नागपूर : महाराष्ट्राला हादरवणारी घटना नागपूर (Nagpur) जिल्ह्यात समोर आली आहे. जिल्ह्यातील चार मुलांना ‘ब्लड बँके’तून (blood bank) दिलेल्या रक्तातून एचआयव्हीची (HIV) लागण झाल्याची घटना समोर आली आहे. भयंकर म्हणजे यामधून एका बालकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून तातडीने चौकशीचे आदेश आरोग्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्याच्या आरोग्य विभागाचे सहाय्यक उपसंचालक डॉ. आर के धकाते यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार लहान मुलांना ब्लड बँकेतून एचआयव्ही झाला. ही मुलं थॅलेसेमिया या गंभीर आजाराने ग्रस्त होती. या चौघांचे रिपोर्ट एचआयव्ही पॉझिटिव्ह आल्यानंतर उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, थॅलेसेमिया (Thalassemia) या गंभीर रक्ताच्या आजाराशी ही मुलं तोंड देत होती. असे असताना या चिमुकल्यांना कुठल्यातरी ‘ब्लड बँके’तून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीची लागण झाली. ही अतिशय गंभीर बाब असून रक्ताची चाचणी झाली नाही का? असा सवाल आता विचारण्यात येत आहे. तर या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे आदेश, आरोग्यमंत्री राजेश टोपे (State Health Minister Rajesh Tope) यांनी दिले आहेत.