भाजपची नवी खेळी, विधानपरिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदी 'या' नेत्याच्या नावाची घोषणा 

नागपूर
रोहित गोळे
Updated Dec 16, 2019 | 11:32 IST

Pravin Darekar: विधानपरिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदी भाजपचे आमदार प्रविण दरेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. इतर अनेक नावं चर्चेत होती. पण या सर्वांना मागे सारत दरेकर यांनी बाजी मारली.

bjp elected pravin darekar as leader of opposition in legislative council
bjp elected pravin darekar as leader of opposition in legislative council  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • प्रविण दरेकर यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदी निवड
  • अनेक दिग्गजांना मागे सारत दरेकरांनी मारली बाजी
  • भाजपकडून पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर

नागपूर: विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर थेट विरोधी बाकांवर बसावं लागलं. यामुळे गेली पाच वर्ष सत्ता उपभोगलेल्या भाजपच्या आमदारांना मोठाच धक्का बसला. त्यामुळे विरोधी पक्षात असताना विरोधकांकडे फक्त एकच महत्त्वाचं पद असतं ते म्हणजे विरोधी पक्ष नेता. विधानसभेचं विरोधी पक्ष नेते पद हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेल्यानंतर विधान परिषदेचं विरोधी पक्ष नेते पद हे कुणाकडे जाणार याविषयी जोरदार चर्चा सुरु होती. भाजपच्या अंतर्गत वर्तुळात अशीही चर्चा होती की, पंकजा मुंडे या विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदासाठी आग्रही होत्या. पण आता भाजपने याबाबत धक्कातंत्राच्या वापर करत विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेते पदी आमदार प्रविण दरेकर यांची घोषणा केली आहे. 

प्रविण दरेकर यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर भाजपमधील अनेक नेत्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला. कारण या पदासाठी अनेक जण इच्छुक होते. मात्र, त्या सगळ्यांना मागे सारून दरेकर यांनी बाजी मारल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. विधान परिषदच्या विरोधी पक्ष नेते पदासाठी भाजपचे आमदार भाई गिरकर, सुरजितसिंह ठाकूर ही नावं सुरुवातीला चर्चेत होती. पण ऐनवेळी प्रविण दरेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. 

(प्रविण दरेकर, फोटो सौजन्य: Twitter)

आजपासून (सोमवार) राज्यातील हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरु होत आहे. त्याआधी भाजप आमदारांच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदासाठी प्रविण दरेकर यांच्या नावाची घोषणा केली. विधानसभेत फडणवीस यांच्यासारखा आक्रमक विरोधी पक्ष नेता असताना विधानपरिषदेत देखील सरकारला धारेवर धरणारा तसाच आक्रमक नेता हवा असल्याने भाजपने प्रविण दरेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं असल्याचं समजतं आहे. 

प्रविण दरेकर यांची कारकीर्द: 

प्रविण दरेकरांची राजकीय कारकीर्द ही शिवसेनेतून झाली होती. सुरुवातीला ते शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेत होते. त्यावेळी ते राज ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जात होते. जेव्हा राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली तेव्हा दरेकर यांनी देखील शिवसेनेला जय महाराष्ट्र करत मनसेत प्रवेश केला होता. त्यानंतर २००९ साली मनसेच्या तिकीटावर ते विधानसभेत निवडणून गेले होते. पण २०१४ साली विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना भाजपकडून विधापरिषदेची आमदारकी देण्यात आली होती. त्यानंतर आता थेट त्यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदी निवड करण्यात आली आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी