Amravati Violence: अमरावतीमध्ये संचराबंदी लागू, तीन दिवस इंटरनेट सेवा बंद; त्रिपुरावरुन पसरली अफवा

नागपूर
भरत जाधव
Updated Nov 14, 2021 | 11:17 IST

 Amravati Violence: त्रिपुरात (Tripura) घडलेल्या अत्याचाराच्या प्रकारानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. शुक्रवारी राज्यातील विविध भागांमध्ये मुस्लीम संघटनेकडून (Muslim organization) निषेध मोर्चे काढण्यात आले होते.

curfew imposed in Amravati, internet service down for three days
अमरावतीमध्ये संचराबंदी लागू, तीन दिवस इंटरनेट सेवा बंद  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • अमरावती येथे 5 हुन अधिक जमाव घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
  • अमरावतीतील राजकमल चौकात मोठ्या संख्येने जमाव एकवटला आणि दुकानांची तोडफोड केली.
  • त्रिपुराबाबतच्या खोट्या बातम्यांच्या आधारे महाराष्ट्रात हिंसाचारा - गृह मंत्रालय

Amravati Violence: अमरावती:  त्रिपुरात (Tripura) घडलेल्या अत्याचाराच्या प्रकारानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. शुक्रवारी राज्यातील विविध भागांमध्ये मुस्लीम संघटनेकडून (Muslim organization) निषेध मोर्चे काढण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी अमरावती बंदची (Amravati Bandh) हाक देण्यात आली होती, पण या बंदला हिंसक (Violence) वळण लागलं. हिंसक वळण लागल्यानंतर शनिवारपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यासोबतच पुढचे तीन दिवस इंटरनेट सेवा (internet service ) निलंबित करण्यात आली असल्याची माहिती आहे. 

शहर पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी याविषयीची माहिती दिली. अमरावती येथे 5 हुन अधिक जमाव घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातून आंदोलन चिघळू नये, यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच या संदर्भात सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी जारी केले आहेत.

अमरावतीच्या अचलपूर, परतवाडा, कांडली परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याविषयी अचलपूर उपविभागीय अधिकारी यांच्याकडून पत्रक जारी करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपकडून बंद पुकारण्यात आला होता, त्यावेळी काह समाजकंटकांनी दुकानावर दगडफेक केली. त्रिपुरामध्ये झालेल्या सांप्रादायिक घटनेच्या विरोधात अमरावतीमध्ये मुस्लीम संघटनेकडून शुक्रवारी एक अयोजित करण्यात आलेल्या रॅलीदरम्यान दगडफेक झाली. याचा निषेध म्हणून भाजपकडून बंदचे आवाहन करण्यात आले होते. 

हिंसाचार प्रकरणी 20 जणांना आतापर्यंत अटक

त्रिपुरा दंगलीचे पडसाद महाराष्ट्रात उमटत असून अमरावतीत या पार्श्वभूमीवर हिंसक वातावरण झालेले आहे. शुक्रवारपासून अमरावती शहरात तणाव आणि दशहतीचे वातावरण झाले होते. शनिवारी अमरावतीतील राजकमल चौकातही मोठ्या संख्येने जमाव एकवटला आणि दुकानांची तोडफोड केली. शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन पोलीस आणि पालकमंत्र्यांनी केलेले असूनही जमावाकडून हिंसक घटना घडत आहे. अमरावतीमध्ये शुक्रवार आणि शनिवारी झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी 20 एफआयआर नोंदवले आहेत, तर 20 जणांना अटक करण्यात आली आहे. अमरावती वगळता संपूर्ण राज्यात शांतता असल्याचे गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. आम्ही स्थानिक लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करतो. समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. कोणी चिथावणी दिल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल.

मशिद पाडल्याची घटना घडलेली नाही - गृह मंत्रालय

या प्रकरणावर, गृह मंत्रालयाने सांगितले की, महाराष्ट्रात हिंसाचार आणि आक्षेपार्ह भाषणबाजीच्या बातम्या आल्या आहेत, ज्याचा उद्देश त्रिपुराबाबतच्या खोट्या बातम्यांच्या आधारे शांतता आणि सलोखा बिघडवणे हा आहे. “हे अतिशय चिंताजनक आहे आणि शांतता राखण्याची विनंती केली जात आहे,” असे मंत्रालयाने म्हटले आहे. गृह मंत्रालयाने स्पष्ट केले की अलीकडच्या काळात त्रिपुरामध्ये कोणत्याही मशिदीची तोडफोड झाल्याची नोंद झालेली नाही. मंत्रालयाने हेही स्पष्ट केलं की. सोशल मीडियाच्या काही पोस्टमध्ये नमूद केल्या प्रमाणे, या घटनांमध्ये कोणतीही व्यक्ती गंभीर जखमी झालेली नाही, किंवा बलात्कार, मृत्यू झालेला नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी