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्यावर करण्यात येणारी कारवाई ही सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ असल्याचा दावा भाजप नेते करत आहेत. त्यामुळे आता भाजपचं पुढचं टार्गेट जितेंद्र आव्हाड असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. (ncp mla jitendra awhad bjps target he will get stuck in maze)

भाजपविरोधात कायम कणखर भूमिका घेऊन त्यांना विरोध करणारे नेते अशी जितेंद्र आव्हाडांची ओळख आहे. त्यामुळे आता जेव्हा जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत तेव्हा भाजपने त्यांना पुरतं घेरण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. 

अधिक वाचा: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात राडा, शिंदे आणि ठाकरे गटात हाणामारी

सुरुवातीला चित्रपट गृहातील मारहाण आणि नंतर विनयभंग प्रकरणी आव्हाडांवर गुन्हा दाखल झाला आहे. ज्यानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आव्हाडांवर हल्ला चढवला आहे. 

एकीकडे चित्रा वाघ यांनी आव्हाडांना घेरण्याचा प्रयत्न केलेला असताना दुसरीकडे राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनीही आव्हाडांवर जोरदार टीका केली आहे. तसेच आव्हाडांविरोधात जी कारवाई सुरु आहे त्या कारवाईचं त्यांनी समर्थनंही केलं आहे.

अधिक वाचा: Nagpur : आव्हाडांचा राजीनामा मंजूर होणार नाय, विधानसभा अध्यक्षांनीच सांगितलं नेमकं कारण

यावरुन आता राजकीय वर्तुळात अशीही चर्चा सुरु आहे की, भाजपला सातत्याने घेरणाऱ्या आव्हाडांना राजकीयदृष्ट्या नामोहरम करण्याची ही चांगली संधी आहे. ज्यासाठी आता भाजप नेतेही सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

मात्र, असं असलं तरीही आव्हाड देखील हे मुरब्बी राजकारणी आहेत. तसंच या सगळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी भाजपने रचलेल्या चक्रव्यूहात जितेंद्र आव्हाड अडकणार की, सहीसलामत बाहेर पडणार हे येत्या काही काळातच स्पष्ट होईल. पण तोवर आव्हाडांचा प्रवास खडतर असणार एवढं मात्र नक्की... 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी