[VIDEO] बाळासाहेबांच्या खोलीत बसून मी 'ठरलेलं' खोटं बोलणार नाही, उद्धव ठाकरे झाले भावुक 

मुंबई
Updated Nov 08, 2019 | 21:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

Uddhav Thackeray: बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत बसून माझी अमित शहांशी चर्चा झाली होती. त्यानंतर याबाबत देवेंद्र फडणवीस यांना कळविण्यात देखील आलं होतं. त्यामुळे मी खोटं बोलत नाहीए. असं उद्धव ठाकरे म्हणाले.

while sitting in balasaheb's room I had a discussion with amit shah about cm post uddhav thackeray became passionate
बाळासाहेबांच्या खोलीत बसून मी 'ठरलेलं' खोटं बोलणार नाही, उद्धव ठाकरे झाले भावुक   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

 • 'मला शिवसेनेचा मुख्यमंत्री बनविण्यासाठी अमित शहा, फडणवीस यांच्या आशीर्वादाची गरज नाही'
 • 'शिवसेनाप्रमुखांचा मुलगा खोटा हे मी सहनच करु शकत नाही'
 • 'भाजपने सत्ता स्थापनेचा दावा करावा नाहीतर सर्व पर्याय खुले आहेत.'  

मुंबई: काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार) पत्रकार परिषद घेऊन आपण किंवा अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद असा कोणताही फॉर्म्युला दिलेला नव्हता असं म्हटलं होतं. फडणवीस यांच्या या दाव्यानंतर साधारण तासाभरातच उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी उद्धव ठाकरे काहीसे उद्विग्न झाल्याचं दिसून आले. 'स्वत: अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आणि सत्तेचं समसमान वाटप याचं आश्वासन दिलं होतं. बाळासाहेबांच्या खोलीत बसून या सगळ्या चर्चा झाल्या होत्या. त्यामुळे मी याबाबत कधीही खोटं बोलणार नाही.' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यावर टीका केली. 

पाहा उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले: 

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केली होती की, अडीच वर्ष मुख्यमंत्री पद दिलं तरच भाजपसोबत चर्चा होईल. पण भाजपने शिवसेनेला असं आश्वासन दिलंच नव्हतं अशी भूमिका घेत उद्धव ठाकरे यांना खोटं पाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच खोटं बोलत असल्याचा दावा केला. 
 
'लोकसभा निवडणुकीनंतर मला अमित शहा यांचा फोन आला. त्यावेळी त्यांना सांगितलं की, माझ्या वडिलांना वचन दिलं आहे. तेव्हा अमित शहा मला म्हणाले की, ज्याच्या जागा जास्त येईल त्याचा मुख्यमंत्री होईल. मी म्हटलं नाही. या गोष्टीमुळेच आपण आतापर्यंत एकमेकांना खड्ड्यात टाकत आलो. त्यामुळे आता असं नको. मग शहा मला म्हणाले की तुम्हाला काय हवं? मी त्यांना सांगितलं की, जागांचं समान वाटप, सत्तेत समान वाटा आणि  अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पद. तेव्हा ते म्हणाले ठीक आहे. जेव्हा आमचा मुख्यमंत्री असेल तेव्हा तुम्ही आम्हाला कन्सिडर करा आणि जेव्हा तुमचा असेल तेव्हा आम्ही कन्सिडर करु. मी म्हटलं ठीक आहे. त्यानंतर अमित शहा हे मातोश्रीवर आले. तेव्हा आम्ही शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत बसून चर्चा केली. त्यावेळी ते मला म्हणाले की, माझ्या काळात संबंध बिघडले होते आता माझ्याच कार्यकाळात मला ते संबंध सुधारायचे आहेत. मी त्यांना म्हटलं की, तुम्ही हे म्हणत आहात तेच आमच्यासाठी खूप आहे. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की, जे आपलं ठरलं आहे ते आपण आपल्या लोकांना सांगावं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना सांगण्यात आलं. तेव्हा फडणवीस म्हणाले की, उद्धवजी एक काम करु आताच जर आपण सांगितलं की,मुख्यमंत्रीपदाचं वाटप करण्यात आलं आहे तर आमच्या पक्षात मला त्रास होऊ शकतो. त्यामुळे मी माझ्या शब्दात काय ते मांडतो. तेव्हा त्यांनी पद आणि जबाबदाऱ्या यांचं समसमान वाटप होईल असं सांगितलं होतं. त्यामुळे कोण खोटं बोलतं हे आता जनतेसमोर आलं आहे.' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकूणच नेमकं काय घडलं होतं याबाबत माहिती मीडियासमोरच दिली. 

पाहा उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील काही महत्त्वाचे मुद्दे: 

 1. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पाहून काळजी वाटली. 
 2. मुख्यमंत्र्यांनी अचाट काम केली त्याबद्दल त्यांना धन्यवाद 
 3. पण आम्ही त्यांच्यासोबत नसतो तर ते अचाट विकासकामं केली असती का? 
 4. बाळासाहेबांनी सांगितलं होतं की, शब्द दिला म्हणजे दिला. परत घ्यायचा नाही. शब्द देताना लाख वेळा विचार 
 5. माझ्यावर पहिल्यांदा खोटेपणाचा आरोप केला. 
 6. देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांचा संदर्भ घेऊन खोटेपणाचा आरोप केला. मी त्यांना सांगू इच्छितो की, शहा आणि कंपनीने केले 
 7. लोकसभेच्या वेळेस मी दिल्लीला गेलो नाही. ते माझ्याकडे आले होते. 
 8. उपमुख्यमंत्रिपद मिळेल पण मी लाचार नाही. 
 9. शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणार असं मी शिवसेनाप्रमुखांना वचन दिलं आहे
 10. मला त्यासाठी अमित शहा आणि फडणवीस यांच्या आशीर्वादाची गरज नाही 
 11. अमित शहा यांनी मला मला फोन केला होता. त्यावेळी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाबाबत मी त्यांना सांगितलं होतं.
 12. मातोश्रीवर येऊन त्यांनी आमच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना त्याबाबत कळवण्यात आलं होतं.  
 13. देवेंद्र म्हणाले की, मी अडीच वर्षाचं बोललो तर मी अडचणीत येईल पण मी माझ्या शब्दात बोलतो. शब्दाचे खेळ त्यांनी केली. 
 14. फडणवीस हे चांगले मित्र आहेत. ते होते म्हणून मी पाठिंबा दिला होता. 
 15. पण फडणवीस यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती 
 16. अनौपचारिक चर्चेत फडणवीस जे म्हणाले ते सहन केलं जाऊ शकत नाही
 17. शिवसेनाप्रमुखांचा मुलगा खोटा हे मी सहनच करु शकत नाही
 18. शिवसेनेसमोर खोटारडा म्हणून जाऊ शकत नाही 
 19. गेल्या पाच वर्षात अच्छे दिन म्हणून खोटं कोण बोलतं ते जनतेला माहिती आहे. 
 20. आम्ही मोदीजींवर टीका केलेली नाही. मोदी यांनी मला लहान भाऊ म्हटलं आहे. आमच्या या नात्यामुळे जर कुणाच्या पोटात दुखत असेल तर त्याचा शोध मोदींनी घ्यावा.  
 21. मला खोटं ठरविणाऱ्या माणसांशी बोलणार नाही 
 22. तुम्ही आमच्यावर पाळत ठेवत होता का? 
 23. सत्ता स्थापनेचा दावा करावा नाहीतर सर्व पर्याय खुले आहेत. 
 24. नाणारबाबत देखील मुख्यमंत्री खोटं बोलले
 25. राम मंदिर निकालाचं श्रेय कोणत्याही सरकारचं नसेल. ते कोर्टाचं असेल
 26. मला खोटं ठरविण्याचा प्रयत्न काळजीवाहूने करु नये 
 27. जे ठरलं ते अमित शहा यांनी मान्य केलं होतं. 
 28. लोकसभेच्या वेळेस जे काही ठरलं होतं त्यापेक्षा मला एक कणही जास्त नको
   

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...