'औरंगजेब सेक्युलर नव्हता', औरंगाबाद नामांतराच्या वादावरुन मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

मुंबई
सुनिल देसले
Updated Jan 08, 2021 | 23:26 IST

Renaming row in Maharashtra: औरंगाबादच्या नामांतरावरुन सुरू असलेल्या वादावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

CM Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे   |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई : राज्यात नामांतराच्या विषयावरुन गेले अनेक दिवस वाद सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. हा वाद सुरू असतानाच मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडलवरुन सुद्धा औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला. त्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर भाष्य करत भूमिकाही स्पष्ट केली आहे. औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेसकडून विरोध होत आहे. त्यातच औरंगजेब हा सेक्युलर नव्हता असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी थेट काँग्रेसलाच टोला लगावला आहे.

नाशिकमधील भाजपचे नेते वसंत गीते आणि सुनील बागुल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी पत्रकारांनी नामांतराच्या मुद्द्यावर विचारलेल्या प्रश्नावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, "औरंगजेब काय सेक्युलर नव्हता. त्यामुळे आमच्या आघाडीच्या अजेंड्यात सेक्युलर शब्द आहे त्यात औरंगजेब बसत नाही".

औरंगाबादचे नामांतरण करण्याची मागणी शिवसेना गेली अनेक वर्षे करत आहे. औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्यात यावे यासाठी शिवसेना प्रयत्न करत आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस पक्षाचे मत वेगळे आहे.

औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी

औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची मागणी होत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद विमानतळाचे नामांतर करण्यासाठी केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. या पत्रात मुख्यमंत्र्यांनी म्हटलं, "औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. याबाबतचा ठराव विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला आहे. नामकरणाबाबत मुख्य सचिव यांच्या स्तरावरूनही केंद्रीय मंत्रालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यानुसार, औरंगाबाद विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याबाबतची अधिसूचना लवकरात लवकर निर्गमित करण्यात यावी".

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी