Mahesh Manjrekar Politics: मुंबई: बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) या रियालिटी शोचा चौथा सीझन आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सीझनच्या निमित्ताने या शोचे सूत्रधार आणि मराठीतील ज्येष्ठ दिगदर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी 'Times Now मराठी'शी खास संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या शोच्या नव्या सीझनबाबत माहिती तर दिलीच. पण याचवेळी त्यांनी राज्यात देखील नुकताच एक बिग बॉसचा शो घडला अशी मिश्किल टिप्पणी करत एकूणच राज्यातील राजकारणावर रोखठोक भाष्य केलं. (thackeray government is a bit late than i expected mahesh manjrekars explosive reaction bigg boss marathi)
'हे सरकार (ठाकरे सरकार) पडणार होतं याची मला 1000 खात्री होती. पण माझ्या अपेक्षेपेक्षा हे सरकार जरा लेटच पडलं.' अशी थेट प्रतिक्रिया यावेळी महेश मांजरेकर यांनी दिली आहे. त्यामुळे एकप्रकारे मांजरेकरांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकाच केल्याचं आता बोललं जात आहे.
'ठाकरे सरकार जायला थोडं लेटच झालं!'
प्रश्न: काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात बिग बॉसचा एक वेगळा खेळ बघायला मिळाला. आता तुम्हाला काय वाटतं की, महाराष्ट्रातील खरा बिग बॉस कोण राजकारणातला?
महेश मांजरेकर: महाराष्ट्रात नुकताच जो एक राजकीय बिग बॉस पाहायला मिळाला तो शो खरं मला होस्ट करायला आवडला असता. बघा.. जे घडणार आहे ते घडणार आहे. ते घडणार असं मला कायम वाटत होतं. जेव्हा विचारधारा वेगवेगळ्या असतात ना तेव्हा काही वेळेस तुम्ही एकत्र येऊ शकतात. पण काही मुद्द्यांवर तुम्हाला भूमिका घ्याव्या लागतात. पण नाही घेतल्या भूमिक तर मग थोडीशी खदखद आहे हे जगजाहीर होतं.
त्यामुळे मला काही खूप आश्चर्य वाटलं नाही. त्यात कोण बरोबर कोण चुकीचं या वादात मला पडायचंच नाहीए. पण जे झालं ते खूप नाट्यमय होतं. मला वाटतं जेवढे लोकं बिग बॉस एन्जॉय करतात किंवा कुठलाही शो एन्जॉय करतात तितकंच हे देखील एन्जॉय केलं.
अधिक वाचा: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बाळासाहेबांचा सर्वात जवळचा माणूस शिंदे गटात
प्रश्न: तुम्हाला असं काही वाटलं होतं का.. की महाराष्ट्रात असं काही घडेल?
महेश मांजरेकर: मला 1000 टक्के वाटलं होतं की, महाराष्ट्रात असं काही घडेल म्हणून. मला 1 वर्षापासून वाटलं होतं की, हे सरकार जाईल म्हणून. खरं तर मला वाटतं ते जरा लेट झालं असंच वाटतंय. कारण काय असतं.. परत मी सांगतो ना. विचारधारा वेगवेगळे असलेले तीन पक्ष जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा हे काही सोप्पं नसतं की, तुम्ही सरकार नियंत्रणात ठेवू शकाल.
उद्धव ठाकरेंना त्याबाबतीत मी खरं तर बरेच मार्क देईन. कारण त्यांनी एवढे दिवस बांधून ठेवून. विचारधाराच वेगळी होती ना पूर्णपणे पक्षांची. तुमची विचारधार वेगळी आहे. खरं तर माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त काळ टिकलं हे सरकार.
अधिक वाचा: 'ALL IS WELL', पण Bigg Bossच्या घरात होणार स्पर्धकांची दांडी गुल!
कोणते राजकारणी तुम्हाल बिग बॉसच्या घरात बघायला आवडतील?
महेश मांजरेकर: बघा.. तुमच्याकडे ती कला हवी.. मला वाटतं की, राजकीय नेते म्हणाल तर.. अमोल मिटकरी हे मस्त आहेत. मला ते हे आवडतील बघायला गुलाबराव पाटील... त्यांना ह्यूमर चांगला आहे. तसंच नितेश राणे आवडतील.. ते वेगळे रंग दाखवतील बिग बॉसमध्ये... आणि संजय राऊत. पण ही सगळी लोकं खूप निराळी आहेत. त्यांचं-त्यांचं एक वेगळेपण त्यांच्याकडे आहेत. म्हणून मला ही लोकं बिग बॉसच्या घरात पाहायला आवडतील.
अशी रोखठोक उत्तरं महेश मांजरेकर यांनी महाराष्ट्रातील राजकारणाबाबत दिली आहेत. त्यामुळे आता त्यांच्या या प्रतिक्रियेचे नेमके राजकीय पडसाद काय उमटतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.