Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंच्या बिहार दौऱ्यामागचं गुपित काय?

मुंबई
Updated Nov 23, 2022 | 12:34 IST

Aaditya Thackeray and Tejashwi Yadav: शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे थेट बिहारला जाऊन थेट तेथील उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहेत. जाणून घ्या या भेटीमागचं गुपित काय

थोडं पण कामाचं
  • आदित्य ठाकरे निघाले थेट बिहारच्या दौऱ्यावर
  • आदित्य ठाकरे बिहारमध्ये जाऊन घेणार उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवांची भेट
  • आदित्य ठाकरेंच्या भेटीमागचं गुपित काय?

Aaditya Thackeray: मुंबई: भाजपपासून दूर गेल्यानंतर शिवसेनेने वेगळ्या राजकारणाला सुरुवात केली आहे. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्यानंतर शिवसेनेने आपल्या राजकारणाचा बाजच बदलून टाकला आहे. कधी काळी कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा शिवसेना हा पक्ष आता सॉफ्ट हिंदुत्वासह काहीसा सेक्युलारिझमकडे वळला आहे. मात्र, यामुळे अनेक वर्ष मित्र पक्ष असणारा भाजप त्यांच्यापासून दुरावला आहे. (what is the secret behind aaditya thackerays visit to bihar and meeting with tejashwi yadav)

अशावेळी राजकारणात आपलं महत्त्व टिकवून ठेवायचं असेल तर इतर पक्षांना मित्र म्हणून जवळ करायला हवं हेही शिवसेनेला कळून चुकलं आहे. त्यातही शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी थेट राष्ट्रीय पातळीवरील मित्रांना जवळ करण्यास सुरुवात केली आहे.

अधिक वाचा: PM Narendra Modi : मी दररोज दोन ते तीन किलो शिव्या खातो, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तेलंगाणात वक्तव्य

काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेला आपली सत्ता गमवावी लागली आणि त्यांच्या पक्षाचे दोन तुकडेही झाले. त्यातच आता येत्या काही महिन्यात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका देखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निवडणुका खरं तर शिवसेनेच्या अस्तित्वाच्या आहेत. यामुळे आता काहीशा कमकुवत झालेल्या आपल्या पक्षाला उभारी देण्यासाठी स्वत: आदित्य ठाकरे हे अवघा महाराष्ट्र पिंजून काढत आहेत.

असं असताना आता आदित्य ठाकरेंनी थेट बिहारला जाण्याचा निर्णय घेतला आहे. आदित्य ठाकरे हे बिहारला जाऊन उपमुख्यमंत्री आणि आरजेडीचे नेता तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहेत. तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानी या दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे. पण आदित्य ठाकरेंचा बिहार दौरा नेमका कशासाठी? याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु आहे.

सध्या शिवसेना भाजप विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहे. दोनच दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर एकत्र पाहायला मिळाले होते. तर त्याआधी आदित्य ठाकरे हे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतही सहभागी झाले होते. तशाच स्वरुपाची भेट आदित्य ठाकरे आणि तेजस्वी यादव यांच्यात होणार आहे. या भेटीनंतर आदित्य ठाकरे हे नव्या राजकारणाची सुरुवात करणार असल्याचं बोललं जातं आहे. 

मुंबई निवडणूक आणि बिहारी मतदार... 

यापेक्षाही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आदित्य ठाकरेंचा हा दौरा मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आखण्यात आला आहे. मुंबई महापालिका निवडणूक शिवसेनेसाठी प्रचंड प्रतिष्ठेची असणार आहे.

अधिक वाचा: कन्हैया कुमार यांचा PM मोदींना सवाल, एकापाठोपाठ तीन मुख्यमंत्री का बदलले?

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. मात्र, सध्याची परिस्थिती शिवसेनेसाठी फारच नाजूक आहे. यामुळेच एकही मतदार आपल्यापासून दुरावला जाऊ नये यासाठी शिवसेने हरतऱ्हेचे प्रयत्न सुरु केले आहेत.

मुंबईत बिहारी मतदार हे फार मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांच्या मतांचा टक्का लक्षात घेतल्यास महापालिका निवडणुकीत ते निर्णायक भूमिका बजावू शकतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन आदित्य ठाकरे तेजस्वी यादवांच्या भेटीला जात असल्याची चर्चा आहे.

एकीकडे भाजप कट्टर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन आपलं राजकारण पुढे रेटत असताना दुसरीकडे शिवसेना सेक्युलारिझमचं राजकारण करत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी आता आदित्य ठाकरेंचा हा पाटणा दौरा शिवसेनेला किती यश मिळवून देणार हे येणारा काळच ठरवेल. पण भाजपला सहजासहजी सत्ता मिळू द्यायची नाही यासाठी ठाकरेंनी मात्र आत्तापासूनच शड्डू ठोकला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी