गुन्हा दाखल करत नाना पटोलेंना अटक करा, नितीन गडकरींची मागणी

नागपूर
भरत जाधव
Updated Jan 18, 2022 | 11:24 IST

Nitin Gadkari on Nana Patole : भाजप (BJP) आणि काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष (Congress state president) नाना पटोले (Nana Patole) यांच्यात वाद उभा राहिला आहे. नाना पटोले यांच्याविरोधात भाजप आक्रमक झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी (Prime Minister Narendra Modi) वादग्रस्त विधान केल्यानं नाना पटोले अडचणीत सापडले आहेत.

Arrest Nana Patole by filing a case, demands Nitin Gadkari
नाना पटोलेंना अटक करा, नितीन गडकरींची मागणी   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gakari) यांनी ट्विट करत नाना पटोले यांच्या अटकेची मागणी केली आहे.
  • जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेदरम्यान काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
  • भाजपचे खासदार सुनील मेंढे यांनी सोमवारी संध्याकाळी भंडारा पोलीस ठाण्यात पटोले यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

Nitin Gadkari on Nana Patole : मुंबई :  भाजप (BJP) आणि काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष (Congress state president) नाना पटोले (Nana Patole) यांच्यात वाद उभा राहिला आहे. नाना पटोले यांच्याविरोधात भाजप आक्रमक झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी (Prime Minister Narendra Modi) वादग्रस्त विधान केल्यानं नाना पटोले अडचणीत सापडले आहेत. भाजप नेत्यांकडून अटकेची मागणी केली जात आहे. आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी नाना पटोले यांना अटक करा, अशी मागणी केली आहे. (Arrest Nana Patole by filing a case, demands Nitin Gadkari)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gakari) यांनी ट्विट करत नाना पटोले यांच्या अटकेची मागणी केली आहे. आपल्या ट्विटमध्ये नितीन गडकरी यांनी म्हटलं, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह आणि निंदनीय आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की पटोलेंवर गन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात यावी." दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मी काहीही बोललो नाही, असे स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिले आहे. भाजप विरोधात नाना पटोले आधीपासून आक्रमक आहेत. त्यांनी संधी मिळेल त्यावेळी भाजपवर जोरदार टीका केली आहे. 

पंतप्रधान मोदी यांच्यावरील वक्तव्याने नाना पटोले वादात घेरले गेले आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेदरम्यान काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत नाना पटोले हे मोदींना मारण्याची आणि शिव्या देण्याचं दिसून येत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच भारतीय जनता पक्षाने (BJP) आक्रमक पवित्रा घेत पटोलेंच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून अटकेची मागणी करण्यात येत आहे. 

भाजप आक्रमक

भाजपचे खासदार सुनील मेंढे यांनी सोमवारी संध्याकाळी भंडारा पोलीस ठाण्यात पटोले यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रारीची नोंद घेतली असून, अधिक तपास करुन पुढील कार्यवाही करणार असल्याचे सांगितले.   भंडारा जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक आज, मंगळवारी होत आहे. त्यानिमित्ताने 16 जानेवारीला प्रचाराच्या अखेरच्या दिवशी लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील सभेत पटोले यांनी 'मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो', असे वक्तव्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.   

पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी गडकरी यांनी केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांची पोलिसांत तक्रार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची आणि शिव्या देण्याची धमकी देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी रात्री कूही पोलीस ठाण्यात दाखल केली.
देशाच्या सन्माननीय पंतप्रधानांना अशी गंभीर धमकी देणारे नाना पटोले यांच्यावर तत्काळ गुन्हा नोंदविण्यात यावा आणि त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी या तक्रारीच्या माध्यमातून बावनकुळे आणि इतर भाजपा नेत्यांनी पोलिसांना केली. 

व्हिडिओनंतर भाजप नेत्यांनी नाना पटोले यांच्यावर जोरदार टीका केली. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, देशाच्या पंतप्रधानांबद्दल काँग्रेसवाल्यांच्या मनात एवढा द्वेष आहे की ते पंतप्रधानांना मारण्यापर्यंत बोलत आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे हे वक्तव्य अत्यंत गंभीर आणि आक्षेपार्ह आहे. काँग्रेस पक्षाच्या या विधानाचा पंजाबमध्ये झालेल्या घटनेशी संबंध आहे का?, असा सवाल संबित पात्रा यांनी केला आहे.  

मी पंतप्रधान मोदींबाबत असे म्हटले नाही - पटोले

"मी का भांडतो? गेल्या ३० वर्षापासून मी राजकारणात आहे. लोकं ५ वर्षांत आपल्या एका पिढीचा उद्धार करतात. शाळा, कॉलेज करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढी वर्षं झाली राजकारण करत आहे. पण एक शाळा माझ्या नावावर नाही. इथून पाठीमागे एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला कायम मदत करत आहे. म्हणून मी मोदी यांना मारु शकतो, त्यांना शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आले. एक प्रामाणिक नेतृत्व तुमच्या समोर उभे आहे...." दरम्यान, प्रचारसभेदरम्यान आपण पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल बोललो नाही, तर मोदी नावाच्या एका गावगुंडाबाबत बोललो, असे स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी