लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांसाठी सांगली पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल

मुंबई
पूजा विचारे
Updated Apr 08, 2020 | 15:55 IST

Sangli police's innovative way: सांगली पोलिसांनी लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्या लोकांना जागरुक करण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे.

Sangli police on lockdown
लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांसाठी सांगलीत पोलिसांनी शक्कल  |  फोटो सौजन्य: Times Now

सांगलीः  देशात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरु आहे. त्यातच राज्यात कोरोनाग्रस्तांच्या आकडा हजारच्या पार गेला आहे.  महाराष्ट्रात मुंबईनंतर पुणे शहरात कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला आहे. देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये नागरिकांनी लॉकडाऊनचं पालन करावं यासाठी अनेक उपाययोजना आखल्या जात आहेत. लॉकडाऊनच्या दरम्यानही काही नागरिकांनी कारण नसताना घराच्या बाहेर पडत आहेत. काही नागरिक लॉकडाऊन गंभीरतेनं घेत नाहीत. त्याचवेळी सांगली पोलिसांनी अशा नागरिकांसाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे.

सांगली पोलिसांनी कोरोनाचा पोशाख घातला आणि रस्त्यावर उतरले. सांगली पोलीस रस्त्यावर उतरुन लोकांना घरात राहण्याची सूचना देत आहेत. सांगलीच्या रस्त्यावर या दिवसात कोरोनाचा पोशाख घातलेले पोलीस दिसत आहेत. 

व्हिडिओमध्ये बघू शकता की, पोलिसानं सफेद कपडे घातले आहेत आणि त्याच्या गळ्यात सांगाड्याची नकली माळ घातली आहे. पोलिसाच्या एका हातात काठी आहे तर दुसऱ्या हातात गळफासाची दोरी आहे. जसं पोलिसाला कोणत्याही व्यक्तीवर संशय येतो की, या व्यक्तीनं लॉकडाऊनचं उल्लंघन केलं आहे. तो त्याला घरात राहण्याचा सल्ला देतो. तसंच पोलीस जेव्हा एका बाईकस्वाराला रस्त्यावरुन जाताना बघतो तेव्हा त्याच्या गळ्यात दोरीचा फास टाकतो. पोलिसांना लोकांना जागरुक करण्यासाठी हा पर्याय बराच उपयुक्त ठरत आहे.

राज्यात वेगाने रुग्णांमध्ये वाढ

गेल्या 24 तासात राज्यात तब्बल 150 नवे रुग्ण आढळले आहेत. ज्यांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ही 1018 एवढी झाली आहे. यावेळी एकट्या मुंबईत 116 रुग्ण आढळले आहेत. तर पुण्यात 18 नवे  रुग्ण सापडले आहेत.  सोमवारी राज्यात एकूण 868 रुग्ण होते. मात्र, एका दिवसातच 150 रुग्ण वाढल्याने राज्यातील रुग्णांची संख्या ही 1018 एवढी झाली आहे. मंगळवारी राज्यात 12 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी झालेल्या मृत्यूपैंकी 6 मुंबईत,  3 पुण्यात  तर प्रत्येकी 1 मृत्यू नागपूर, सातारा आणि मीरा भाईंदर येथे झाला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी