नागपूर : राज्यात एकीकडे राजकीय उलथापालथीची परिस्थिती असतानाच दुसरीकडे विदर्भासह अन्य भागातील जनता अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे हैराण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर होते, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूरग्रस्तांच्या सांत्वनासाठी पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यात व्यस्त होते. (All possible help to the farmers affected by the floods, Devendra Fadnavis met the victims and assured them)
अधिक वाचा : 'मी बोलायला लागलो तर भूकंप होईल', रामदास कदमांना 'नेमकं' काय माहितीए?
देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विभागातील पूरपरिस्थितीचा आढावा प्रशासनाकडून घेतला. तसेच वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा केला. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट आणि समुद्रपूर परिसरातील पूरस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. वर्धा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे.
अधिक वाचा : Uddhav Thackeray । उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिले 50 लाखांचे टार्गेट
पूरग्रस्त कान्होली या गावात जेव्हा देवेंद्र फडणवीस पोहचले. तेव्हा त्यांना महिलांनी घेराव घातला. आमच्या गावात किती आमदार, खासदार आले. पण आम्हाला कसलीच सुविधा नाही. शाळा नाही, रस्ता नाही. आमच पुनर्वसन झालं पाहिजे, अशी आग्रही मागणी या महिलांनी त्यांच्याकडे केली. तेव्हा त्यांच्या डोळ्यात आश्रु अनावर झाले.
केवळ विदर्भातच नाही तर नागपूरसह अन्य जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवारी पूरग्रस्त भागाचा आढावा घेतल्यानंतर फडणवीस म्हणाले की, पूरग्रस्तांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. पुरामुळे शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. लेंडी नाला व लाडकी नदीला पूर आल्याने गाव जलमय झाले होते. रात्रीपासूनच घरात पाणी शिरू लागले, त्यामुळे लोकांनी घराच्या उंच ठिकाणी जाऊन स्वत:ला सुरक्षित ठेवले. यापूर्वी 9 जुलै रोजी पावसामुळे अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.
वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील खेडगाव येथे पुराच्या पाण्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊन शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पीडित शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या नुकसानीचा आढावा घेतला. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असून अधिकाधिक मदत केली जाणार असल्याची ग्वाही फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिली.