Tiger hunting : भंडारा जिल्ह्यात मृतावस्थेत आढळलेल्या ‘त्या’ वाघाची शिकारच, दोघांना अटक

भंडारा  जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रांतर्गत येणार्‍या बावनथडी वितरिकेतील पाण्यात पट्टेदार वाघाचा मृतदेह आढळला होता.  दोन वाघांच्या झुंजीत या वाघाचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज शवविच्छेदना अंती वन विभागाने व्यक्त केला होता. परंतु, या वाघाची शिकार करुन त्याला पाण्यात फेकून दिल्याचे  स्पष्ट झाले आहे.

tiger death
वाघाचा मृतदेह  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भंडारा  जिल्ह्यात पट्टेदार वाघाचा मृतदेह आढळला होता.
  • दोन वाघांच्या झुंजीत या वाघाचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वन विभागाने व्यक्त केला होता.
  • परंतु, या वाघाची शिकार करुन त्याला पाण्यात फेकून दिल्याचे  स्पष्ट झाले आहे.

Tiger Hunting : भंडारा : भंडारा  जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रांतर्गत येणार्‍या बावनथडी वितरिकेतील पाण्यात पट्टेदार वाघाचा मृतदेह आढळला होता.  दोन वाघांच्या झुंजीत या वाघाचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज शवविच्छेदना अंती वन विभागाने व्यक्त केला होता. परंतु, या वाघाची शिकार करुन त्याला पाण्यात फेकून दिल्याचे  स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी वाघाची शिकार करणार्‍या दोघांना वन विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली आहे. तुळशीराम दशरथ लिल्हारे व त्याचा मुलगा शशिकांत तुळशीराम लिल्हारे अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून शिकारीसाठी वापरण्यात आलेले साहित्यसुद्धा जप्त करण्यात आले आहेत.(bhandara district two arrested for tiger hunting)

३१ मार्च रोजी बावनथडी धरणाच्या वितरीकेत अल्पवयस्क वाघाचा मृतदेह आढळला होता. शुक्रवारी वाघाचे शवविच्छेन चिंचोली येथील शासकीय आगारात करण्यात आले होते. शवविच्छेदनाअंती स्थानिक वाघांशी झालेल्या झटापटीत गंभीर जखमी झाल्याने तसेच उपासमारीमुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वन विभागाने व्यक्त केला होता. परंतु, वाघाच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळून आल्या होत्या. जबड्यातील खालील एक सुळा अर्धवट तुटलेल्या होता. तसेच समोरचा उजवा पाय सांध्यामधून निखळलेला आढळला होता. त्यामुळे वाघाचे शवविच्छेदन करणार्‍या पशु वैद्यकीय अधिकार्‍यांनी वाघाची शिकारच झाल्याचे स्पष्ट केले होते. 

दरम्यान, शनिवारी भंडारा पोलीस विभागाच्या श्वान पथकाला सकाळीच पाचारण करण्यात आले होते. सहाय्यक वनसंरक्षक,प्रकष्ठ निष्कासन अधिकारी, गडेगाव  साकेत शेंडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या तपासात घटनास्थळ परिसरात आढळून आलेल्या पुराव्यांच्या आधारे स्थानिक पाच संशयितांची वन विभागाद्वारे कसून चौकशी करण्यात आली. दरम्यान आरोपी तुळशीराम दशरथ लिल्हारे याच्या शेतात काही वन्यप्राण्यांचे हाडे ,कवठी, करंट लावण्यासाठी वापरण्यात येणार्‍या खुंट्या आणि इतर साहित्य वनविभागाचे अधिकार्‍यांनी जप्त केले होते. आरोपीच्या शेतात वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले होते. सदर प्रकरणांमध्ये तपासाअंती आरोपी तुळशीराम दशरथ लिल्हारे व त्याचा मुलगा शशिकांत तुळशीराम लिल्हारे या दोघांना वन विभागाने दिनांक २ एप्रिल  रोजी रात्री उशिरा अटक केली. अवैधरित्या विद्युत प्रवाहाचा वापर करून वाघाची शिकार करीत बैलबंडातुन मृत वाघाला शेता जवळच्या कालव्यात आणून टाकल्याचे तपासात पुढे आले आहे. दोन्ही आरोपींना तुमसर येथील न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालया दिनांक ०३ एप्रिल २०२२ हजर करण्यात आले असता आरोपींना पाच दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी