'पार्थ पवार यांच्या मागणीला कवडीची किंमत नाही' : शरद पवार

Sharad Pawar on Parth Pawar: पार्थ पवार यांनी सुशांत सिंह प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर शरद पवार यांनी यावर भाष्य करत पार्थ पवारांवर निशाणा साधला आहे.

Sharad Pawar and Parth Pawar
शरद पवार आणि पार्थ पवार 

थोडं पण कामाचं

  • सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं मोठं वक्तव्य 
  • सीबीआय तपास करायचा असेल तर माझा विरोध नाही - शरद पवार 
  • मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे - शरद पवार 

मुंबई : सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणावर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केलं आहे. यासोबतच शरद पवार यांनी अजित पवारांचे पूत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्यावर निशाणा साधल्याचं पहायला मिळालं. सुशांत सिंह प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी पार्थ पवार यांनी केली होती. त्यावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले, "पार्थ पवार यांच्या मागणीला कवडीची ही किंमत देत नाही."

मुंबई पोलिसांवर विश्वास 

महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस यांना गेली ५० वर्षे मी ओळखतो. माझा पूर्ण विश्वास पोलिसांवर आहे. कुणी काय आरोप केले यामध्ये मी जाणार नाही. माझ्यामते हा विषय तितकासा महत्वाचा नाही. एखाद्याने आत्महत्या केली तर नक्कीच दु:ख होतं. पण त्याची चर्चा ज्या पद्धतीने होतेय त्याबद्दल आश्चर्य वाटत आहे.

सीबीआय चौकशीला विरोध नाही 

शरद पवार पुढे म्हणाले, माझा पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. पण इतके करुन सुद्धा कुणाला वाटत असेल की सीबीआय किंवा आणखी कुठल्या एजन्सीमार्फत चौकशी व्हावी तर त्याला माझा विरोध नाही.

पार्थ पवारांनी केली होती सीबीआय चौकशीची मागणी 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. यावेळी पार्थ पवार यांनी सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात यावा अशी मागणी केली होती. 

शेतकऱ्यांच्या आत्महत्येची चिंता

मी साताऱ्याच्या दौऱ्यावर होतो तेव्हा एका शेतकऱ्याने माझा हात धरला आणि म्हणाले, एक कलाकार आत्महत्या करतो दुर्दैवं आहे पण त्याची चर्चा ज्या पद्धतीने मीडियात होते त्याचं आश्चर्य वाटतं. २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या मात्र, मीडियात त्याची कोणीही नोंद घेत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या भावना काय आहेत हे माझ्या लक्षात आलं असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

...म्हणून शरद पवार नाराज?

शरद पवार यांनी राम मंदिर भूमिपूजनावर वक्तव्य करत म्हटलं होतं की, राम मंदिर बांधून कोरोना जाणार आहे का? त्यानंतर काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनी राम मंदिराला पाठिंबा देणारी भूमिका घेत 'जय श्री राम' म्हणत राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा देणारं पत्र लिहिलं होतं. तर राज्यात राष्ट्रवादी सत्तेत आहे आणि गृहमंत्रालयही राष्ट्रवादीकडे आहे त्यातच पार्थ पवार यांनी सुशांत सिंह प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी