Sudhir Mungatiwar : नागपूर : राज्यसभा निवडणुकीत आम्ही विचारपूर्वक तिसरा उमेदवार दिला आणि निवडून आणला असे विधान भाजप नेते सुधीर मुनंगटीवार यांनी केले. तसेच विधानपरिषदेचीही आम्ही तयारी केली आहे आमचा पाचवा उमेदवार निवडून येईल असा विश्वासही मुनंगटीवार यांनी व्यक्त केला.
नागपुरात माध्यमांशी बोलताना मुनंगटीवार म्हणाले की, आम्ही चमत्कारासाठी नव्हे तर विजयसाठी निवडणूक लढवत आहोत. विचारपूर्वकच राज्यसभेत तीन उमेदवार दिले आणि आमदारांच्या सदविवेकबुद्धीच्या आधारावर आमचा तिसरा उमेदवार निवडून आला. विधानपरिषदेतही आम्ही चमत्कारासाठी पाचवा उमेदवार उभा केलेला नाही. तर अतिशय नियोजनपूर्वक आम्ही या निवडणुकीची तयारी केली आहे, यावेळीही आमचा उमेदवार विजयी होईल असा विश्वास मुनंगटीवार यांनी व्यक्त केला.
शिवसेनेचे आमदार जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली असेल तर त्या भूमिकेचे आपण स्वागत करतो असे मुनंगटीवार म्हणाले. तसेच त्यांचं काही चुकलं नाही. जनतेने त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात निवडून दिले आहे. शिवसेनेच्या सर्व आमदारांना माझं आवाहन आहे की त्यांनी 1966 रोजी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी काय भाषण केले होते, ते एकदा ऐकावे, शिवसेनेचा खरा आमदार कदापि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करू शकत नाही ज्यांना खुर्चीवर प्रेम आहे, जे बाळासाहेबांचा विचार विसरले असतील ते मात्र मतदान करतील अशी मुनंगटीवार म्हणाले.