'रात्रीस खेळ चालेल हे आता त्यांचं ब्रिद वाक्य' उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

मुंबई
Updated Jul 01, 2022 | 16:53 IST

Uddhav Thackeray : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवनात एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.

थोडं पण कामाचं
  • आरेचा निर्णय बदलल्याने मला अतीव दु:ख 
  • अमित शहांनी दिलेला शब्द पाळला असता तर...
  • एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर आणि उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर त्यांनी प्रथमच पत्रकार परिषद घेत भाष्य केलं आहे. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी तीन प्रमुख मुद्दे मांडले आहेत. यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईतील बहुचर्चित मेट्रो कारशेडचा मुद्दा. (Uddhav Thackeray said saddened by new Maharashtra governments move to relocate metro car shed to Aarey Colony)

उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईतील मेट्रो तीन चा कारशेड हा आरे कॉलनीतच करण्याच्या संदर्भात कार्यवाही सुरू करा असे स्पष्ट निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. याच मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी म्हटलं, आज प्रथमच तुम्हाला माझा चेहरा पडलेला दिसेल कारण आज मला दु:ख झालेलं असेल ते म्हणजे एका गोष्टीचं. माझ्यावर राग आहे ना मग माझ्यावर राग काढा. माझ्या पाठीत वार करा पण मुंबईच्या काळजात कट्यार घुसवू नका.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, माझा राग मुंबईवर काढू नका. आरेचा निर्णय त्यांनी बदलला त्याचं मला खरंच दु:ख झालं आहे. हा काही कुणाचा खाजगी प्लॉट नाहीये. तिथे कुठल्याही बिल्डरला जागा देत नाहीयेत तिथे पर्यावरणाला आवश्यक असलेलं जंगल, वनराई होतं ते एका रात्रीत झाडांची कत्तल झाली. रात्रीस खेळ चालेल हे आता त्यांचं ब्रिद वाक्य झालंय.

हे पण वाचा : 'हा तर ट्रेलर आहे महाराष्ट्राच्या राजकारणातला मोठा शोले येणं बाकी आहे' : आशिष शेलार

मी मुख्यमंत्री झाल्यावर त्या निर्णयाला स्टे दिला होता. स्टे दिल्यावर मुंबईच्या विकासाच्या आड मी येत होतो का? तर अजिबात नाही. मी त्यांना कांजूरमार्गचा पर्याय सुचवला होता. मी पर्यावरणाच्यासोबत आहे. जेव्हा संभ्रम निर्माण होतो तेव्हा ती गोष्ट टाळलेली बरी. माझी आजही त्यांना हात जोडून विनंती आहे की, कृपा करुन माझ्यावरचा राग मुंबईवर काढू नका. कांजूरमार्गचा प्रस्ताव दिला आहे त्यात कुठलाही अहंकार नाही. मुंबईच्या वतीने हात जोडून विनंती करतो की, आरेचा आग्रह रेटू नका जेणेकरुन पर्यावरणाला हानी पोहोचेल असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

...तर महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता

उद्धव ठाकरे म्हणाले, ज्या पद्धतीने हे सरकार स्थापन केलं आणि ज्यांनी हे सरकार स्थापन केलं त्यांच्यामते तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं. हेच तर मी अडीच वर्षांपूर्वी सांगत होतो. माझं आणि अमित शहा यांचं ठरलं होतं की, शिवसेना आणि भाजपने मुख्यमंत्र्यांचा काळ अडीच वर्षे वाटून घ्यावा. तसं झालं असतं तर, आज अडीच वर्षे झालीच आहेत जे काही घडलं आहे ते सन्मानाने झालं असतं. पहिल्या अडीच वर्षांत भाजप किंवा शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता आणि त्यानंतर आता पुन्हा ज्यांचा मुख्यमंत्री नव्हता त्यांचा झाला असता. मग त्यावेळी नकार देऊन आता भाजपने असं का केलं? मला कशाला मुख्यमंत्री बनायला लावलं? ठरल्याप्रमाणे झालं असतं तर महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी