वर्धा : एका माथेफिरूने चक्क गर्भवती श्वानाच्या पोटात चाकू भोसकून निर्दयीपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यातील देवळी शहराच्या मुख्य चौक समजल्या जाणाऱ्या ठाकरे चौकात घडली आहे. सदर घटनेचा सीसीटीव्ही देखील समोर आला असून, या घटनेने जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. सदर घटना मध्यरात्री ११.१५ वाजताच्या सुमारास घडली आहे. सदर घटना घडून दोन दिवस उलटले असताना देखील गर्भवती श्वानाची हत्या करणाऱ्या आरोपी विरोधात आणखी कुठलीही कारवाई झाली नसल्याची माहिती आहे. त्याचबरोबर एकही प्राणी मित्र किंवा संघटनांनी दखल घेतली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अधिक वाचा : आज आहे नील आर्मस्ट्रॉंग यांची पुण्यतिथी, वाचा आजचे दिनविशेष
मिळालेल्या माहितीनुसार, सदर माथेफिरूने मध्यरात्रीच्या सुमारास श्वानाची निर्घुणपणे हत्या केली आहे. २१ ऑगस्ट रोजी रविवारच्या रात्री ११ वाजून १९ मिनिटांनी सदर घटना घडली आहे. लाल शर्ट घातलेला अज्ञात माथेफिरु ठाकरे चौकात आला. यावेळी, तो मोठमोठ्याने ओरडत होता. त्याच्या हातात एक धारधार चाकू देखील होता. त्याने रस्त्याकडेला झोपून असलेल्या गर्भवती श्वानाच्या पोटात चाकूने सपासप वार करून श्वानाची निर्दयीपणे हत्या केली. दरम्यान, सदर घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ आता सोशल मिडियावरती व्हायरल झाला असून, या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी वर्धेच्या युवा परिवर्तन आवाज संघटनेने केली आहे. प्रत्यक्षदर्शी असलेल्या नागरिकांनी त्या माथेफिरुला हटकले असता हल्लेखोराने चाकूचा धाक दाखवून तो गोल्हर गल्लीकडे पळून गेला असल्याची माहिती त्या प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने दिली आहे.
अधिक वाचा ; घर खरेदी करण्यापूर्वी या गोष्टींची घ्या काळजी होईल भरभराट
दरम्यान, अज्ञात माथेफिरूने श्वानाच्या पोटावर चाकूने वार केल्यानंतर श्वानाने जीव वाचविण्याच्या प्रयत्नात पळ काढला. मात्र, काही अंतरावर गेल्यावर श्वान जमिनीवर कोसळले आणि तिचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेप्रकरणी आरोपीला अटक न केल्यास आंदोलनाचा इशाराही संघटनेने दिला आहे.
अधिक वाचा ; गणेश चतुर्थीच्या दिवशी घरात उंदीर दिसला तर शुभ असतं का अशुभ