"तो अहवाल लवंगी फटाका? मग इतके का घाबरले, लवंगी फटाका आहे की बॉम्ब हे लवकरच कळेल"

मुंबई
Updated Mar 24, 2021 | 19:40 IST

Sanjay Raut vs Devendra Fadnavis: राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही दिलेला अहवाल लवंगी फटाका होता तर घाबरले का? असा सवालही विचारलाय.

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल (२३ मार्च २०२१) दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं, "महाराष्ट्र पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटसंदर्भात संपूर्ण माहिती, पुरावे एका सीलबंद लिफाफ्यात आपण केंद्रीय गृहसचिवांना दिले असून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. ही संपूर्ण माहिती पडताळून सुयोग्य निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले." यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या अहवालाची खिल्ली उडवत निशाणा साधला. (Sanjay Raut said Fadanavis efforts is small cracker Devendra Fadnavis replied you will soon know it is cracker or atom bomb)

संजय राऊत यांनी म्हटलं, दिल्लीत महाराष्ट्राचा प्रभाव असायला हवा आणि त्यादृष्टीने जर विरोधी पक्षनेते दिल्लीत येत असतील तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे. ते काल काहीतरी कागद घेऊन आले आणि केंद्रीय गृहसचिवांना भेटले. त्यांच्या हातातले कागद गंभीर आहेत की नाही हे सरकार ठरवणार, त्यांनी सादर केलेल्या अहवालात काडीचा दम नाही. त्या अहवालात सरकारने काही चुकीचं केलं असं काहीही नाहीये. तो जो काही बॉम्ब वगैरे घेऊन विरोधी पक्षाचे नेते आले होते तो भिजलेला लवंगी फटाका आहे. त्या फटाक्याला वात सुद्धा नव्हती. आम्ही शोधत होतो कुठे स्फोट झाला, दिल्लीतील स्फोटाचे महाराष्ट्रात पडसाद उमटले का.

एवढे का घाबरले? फडणवीसांचा सवाल

"काल जो अहवाल मी दिलेला आहे तो लवंगी फटाका आहे की आयटम बॉम्ब आहे हे लवकरच लक्षात येईल. एवढे का घाबरले. जर तो लवंगी फटाका होता तर २५ ऑगस्टपासून दाबून का ठेवला? हा अहवाल बाहेर आल्यावर कोणाचे चेहरे बाहेर येणार होते? नेमके कोण? त्यांनाच वाचवण्यासाठी हा अहवाल दाबून ठेवला का? हा माझा प्रश्न आहे. लवकरच यामागील सत्य बाहेर येईल." अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला होता. त्यानंतर आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटचा तपशील मांडला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी ही सगळी माहिती पोलीस महासंचालकांना दिली होती तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंतही ही माहिती देण्यात आली मात्र, कारवाई काहीच झाली नाही उलट रश्मी शुक्ला यांची बढती रोखण्यात आली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी