सुशांतच्या भावाची संजय राऊत यांना नोटीस, ४८ तासांत माफी मागण्याची मागणी

Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूत याच्या भावाने शिवसेना खासदार संजय राऊत यांना एक नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये ४८ तासांत माफी मागण्याची मागणी केली आहे. 

Sushant Singh Rajput and Sanjay Raut
सुशांत सिंह राजपूत आणि संजय राऊत (फाईल फोटो) 

मुंबई : सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणात दररोज नवीन माहिती येत आहे. तसेच या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी करण्यात येत आहे. त्यातच आता सुशांत सिंह राजपूत याच्या भावाने शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांना एक नोटीस बजावली आहे. सुशांतच्या कुटुंबीयांबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या विधानानंतर त्यांना सुशांतचा चुलत भाऊ नीरज कुमार बबलू (Neeraj Kumar Bablu) यांनी नोटीस बजावली आहे. या नोटीसनुसार ४८ तासांत माफी मागण्याची मागणी केली आहे अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नीरज कुमार बबलू यांचे वकील वीरेंद्र कुमार झा अनीश यांनी सांगितले की, आम्ही शिवसेना खासदार संजय राऊत यांना ई-मेलद्वारे नोटीस पाठवली आहे. ज्यामध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवत जाहीरपणे माफी मागण्यास सांगण्यात आले आहे. संजय राऊत यांनी सुशांतच्या वडिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. सुशांतच्या वडिलांबाबत केलेलं वक्तव्य हे पूर्णपणे निराधार आणि खोटे आहे. 

सुशांतचा चुलत भाऊ नीरज कुमार यांनी म्हटलं, जर संजय राऊत यांनी ४८ तासांच्या आत जाहीरपणे आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली नाही तर कायदेशीर करावाई करण्यात येईल. राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे कुटुंबाची बदनामी झाली आहे. वकिलांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटलं आहे की, संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य निराधार आहे. 

नीरज कुमार यांनी पुढे म्हटलं, ते काही राजकीय दबावाखाली किंवा कोणाच्या तरी प्रभावाखाली असे विधान करत आहेत. त्यामुळे त्यांना ४८ तासांत आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याची संधी दिली जात आहे.

मंगळवारी बिहारचे पोलीस महासंचालक (डीजीपी) गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटलं, संजय राऊत यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याबाबत असंसदीय भाषेचा वापर केला आहे. संजय राऊत हे सुशांतच्या वडिलांबद्दल माहिती नसताना निराधार गोष्टी बोलत आहेत.

गुप्तेश्वर पांडे पुढे म्हणाले, "बिहारच्या मुख्यमंत्र्यांबाबत असंसदीय भाषा वापरल्याचे मी ऐकले. त्यांनी सुशांतचे वडील आणि माझ्या बद्दल निराधार गोष्टी केल्या असून त्यात कोणतेही तथ्य नाहीये. त्यांना सत्य माहिती नाहीये. ते एक जबाबदार व्यक्ती आहेत आणि त्यांनी हे करायला नको."

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी