काँग्रेसला मोठा धक्का, पाहा राधाकृष्ण विखेंनी आता काय केलं?

मुंबई
Updated Jun 04, 2019 | 16:04 IST | टाइम्स नाऊ मराठी

आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला असून आता त्यांच्या भाजप प्रवेशाचा मार्गही मोकळा दिला आहे.

Radhakrishn_Vikhe_Patil_Times_now
काँग्रेसला मोठा धक्का, पाहा राधाकृष्ण विखेंनी आता काय केलं?  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता त्यांचा लवकरच भाजप प्रवेश होणार असल्याची चर्चाही रंगली आहे. 'काँग्रेसने माझी कोंडी केली त्यामुळे माझी पक्षात घुसमट होत असल्याने आज मी विधानसभा अध्यक्षांकडे माझा राजीनामा  सुपूर्द केला आहे.' असं विखे यावेळी म्हणाले. दरम्यान, राजीनामा देण्यापूर्वी राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार, भारत भालके, जयकुमार गोरे आणि माढाचे नवनिर्वाचित खासदार रणजित निंबाळकर यांच्याशी बराच वेळ चर्चाही केली. 

राधाकृष्ण विखे यांच्या बंगल्यावर आमदारांसोबतची बैठक पार पडली. या बैठकीनंतर बोलताना विखे असं म्हणाले की, अनेक आमदार मला कायमच भेटतात. त्यामुळे कुणी राजीनामा द्यावा आणि देऊ नये हा त्या आमदाराचा प्रश्न आहे. पण आज मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देणार आहे.' त्यानंतर विखे हे विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा देण्यासाठी रवाना झाले. त्यानंतर त्यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे दिला. 

विखेंना पुण्याचं पालकमंत्री पंद मिळणार? 

राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल आहे. याच पार्श्वभूमीवर आता सूत्रांकडून अशीही माहिती मिळते आहे की, राधाकृष्ण विखे-पाटील यांचा राज्यातील मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो. तसेच त्यांना पुण्याचं पालकमंत्री पदही मिळू शकतं. 

बंडखोर आमदारांच्या भाजप प्रवेशावर खलबतं सुरू 

राधाकृष्ण विखे यांचा प्रश्न जरी मार्गी लागला असला तरीही त्यांच्या समर्थक आमदारांच्या भाजप प्रवेशाबाबत मात्र बरीच खलबतं सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विखेंसोबत किमान १० आमदार काँग्रेसला रामराम ठोकू शकतात. या बंडखोर आमदारांनी जर भाजपमध्ये केला तर त्यांचं पुर्नवसन कसं केलं पाहिजे याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. याविषयी राधाकृष्ण विखे-पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करत असल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. 
 
दरम्यान, राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदाचा याआधीच राजीनामा दिला होता. पण तांत्रिक कारणांमुळे विधानसभा अध्यक्षांनी तो मान्य केलेला नाही. याबाबत बोलताना विखे असं म्हणाले की, 'राजीनामा मंजूर झाला नसला तरीही त्या पदावर राहण्यात काही स्वारस्य नाही. त्यामुळे ते पद मी सोडलं आहे. आता काँग्रेसने तिथे कुणाची वर्णी लावायची हा त्यांचा प्रश्न आहे.' 

राधाकृष्ण विखे यांच्या राजीनाम्यानंतर आता अहमदनगर जिल्ह्यातील अनेक राजकीय गणितं बदलणार आहेत. याशिवाय त्यांचे अनेक समर्थक आमदार देखील भाजपच्या वाटेवर असल्याने तिथलीही गणितं बदलण्याची शक्यता आहे. अशावेळी मुख्यमंत्री फडणवीस शिवसेनेची मर्जी राखून ही सगळी गणितं कशी सोडवतात हे पाहणं महत्वाचं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
काँग्रेसला मोठा धक्का, पाहा राधाकृष्ण विखेंनी आता काय केलं? Description: आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला असून आता त्यांच्या भाजप प्रवेशाचा मार्गही मोकळा दिला आहे.
Loading...
Loading...
Loading...